esakal | ढिंग टांग: शरयुतीरावरी अयोध्या!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग: शरयुतीरावरी अयोध्या!

विलंबी संवत्सरातील श्रीशके १९४१ मधील फाल्गुनातील त्रयोदशीचा दिवस. अयोध्यावासियांनी पहाटेपासून लगबग सुरू केली होती. रांगोळ्यांनी सडे सजविले रस्त्या रस्त्यातून, कुठे मंदिरी ऐकू येते टाळांची किणकिण’ असे सारे वातावरण होते.

ढिंग टांग: शरयुतीरावरी अयोध्या!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

विलंबी संवत्सरातील श्रीशके १९४१ मधील फाल्गुनातील त्रयोदशीचा दिवस. अयोध्यावासियांनी पहाटेपासून लगबग सुरू केली होती. रांगोळ्यांनी सडे सजविले रस्त्या रस्त्यातून, कुठे मंदिरी ऐकू येते टाळांची किणकिण’ असे सारे वातावरण होते. नगरजनांपैकी रामसहाय नावाचा कुणी एक, शेजारच्या रामप्यारेला म्हणाला की ‘‘...आज अस्नान करने का दिन है का?,’ त्यावर रामप्यारे म्हणाला, ‘‘दुई बार अस्नान हो चुका है, पंडत...पूछो तो हमरे रामदुलारीको! क्‍यों री भागवान...’’ त्यावर रामदुलारी हसली व पदरात तोंड लपवून उत्तर भारतीय नाजूकपणाने ‘इश्‍श’ असे म्हणाली...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

थोडक्‍यात, संपूर्ण अयोध्यानगरी भगव्या रंगाने रंगून गेली होती. जागोजाग रामचरितमानसाचे पाठ ऐकू येत होते. 

शरयुतीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी...
त्या नगरीच्या विशालतेवर
उभ्या राहिल्या वास्तु सुंदर
वाहती मार्ग समांतर
रथ, वाजी, गज पथिक चालती, नटुनि त्याच्यावरी!

...अशी ती अलौकिक अयोध्यानगरी!! त्या सुवर्णनगरीत आज सहकुटुंब सहपरिवार इष्टमित्रांसमवेत साक्षात धनुर्धारी उद्धवनाथ येणार! सुवर्णाच्या रथात (बसून) त्यांचे आगमन होणार! साहजिकच अयोध्यावासीयांचा उत्साह (नगरीत मोकाट हिंडणाऱ्या सांडासारखा) उधाणला होता. अद्‌भुत धनुर्धारी, एकबाणी, एकवचनी उद्धवनाथांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी अशी सजून धजून तयार होत होती, तेव्हाच एक पुष्पक विमान मुंबापुरीतून थेट अयोध्येच्या दिशेने उडत होते. कालांतराने अयोध्येच्या क्षितिजावर पुष्पक विमान दिसू लागले. शरयू नदीच्या पाण्यावरील लाटा उसळू लागल्या. ढोलताशे, नगारे गर्जू लागले, ‘‘ भय्या, वो आ गये, भय्या, वो आ गये ना’’ (खुलासा : बालगंधर्वाच्या सुप्रसिद्ध ‘दादाऽऽ, ते आले ना!’ च्या चालीवर म्हणावे!) च्या हाकाऱ्यांनी नगरी निनादली. ...इकडे पुष्पक विमानाच्या अंतर्भागात धनुर्धारी उधोजीनाथ शांतपणे बसले होते. त्यांच्या शेजारी राजपुत्र चि. आदित्यनाथ होता. खिडकीतून खाली अनिमिष नेत्रांनी पाहात होता. तेवढ्यात, पुष्पक विमानातील सुंदरीने ‘कृपया कुर्सी की पेटी बांधे रखिए...अब जल्द ही हम लैंडिंग करनेवाले है...’ अशी उद्‌घोषणा केली.

‘‘बॅब्स...लैंडिग म्हंजे काय हो?’’ चि. आदित्यनाथाने निरागसपणे विचारले. मर्यादा पुरुषोत्तम उधोजीनाथांनी तेव्हा आवंढा गिळलेला साऱ्यांना स्पष्ट दिसला. चि. आदित्यनाथ कधी कुठला प्रश्‍न विचारुन बुचकळ्यात पाडील, नेम नाही!! 

‘‘लैंडिंग नाही रे! लॅंडिंग...म्हंजे विमान उतरतं नं, त्याला लॅंडिंग म्हंटात!’’ उधोजीनाथांनी राजपुत्राचे कुतूहल-शमन केले. यथावकाश विमान उतरले, थांबले. परंतु, उधोजीनाथांना उठता येईना! अचानक कंबर कां आखडली? पाय का गळाठले? की अयोध्येत आल्यामुळे ऊर उचंबळून आल्याने असे घडत्ये आहे? ते गोंधळले.

‘‘बॅब्स...अहो, ती कुर्सी की पेटी काढा ना आधी! हाहा!!,’’ टाळ्या पिटत ओरडणाऱ्या चि. आदित्यनाथाला आता आवरले पाहिजे, असा पोक्‍त विचार करीत उधोजीनाथांनी कुर्सीचा पट्‌टा काढला, ते विमानाबाहेर आले. पाठोपाठ रा. आदित्यनाथ होतेच! अयोध्या मोहिमेचे ‘आपलं माणूस’ ऊर्फ संजयाजी राऊत लगबगीने पुढे झाले. त्यांनी उभयतांच्या ब्यागा ताब्यात घेऊन मोटाररुपी रथाच्या डिकीत टाकल्या. (खुलासा : रथालादेखील डिकी असत्ये! होच मुळी!!) मा. संजयाजी हे सुमंताच्या आविर्भावात वावरत होते. (ऐका : गीत रामायण, थांब सुमंता थांबवी रे रथ..!) विमानतळावरून मोटारींचा ताफा निघाला. ...दुतर्फा गर्दी फुलून आली होती. अयोध्यानगरीचे कळस दिसू लागले, तशी उधोजीनाथांनी अचानक संजयाजी ऊर्फ सुमंताला स्मरण करून दिले. ते म्हणाले : इथे कमळे फार दिसताहेत, आमचे धनुष्यबाण कुठे आहे? काढा बघू ब्यागेतनं!!’’

सियावर रामचंद्र की जय!

loading image