esakal | ढिंग टांग : गुड नाइट!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : गुड नाइट!

ज्यांना रात्री मजा करायची आहे त्यांनी रात्री बाहेर पडावं! हे शहर चोवीस तास चालू राहिलं पाहिजे!! उद्या एखाद्याला वाटलं की रात्री दीड वाजता बिर्याणी खावी, तर त्याला बिर्याणी मिळालीच पाहिजे!

ढिंग टांग : गुड नाइट!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे. वेळ : रात्री दहा-साडेदहाची. प्रसंग : नीजानीज! पात्रे : नेहमीचीच!

चि. विक्रमादित्य : (खोलीच्या दारातून) हाय देअर...बॅब्स! मे आय कम इन!

उधोजीसाहेब सीएम : (कानटोपी वगैरे जामानिमा चढवत) नोप! गुड नाइट!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चि. विक्रमादित्य : (खोलीत शिरत) इतक्‍या लौकर काय गुड नाइट? हॅ:!!

उधोजीसाहेब सीएम : (पांघरुणात शिरत) हॅ: काय हॅ:!! थंडी किती पडलीये!! बांद्रा आहे की शिमला!हुहुहुहुहु!!!

चि. विक्रमादित्य : (आश्‍चर्यानं) एवढी थंडी वाजतेय तुम्हाला? जेमतेम बारा डिग्री टेंपरेचर तर आहे!! आपण हिमअस्वलांचे फोटो काढायला गेलो होतो, तेव्हा-

उधोजीसाहेब सीएम : (कळवळून) नको रे त्या आठवणी काढूस! गेल्या काही महिन्यात कॅमेऱ्याला हातसुद्धा लावता आलेला नाही!!

चि. विक्रमादित्य : (गंभीरपणे) आय ॲग्री!..तुम्ही सीएम झाल्यापासून तुम्हाला काही लाइफच उरलेलं नाही!! तुमची फोटोग्राफी, कला प्रदर्शनं...सबकुछ बंद झालं बॅब्स! माझी सिंपथी आहे...

उधोजीसाहेब सीएम : कुणाची सिंपथी नकोय मला! हाती घेतलेली जबाबदारी नीट पार पाडली म्हंजे झालं!!

चि. विक्रमादित्य : (तक्रारीच्या सुरात) याला कारणीभूत आपले संजयकाका राऊत आहेत! हो की नाही?

उधोजीसाहेब सीएम : (हताशेनं पांघरुणात पडून राहात) आलीया भोगासी असावे सादर! तू झोपायला जा बघू! किती उशीर झालाय!! (पांघरुण डोक्‍यावर घेत) सभ्य माणसं रात्री आपापल्या घरी झोपतात! 

चि. विक्रमादित्य : (ठामपणाने) राँग! सभ्य माणसं रात्रीच काम करतात! रात्री सारं जग झोपी गेलेलं असताना संयमी नावाचा माणूस जागा असतो, अशा अर्थाचं एक संस्कृत सुभाषित आहे! ओरिजिनल सुभाषित मला आत्ता आठवत नाहीए, नाहीतर सांगितलं असतं!

उधोजीसाहेब सीएम : कोण सांगतं रे तुला हे सगळं?

चि. विक्रमादित्य : (दुर्लक्ष करत) मुंबईत आता सगळे संयमी लोक रात्री बाहेर पडणार! संयम सुटलेले सगळे झोपा काढणार! मी मुंबईत नाइट लाइफ सुरू करतोय! 

उधोजीसाहेब सीएम : (कळवळून) अरे, इथं दिवस निघता निघत नाही, रात्री आणखी कामं कशाला वाढवतोस?

चि. विक्रमादित्य : (पाय हापटत) जगात सगळ्या मोठमोठ्या शहरांमध्ये नाइट लाइफ असतं! लंडन, पॅरिस, न्यू यॉर्क, म्युनिक, सिंगापूर...यू नेम इट! आपल्याच मुंबईत सगळे लेकाचे साडेदहाला आडवे!! हॅ:!! नव्या सरकारच्या राजवटीत आता हे चित्र बदलेल आणि...

उधोजीसाहेब सीएम : (पांघरुणातून डोकं काढत वाक्‍य पुरं करत) ...आणि सगळ्यांना जाग्रणं होतील!! नका रे असं करू!! झोपू दे की लोकांना सुखानं!! मुंबईत आधीच ट्रॅफिक आणि गर्दीनं जीव अर्धा होतो दिवसा! 

चि. विक्रमादित्य : (शांतपणे) ज्यांना दिवसा मजा करायची आहे, त्यानं दिवसा करावी! ज्यांना रात्री मजा करायची आहे त्यांनी रात्री बाहेर पडावं! हे शहर चोवीस तास चालू राहिलं पाहिजे!! उद्या एखाद्याला वाटलं की रात्री दीड वाजता बिर्याणी खावी, तर त्याला बिर्याणी मिळालीच पाहिजे!

उधोजीसाहेब सीएम : (आम्लपित्त चढल्यागत चेहरा करत) खाऊ नये रे अपरात्री बिर्याणी! बाधेल!!

चि. विक्रमादित्य : (निक्षून सांगत) कुछ नही होगा! मी तर असं सांगायला आलो होतो की मंत्रालयसुद्धा रात्री सुरू ठेवा! बघा, काय मजा येते ते!! कशी वाटली आयडिया?

loading image