esakal | ढिंग टांग : ...आली समीप घटिका ? 
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : ...आली समीप घटिका ? 

घटनाच इतक्‍या वेगाने घडू लागल्या आहेत की माझे हे पहाटेचे स्वप्न साकार होणार असे दिवसासुद्धा वाटू लागले आहे. "मी पुन्हा आलोच!' असे म्हणण्याची संधी मला नियती देईल का? मी पुन्हा झोपायला जातो आहे.

ढिंग टांग : ...आली समीप घटिका ? 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

आजची तिथी : प्रमादी संवत्सर श्रीशके 1942 भाद्रपद शु. द्वितीया. 
आजचा वार : नमोवार...याने की गुरुवार! 
आजचा सुविचार : अच्छे दिन आनेवाले हैऽऽ..! 

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) गेले काही दिवस पहाटेच्या सुमारास स्वप्न पडते आहे...(पहाटेच्या अंधारात नव्हे, तर-) दिवसाढवळ्या जाहीर शपथविधी सोहळा चालू आहे. समोर अफाट समुदाय खुर्च्यांवर बसलेला आहे. सगळ्यांच्याच तोंडाला मास्क असल्याने चेहरे मात्र ओळखता येत नाहीत. माझे नाव पुकारले जाते. मी उठून ध्वनिक्षेपकाकडे जातो आणि उद्गारतो : "मैंऽऽ...' तेवढ्यात कुणीतरी मास्कआडून ओरडते की "ओऽऽ तुम्हीऽऽ...शपथ घेणार...तो मास्क काढा की आधी!' सगळे हसतात!! हे कोण ओरडले, ते मी शोधू लागतो. पण सगळ्यांच्याच तोंडाला मास्क असल्याने कळून येत नाही. मी गोंधळतो. 

...आणि मला जाग येते! 
या स्वप्नाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न मी गेले काही दिवस करून ऱ्हायलो आहे. लागत नाही! कुण्या तज्ज्ञ माणसाला विचारले पाहिजे. तशी आडून आडून मी चौकशी केली, पण धड उत्तर मिळाले नाही. घरच्या मंडळींना तपशीलात स्वप्न सांगून अर्थ विचारला. मंडळी म्हणाली, ""अपचन झाले असेल! अपचन झाले की अशी स्वप्न पडतात मेली!'' मी गप्प बसलो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

परवा आमचे पक्षाध्यक्ष भेटले, त्यांच्याकडेही विषय काढला. सगळ्या स्वप्नाचा तपशील सांगितला आणि विचारले, "तुमचं काय मत आहे?' त्यांनी अचानक चेहरा गंभीर केला. स्वप्नातला सोहळा नक्की शपथविधीचा होता की नागपूरला दसऱ्याला होते, तशा संचलनाटाइप होता? असे त्यांनी विचारले. मी गोंधळलो. आमच्या जळगावच्या गिरीशभाऊंनाही विचारले. त्यांनी "आहे बुवा! मजाय एका माणसाची! ओळख ठेवा!' असे सांगून (नेहमीप्रमाणे) हसत हसत काढता पाय घेतला. मा. शेलारमामांनी तर हा " मी पुन्हा येईन' या नाटकाचा दुसरा अंक असल्याचे छातीठोकपणाने सांगितले. मला बरे वाटले! मध्यंतरी आमचे कोकणचे सुपुत्र मा. राणेदादा भेटले. त्यांनी तर सर्वांवर कडीच केली. म्हणाले, ""ह्या सपान तर मी रोज दिवसा बगतंय!'' 

शेवटी पक्षातल्या लोकांना फार विचारण्यात अर्थ नाही, हे लक्षात आले. धीर करून थेट आमचे राष्ट्रवादीमधले (एकमेव) माजी मित्र मा. दादासाहेब बारामतीकर ऊर्फ धाकल्या धन्यांना विचारून पाहिले. अर्थात फोनवर! शपथविधीचे नाव काढताच ते अजीजीने म्हणाले, ""इजा झाला, बिजा झाला! आता तिजासाठी शपथ घ्यायला स्वप्नातसुद्धा उभं करू नका आम्हाला! पाया पडतो!!'' एवढे बोलून त्यांनी चक्क फोन ठेवलान! 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्वप्नात मी शपथ घेण्यापूर्वीच मला नेहमी जाग येते, हा त्यातला वाईट भाग आहे. आणखी थोडे झोपून पाहावे, असे रोज ठरवतो, पण जाग येतेच!! कसला शपथविधी सोहळा असेल? "ओऽऽ तुम्हीऽऽ...शपथ घेणार...तो मास्क काढा की आधी!' हे उद्गार कोणी काढले असतील आणि का? कारण या उद्गारांमध्ये छद्मीपणा दडलेला स्पष्ट दिसतो आहे. कोण असेल हा महाभाग? मला संजयाजी राऊतसाहेबांचा संशय येतो आहे! जाऊ दे. 

घटनाच इतक्‍या वेगाने घडू लागल्या आहेत की माझे हे पहाटेचे स्वप्न साकार होणार असे दिवसासुद्धा वाटू लागले आहे. "मी पुन्हा आलोच!' असे म्हणण्याची संधी मला नियती देईल का? मी पुन्हा झोपायला जातो आहे.

loading image
go to top