esakal | ढिंग टांग : श्रींची इच्छा!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : श्रींची इच्छा!

जिमवाले, डबेवाले, हाटेलवाले, फुलवाले, असे अनेक ‘वाले’ तुमच्या तक्रारी घेऊन शिवाजी पार्कला तुमच्या श्रीबंधुराजांकडे जात राहिले. (त्यांच्याकडे जाऊन आले की काही तरी ‘उघडते’ असे जनतेला कां वाटत होते कुणास ठाऊक! असो.)

ढिंग टांग : श्रींची इच्छा!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

मा. सन्मित्र श्री. उधोजीसाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम आणि दंडवत. सर्वप्रथम श्रीदिवाळीच्या श्रीशुभेच्छा. अखेर तुम्ही देवस्थानांची दारे (एकदाची) उघडली. अभिनंदन!

‘देर आए, दुरुस्त आए’. श्रींच्या घरी विलंब चालतो, परंतु विलाप नाही, हेच खरे! (खुलासा ः ‘भगवान के घर में देर है, अंधेर नही’. या मुहावऱ्याचा हा श्रीअनुवाद आहे बरे का!) ‘श्रीमिशन बिगिन अगेन अंतर्गत हळू हळू एकेक श्रीगोष्टी उघडत (आणि उलगडत ) गेल्या. सारे काही उघडले पण देवालये काही उघडेनात! लोक आग्रह करीत होते, पण तुम्ही जाम ऐक्कत नव्हता. अखेर ऐकलेत!! किती वेळा थॅंक्‍यू म्हणू? तीनदा म्हणतो : थॅंक्‍यू थॅंक्‍यू थॅंक्‍यू!!! इतकेच नव्हे तर, चक्क बिग बिग श्रीथॅंक्‍यू!! 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिमवाले, डबेवाले, हाटेलवाले, फुलवाले, असे अनेक ‘वाले’ तुमच्या तक्रारी घेऊन शिवाजी पार्कला तुमच्या श्रीबंधुराजांकडे जात राहिले. (त्यांच्याकडे जाऊन आले की काही तरी ‘उघडते’ असे जनतेला कां वाटत होते कुणास ठाऊक! असो.) आम्ही असे ऐकतो की, पृथ्वीवर असे काही तरी भयंकर घडत असल्याचे कळल्यावर (पुराणातील गोष्टींप्रमाणे) इंद्रासन डळमळू लागले. शेवटी (बहुधा) श्री नारदांनी घाबरलेल्या देवगणांस (खुलासा : अजय देवगण नव्हे, तो वेगळा गण आहे!!) उपाय सांगितला की श्रीशिवाजीपार्कस्थित जागरुक (व उग्र) देवस्थान असलेल्या श्रीचुलतदेवांकडे जावे, तेच काहीतरी करु शकतील!

परंतु, छे! काहीही घडले नाही. आम्हीही असंख्य पत्रे तुम्हाला पाठवली. आंदोलने छेडली. बरेच काही डावपेच खेळून पाहिले, पण देवालयांच्या दारांची कुलपे तशीच! अखेर तुमचे हळवे मन द्रवले! तुम्ही देवालये उघडण्याची उदार परवानगी दिलीत! तुमचे उपकार कसे फेडू? श्रींचे आशीर्वाद तुम्हाला असेच लाभोत आणि आणखी काही दिवस तुमचे सरकार टिको! अशा पोटभर शुभेच्छा देतो. (काही दिवसच हं! महिने किंवा वर्षे नव्हेत!!) कळावे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आपला (माजी) मित्र. नानासाहेब फ.
ता. क. : हा निर्णय नेमका कसा घेतलात? हे कोडे उलगडत नाही. प्लीज सांगा ना!
नानासाहेब फ.


नानासाहेब-
आपले पत्र मिळाले. ते कुत्सित भाषेत लिहिलेले असेल असे गृहित धरुन आम्ही ते न वाचताच टरकावणार होतो! आम्हाला ही असली पत्रे पाठवणे बंद करा, हे निर्वाणीचे सांगतो. एकतर तुमचे अक्षर अतिशय किरटे आहे!! (त्यात हेतू वाईट!!) जाऊ दे. 

होय, आम्ही देवळे उघडली! उघडणारच! का नाही उघडायची? सगळे हळू हळूवारपणे उघडते आहे, तर देवळे का बंद ठेवायची? आम्हाला लोकांची काळजी आहे, तशीच देवादिकांचीही काळजी आहे. त्यांच्यासाठीच आम्ही इतके दिवस ‘नाही नाही’- असे म्हणत होतो.

...देवळे उघडणे, ही तो श्रींची इच्छा होती! ती फळाला आली!

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काल रात्री आम्ही झोपलो असता (तसे आम्ही रोज रात्री झोपतो...) पहाटेच्या सुमारास आम्हाला दृष्टांत झाला. ‘देवालये उघडा’ ही श्रींची इच्छा स्पष्टपणे कानी ऐकू आली. जागा झालो. शेजारी चि. विक्रमादित्य उभा बघून त्यांना विचारले की , ‘‘तुम्ही आत्ता काही बोललात का?’’ तर ते म्हणाले, ‘‘तुम्हीच झोपेमध्ये दारं उघडा’’! असं काहीतरी म्हणालात!’’

...याला तुम्ही दैवी संकेत असे म्हणालात तरी चालेल!! आम्हाला असे दैवी संकेत मिळतात, असे नाही तरी तुमचे म्हणणे आहेच! असो!! आता कळले?
जय महाराष्ट्र. उ. ठा.

loading image