esakal | ढिंग टांग : आमचे (नवे) शैक्षणिक धोरण!
sakal

बोलून बातमी शोधा

new education policy

आज ‘चहावाला’ हे पद विश्वमान्य झाले आहे. चहावाला होण्याची इर्ष्या मनीं बाळगून अनेक बाळे धडपडत आहेत. एखाद्याने आज ‘मी मोठेपणी चहावाला होणार!’ असे म्हटले तर ‘आहा, तोंड बघा!’ असे म्हणावयाची पाळी आली आहे.

ढिंग टांग : आमचे (नवे) शैक्षणिक धोरण!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

जगात देव आहे, वाचकहो, जगात देव आहे!! ‘तो’ वरून सारे पाहात असतो. जिने आम्हास वेडे केले, तिच्यावरली फिर्याद आम्ही कित्येक वर्षे आधीच गुदरली होती व तिजला आज न्याय मिळाला. ज्या जुन्यापुराण्या, टाकाऊ आणि कालबाह्य शिक्षण व्यवस्थेला आम्ही वर्षानुवर्षे कडाडून विरोध केला, ती व्यवस्था आता नष्ट होते आहे, हाच तो न्याय!! 

शिक्षण व्यवस्थेविरोधात आम्ही बालपणापासूनच आवाज उठवत  आहो. या व्यवस्थेच्या निषेधार्थ आम्ही हरेक यत्तेत तीन-चार वर्षे बसून काढली. असहकाराचे अस्त्र वारंवार उगारले. गणित,  विज्ञान आदी विषयांच्या उत्तरपत्रिकेत सुंदर सुंदर चित्रे काढली!! निर्दय गुरुजनांचे ह्रदयपरिवर्तन व्हावे म्हणून (सातव्या यत्तेत असतानाच) आम्ही गणिताच्या उत्तरपत्रिकेत गुरुजींच्या ह्रदयाला पाझर फुटेल, अशा शब्दांत आवाहन लिहून आलो होतो! (सोपटेमास्तर पाषाणहृदयी होते, आहेत व राहतील! आमचे आवाहन त्यांनी भर वर्गात वांचून दाखवलेन!! ईश्वर माफ करणार नाही!! असो.) आमचा भर प्रत्यक्ष विद्यार्जनावर अधिक होता. उदाहरणार्थ, फास्फरस हा ज्वालाग्राही पदार्थ असून विडी पेटविण्यासाठी अतिशय उपयुक्त असल्याचे आम्ही आधी शोधून काढले, मग शालेय पाठ्यपुस्तकात शिकलो. तंबाकूत निकोटिन असते, ही माहिती आम्हाला पुस्तकाविना मिळाली. चयापचय हा शब्द जिभेची विचित्र हालचाल करण्यापलीकडे काहीही उपयोगाचा नाही, हे आम्हाला फार पूर्वीच कळले. ‘एकशेवीस पान’ खाल्ल्यास पचन सुलभरीत्या होते, हे कळावयास आम्हाला बुके वांचावी लागली नाहीत आणि चार दमड्या कमावण्यासाठी खूप कष्टावे लागते, हा भ्रम असल्याचेही फार लौकर कळून चुकले. 

शालेय जीवनातील कानावर पडलेले डेरिवेटिव, इंटिग्रेशन, ट्रिगोनोमेट्री, प्रोटोझोआ, मायटोकांड्रिया, डीऑक्‍सिरिबो न्यूक्‍लिइक असिड, आदी शब्द भविष्यात कधीही कामी आले नाहीत. याचा आम्हास भविष्यात उपयोग होणार नाही, याची त्याहीवेळेस खात्री होती. आम्हालाच नव्हे, तर आमच्या गुरुजनांसही तसलीच ग्यारंटी (आमच्याबाबतीत) होती. तरीही आम्हाला या भयंकर शिक्षणास तोंड द्यावेच लागले व एक प्रतिभावान कलावंत कायमचा कोमेजला! असो.

‘‘बाळ, तू मोठेपणी कोण होणार?’’ असे आम्हास कुणीतरी लहानपणी भर रेल्वे स्टेशनात विचारले होते. तेव्हा आम्ही क्षणदेखील न दवडता उद्गार काढले होते- ‘‘चहावाला!!’’ 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप       

तीर्थरुपांनी तेव्हा तिथल्या तिथे आमच्या थोतरीत दिली होती. वास्तविक स्टेशनात खिडकी खिडकीशी जाऊन ऐटीत ‘चाऽऽए’ असे सुरात ओरडणाऱ्या चहावाल्या पोराकडे पाहून आम्ही ते उत्तर दिले होते. चहावाला होणे हे ज्या शिक्षण व्यवस्थेला महत्त्वाचे वाटत नाही, त्या शिक्षण व्यवस्थेला काय किंमत द्यावी अं?

आज ‘चहावाला’ हे पद विश्वमान्य झाले आहे. चहावाला होण्याची इर्ष्या मनीं बाळगून अनेक बाळे धडपडत आहेत. एखाद्याने आज ‘मी मोठेपणी चहावाला होणार!’ असे म्हटले तर ‘आहा, तोंड बघा!’ असे म्हणावयाची पाळी आली आहे.

आम्हाला भारताचा उज्ज्वल भविष्यकाल दिसो लागला आहे. तो पहा, रसायनशास्त्रज्ञ..त्यास नोबेल नव्हे, ऑस्करची आस आहे! तो पहा बांधकाम अभियंता, त्याला इमारतीचे नव्हे, इम्रतीचे कौतुक आहे. कां की त्याला पाककौशल्यात रस आहे! ती पहा शल्यविशारदा तरुणी! तिला पेशंटपेक्षा फ्याशनीत अधिक सर्जनशीलता दिसते!! ते पहा नव्या युगातील मास्तर! ‘‘गिटार वादनाचा गृहपाठ करून आणलास ना?’’ असे आपल्या विद्यार्थ्यांस विचारताहेत!! अहाहा! किती सुंदर दृश्‍य!!

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हीच...हीच ती नवी शिक्षण व्यवस्था आणि हेच ते नवे शिक्षण धोरण! अशा धोरणापुढे आम्ही शतप्रतिशत नतमस्तक आहो!