esakal | ढिंग टांग!  : आकाश पांघरुनी..! 
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra-lockdown

मास्कमुळे हल्ली माणसं ओळखता येत नाहीत ना चटकन! काल व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मी मोदीजींशी बोलतोय की राजनाथसिंहजींशी, हेच कळेना! सगळे मास्क लावून बसले होते!!

ढिंग टांग!  : आकाश पांघरुनी..! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे बुद्रुक. 
वेळ : गंभीर! 
काळ : अतिगंभीर. 
पात्रे : ती तर भलतीच गंभीर!! 

चि. विक्रमादित्य : (नेहमीप्रमाणे खोलीच्या दारातून) हे देअऽऽ...बॅब्स! मे आय कम इन? 

उधोजीसाहेब : (लांबूनच) नोप! कोण तुम्ही? आणि थेट आतमध्ये कसे आलात? कोणी सोडलं तुम्हाला? अरे कोण आहे रे तिकडे? हे काय चाल्लंय काय? 

विक्रमादित्य : (चिडून) नाऊ कमॉन बॅब्स! मला ओळखत नाही तुम्ही? आयॅम द...द... 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उधोजीसाहेब : (किंचित ओशाळून) तू होय! मग ठीक आहे...अरे, मास्कमुळे हल्ली माणसं ओळखता येत नाहीत ना चटकन! भलतीच पंचाईत होते! काल व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मी मोदीजींशी बोलतोय की राजनाथसिंहजींशी, हेच कळेना! सगळे मास्क लावून बसले होते!! 

विक्रमादित्य : (शंका घेत) व्हिडिओमार्फतसुध्दा होतो का हो संसर्ग? 

उधोजीसाहेब : (वैज्ञानिक पवित्र्यात) छे रे! राहून गेला असेल मास्क! आपण नाही का, उन्हातून आल्या आल्या गॉगल काढायला विसरतो कधी कधी? तसंच!! 

विक्रमादित्य : (गोंधळून) मास्क लावून बोलणं कठीणच आहे नै? 

उधोजीसाहेब : (भान विसरुन) भलतंच! शेवटी प्रत्येकाने बोलण्यापूर्वी आपलं नाव जाहीर करायची सूचना मांडली मी त्या कॉन्फरन्समध्ये! म्हटलं, व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये प्रत्येकानं आपलं आधारकार्ड दाखवून मगच बोलावं! कोणाशी बोलतोय हे तर कळलं पाहिजे!! 

विक्रमादित्य : (पॉइण्टाचा मुद्‌दा उपस्थित करत) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कशाला? एरवी साध्या मीटिंगमध्येही हाच प्रॉब्लेम येतो! शेजारी कोण बसलंय, हेच कळत नाही! 

उधोजीसाहेब : (दुजोरा देत) हो की! उदाहरणार्थ, परवा मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपले देसाईजी समजून वीस मिनिटं कॉंग्रेसच्या थोरातसाहेबांशीच गप्पा मारल्या! (चुटपुटत) काय काय बोललो कुणास ठाऊक! जाऊ दे!! 

विक्रमादित्य : (टाळीसाठी हात पुढे करत) द्या टाळी! 

उधोजीसाहेब : (हात बांधून) टाळी बिळी काहीही मिळणार नाही! सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळा!! 

विक्रमादित्य : (कुरकुरत) किती दिवस चालणार हे असं, बॅब्स? 

उधोजीसाहेब : (निर्धारानं) मला बाधितांचा आकडा शून्यावर आणायचाय! जोवर तो येत नाही तोवर संपूर्ण महाराष्ट्र कुलुपबंद ठेवायची माझी तयारी आहे! 

विक्रमादित्य : (तक्रारीच्या सुरात) आख्खा देश बंद आहे! घराच्या पुढल्या दाराला कुलुप घातलं तर आतल्या खोल्यांना कशाला कुलपं घालायची? 

उधोजीसाहेब : (विचारात पडत) बाहेरगावी जाताना आपण कपाटालासुध्दा कुलुप घालतोच ना? 

विक्रमादित्य : (एकदम आठवून) बाय द वे, बॅब्स...कालच्या टीव्हीवरच्या भाषणात तुम्हाला कुठलं गाणं आठवलं होतं हो? 

उधोजीसाहेब : (संकोचून) अरे, जुनं आहे ते, आमच्या लहानपणी एकदम हिट होतं! (किनऱ्या आवाजात गाणं गुणगुणत) 

आकाऽऽश पांघरुऽऽनी जग शांत झोऽऽपले हे, 

घेऊऽऽन एकताऽऽरी गातोऽऽ कबीर दोऽऽहे...' 

विक्रमादित्य : (हरखून) वा! बॅब्स...काय साऊंड आहे हो तुमचा? 

उधोजीसाहेब : (खचून) काय आहे? 

विक्रमादित्य : (गळ्यावर बोटांचा पाचुंदा हापटत) साऊंड! आवाज...आवाज! 

उधोजीसाहेब : (लाजत) थॅंक्‍यू! ॲक्‍चुअली लहानपणी आम्ही हेच गाणं वेगळ्या पद्धतीनं म्हणत असू! आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे, घेऊन एक वाटी खातो कबीर पोहे...असं म्हणायचो आम्ही! हाहा!! 

विक्रमादित्य : (दाद देत) साऊंण्ड्‌स करेक्‍ट! आत्ताच्या परिस्थितीला तर एकदम परफेक्‍ट! हो की नाही बॅब्स? 

loading image