esakal | ढिंग टांग :  टप टप मराठी!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग :  टप टप मराठी!

आपल्या मराठी भाषेचा अभिमान बाळगायला शिकलं पाहिजे, तुमच्या तरुण पिढीनं! तुम्हीच मराठी भाषा नीट वापरली नाही, तर ती टिकणार कशी? आज माझ्या भाषणात मी हेच सांगितलं!! ऐकलंस ना?

ढिंग टांग :  टप टप मराठी!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान.
वेळ : हंड्रेड पर्सेंट मराठी! काळ : टोटल मराठीच!
प्रसंग : स्लाइटली मराठी... थोडासा इंग्रजी!
पात्रे : कंप्लीट मराठी!

चि. विक्रमादित्य : (नेहमीप्रमाणे खोलीत एण्ट्री घेत) हाय देअर बॅब्स... मे आय कम इन?

उधोजीसाहेब : नको रे आता! दमलोय ना मी! शुभरात्री!

चि. विक्रमादित्य : (हेका न सोडता) कमॉन! आय वाँट टू विश यू... हॅप्पी मराठी भाषा डे!!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उधोजीसाहेब : (काकुळतीनं) निदान आजतरी ही भाषा नको रे! हॅप्पी मराठी भाषा डे... काय? मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा... असं शुद्ध मराठीत म्हणावं! 

चि. विक्रमादित्य : (खांदे उडवत) व्हॉट डिफरन्स डझ इट मेक? ओके! मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा... हॅपी नाऊ?

उधोजीसाहेब : (बजावून सांगत) हे बघ, आपल्या मराठी भाषेचा अभिमान बाळगायला शिकलं पाहिजे, तुमच्या तरुण पिढीनं! तुम्हीच मराठी भाषा नीट वापरली नाही, तर ती टिकणार कशी? आज माझ्या भाषणात मी हेच सांगितलं!! ऐकलंस ना?

चि. विक्रमादित्य : (प्रतिवाद करत)... पण, मी मराठी लॅंग्वेजच मॅक्‍झिमम यूज करतो ना! काल कुणीतरी टुरिझमबद्दल आपला प्लॅन मला एक्‍सप्लेन करत होतं, मी ठणकावून सांगितलं! टुरिझम नाही, पर्यटन म्हणा! प-र्य-ट-न!! छान आहे शब्द!! इंग्लिशच वाटतो ऑलमोस्ट!

उधोजीसाहेब : दिवसभर मराठी भाषेचं गुणगान गाऊन घरी आलो, तर तुझं हे असं बोलणं ऐकावं लागतंय!! इच्छा नसताना मुख्यमंत्री झालो, त्याची एवढी शिक्षा?

चि. विक्रमादित्य : (एकदम आठवून) बाय द वे, बॅब्स, टेल मी... नस्ती म्हंजे काय हो?

उधोजीसाहेब : (पंतोजी स्टाईल) नस्ती म्हंजेऽऽ... फाइऽऽल!!

चि. विक्रमादित्य : (कपाळाला आठ्या) यू मीन कंप्युटरमध्ये असते ती फाइल?

उधोजीसाहेब : (घाईघाईने समजावून सांगत) नव्हे, नव्हे रे! ही फाइल वेगळी, ती तुझी पेन ड्राइव्हवाली फाइल वेगळी! ही सरकारी फाइल असते! दोन पुठ्ठ्यांवर दोरी लावलेली असते आणि आत कागद ठेवलेले असतात! ते सह्यांसाठी आपल्याकडे येतात! त्यावर सही करायची असते!

चि. विक्रमादित्य : (उजळलेल्या चेहऱ्याने) एकदम सही! सही म्हंजे सिग्नेचर ना?

उधोजीसाहेब : (अपराधी भावनेने) हो!

चि. विक्रमादित्य : (छाती पुढे काढून) बॅब्स... आय ॲम रिअली प्राउड ऑफ माय मराठी लॅंग्वेज!!

उधोजीसाहेब : थॅंक्‍यू!! आय मीन... आभारी आहे!

चि. विक्रमादित्य : (जाहीर करत) बॅब्स... यापुढे तुम्ही मराठीत फोटो काढा!!

उधोजीसाहेब : मराठीत फोटो कसे काढतात? 

चि. विक्रमादित्य : काहीतरी आयडिया असेलच ना? मराठीत काय अशक्‍य आहे? बाकी तुमचं आजचं मराठी लॅंग्वेजबद्दलचं स्पीच एक्‍सलंट होतं, हं ना! त्यात तुम्ही म्हणालात की, ‘पूर्वी मराठी घोड्यांच्या टापा ऐकल्या की लोक घाबरत असत! माझ्या मराठीचं वाकडं करण्याची काय कुणाची हिंमत आहे?’... असंच म्हणाला होतात ना?

उधोजीसाहेब : अलबत! जरूर म्हणालो होतो आणि यापुढेही म्हणेन!! आमच्या मराठी घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकून मोगल पळाले! गनिम इथल्या इथे नेस्तनाबूत झाला! मराठीच्या शत्रूंच्या कानात या टापांचे आवाज अजुनी घुमताहेत- ‘‘खबर्दार, मराठीच्या वाटेला जाल तर...’’

चि. विक्रमादित्य : (शांतपणे) करेक्‍ट! घोड्यांच्या टापा जर मराठी असतील, तर फोटोसुद्धा मराठीत का निघू शकणार नाहीत? टेल मी!!

loading image