esakal | ढिंग टांग  : तेचि पुरुष दैवाचे..! 
sakal

बोलून बातमी शोधा

domestic violence increased

लॉकडाउनच्या काळात घरगुती हिंसेत वाढ झाल्याचे वृत्त कळल्याने चिंतित होऊन सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेने आम्ही एक विशिष्ट आचारसंहिता (विशेष फोकस : पुरुषबांधव) सुचवीत आहो.

ढिंग टांग  : तेचि पुरुष दैवाचे..! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

सांप्रतकाळी देशभर नव्हे, अखिल जगतात लॉकडाउनचे दिवस असून सारी कुटुंबे आपापल्या घरी अडकून पडली आहेत. अशा परिस्थितीत भांड्याला भांडे लागून मोठा आवाज होणे, स्वाभाविक आहे. सतत तेच तेच चेहरे (खुलासा : ‘नकोसे’ हा शब्द आम्ही येथे खुबीने टाळला आहे, याची सुज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी!) पाहून नाही म्हटले तरी कंटाळा येतो. कंटाळ्यानंतरची पायरी खिट्‌टी सटकणे ही असते. तशी ती सटकली की रणकंदन ठरलेलेच. लॉकडाउनच्या काळात रस्ते, चौक, तिठे, गल्ल्या, बोळी आदी सामाजिक स्थाने सुनसान आणि शांत असली तरी घराघरातही तश्‍शीच शांतता नांदावी, यासाठी काही उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. लॉकडाउनच्या काळात घरगुती हिंसेत वाढ झाल्याचे वृत्त कळल्याने चिंतित होऊन सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेने आम्ही एक विशिष्ट आचारसंहिता (विशेष फोकस : पुरुषबांधव) सुचवीत आहो. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१. झोपताना डोक्‍यावर पांघरूण घेऊनच झोपावे! (खुलासा : इथे दिवसा की रात्री, ही कालसापेक्षता आम्ही खुबीने टाळली आहे, याची सुज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी!) पण सावधचित्त असावे. पांघरुणाच्या आतील गृहस्थ जागा असला तरी झोपलेला वाटतो, आणि खरोखर झोपलेला असला तरी जागाच आहे, असे वाटते! या संभ्रमावस्थेचा यथोचित गैरफायदा घ्यावा. 

२. भिंतीकडे तोंड करून झोपणे नेहमीच आरोग्यदायी असते! असो!! 

३. आपल्याला मारलेली हांक ही कशासाठी असेल, याचा करेक्‍ट अंदाज लावणाऱ्या सावधचित्त इसमास हा लॉकडाउन काळ सुखकर ठरेल. हांका मारणाऱ्या व्यक्‍तीच्या आवाजातील कमजास्त तीव्रतेवरून कामाचा अंदाज येतोच. 

४. भाजी आणण्यासाठी बाहेर धाडले असता उत्साहाने जावे! घराजवळच भराभर थोडीफार भाजी घेऊन, थोडे टहलून वीरश्रीपूर्ण आवेशात घरात शिरावे. ‘कोपऱ्यावरच्या पोलिसानं अडवलं होतं, पण त्याला तिथल्या तिथे लंबे केला!’ अशा फुशारक्‍या माराव्यात. ‘आपले लोक अत्यंत बेकार आहेत, अजिबात सेन्स नाही, सोशल डिस्टन्सिंग कशाशी खातात हे कळत नाही लेकाच्यांना’ असे सात्त्विक उद्‌गार आवर्जून काढावेत! 

५. भाजी किंवा ब्रेड किंवा अंडी किंवा काहीही आणणे, हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे काम असून येरागबाळाचे हे कामचि नोहे, असा साधारणत: आविर्भाव ठेवावा. त्याने (कदाचित) धुणीभांडी, झाडूपोछादी कामे टळू शकण्याचा संभव आहे. 

६. केर कसाही काढला तरी चालेल, पण आपण जबरदस्त काम करून ऱ्हायलो आहोत, हा आविर्भाव जमणे मात्र गरजेचे आहे! भराभरा केर कधीही काढू नये! त्यामुळे अव्यवस्थितपणाचा आरोप होतो. 

७. आमच्या अनेक बांधवांवर सध्या कपडे धुण्याची वेळ आली आहे. अहह! त्यांच्याप्रती आमच्यामनी सहवेदना व अनुकंपा आहे. त्यांच्यासाठी खास टिप : कपडे न्हाणीघराच्या फरशीवर रीतसर बसकण मारूनच धुवावेत! उकिडवे बसून कपडे धुण्याचे साहस अजिबात करू नये. त्यामुळे प्रचंड दमछाक होत्ये. वजन वाढल्याची शर्मनाक जाणीव होऊन अपराधी भावना मनात घर करत्ये, आणि मुख्य म्हंजे उकिडव्यावस्थेतून उभे राहताना ब्रह्मांड आठवत्ये! काही जणांना किंचित गरगरल्यासारखे झाल्याच्या तक्रारीदेखील आहेत. सारांश : कपडे धुणे एकवेळ सोपे आहे, उठून उभे राहणे अवघड! 

८. कांदे चिरताना, पोळ्या लाटताना, उपमा ढवळताना, कुकर लावताना, भाजी निवडताना चुक्‍कूनही गाणे गुणगुणू नये. त्यामुळे आपण सुखात असल्याचा समज कुटुंबीयांचा होतो व परिस्थिती चिघळत्ये! 

...बाकी टिप्स (विशेष फोकस : भगिनीवर्ग) पुन्हा केव्हातरी! लॉकडाउन जारी है! फुरसत ही फुरसत है..!!

कोरोना

पुणे  ब्रिटिश नंदी

loading image