ढिंग टांग :  असेल हिंमत तर..!

ढिंग टांग :  असेल हिंमत तर..!

मा. मित्रवर्य श्रीमान रा. रा. उधोजीसाहेब सीएम यांजसाठी- सनविवि. ‘‘सरकार पाडण्यास उद्या यायचे तर आजच या’’ असे आव्हान आपण आम्हाला दिलेले आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे आम्ही हे आव्हान स्वीकारू शकत नाही. क्षमस्व! अपरिहार्य कारणे बरीच आहेत.

साहेब, ब्रेक फेल झालेल्या खटारा गाडीला धक्‍का स्टार्ट मारून चालू करता येते, पण थांबवता येत नाही. खांबावर धडक मारून किंवा चढावर गाडी नेऊनच थांबवावी लागते. आपल्या सरकारचे असेच होणार असल्याने आम्ही काही करण्यासारखे नाही! सरकार पाडण्यासाठी आम्ही काही प्रयत्न करायला जायचो आणि कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक गाठ पडायची. किंवा चिक्‍कार वेळ मचाणावर तिष्ठत शिकाऱ्याने वाट बघावी आणि ऐन निकडीच्या वक्‍ताला शिकाऱ्याने घाईघाईने झुडपामागे जावे आणि वाघ उठावा! किंवा डॉक्‍टराने पेशंटची नाडी बघावयास मनगट हातात घ्यावे आणि त्याक्षणी पेशंटाने राम म्हणावा!...असले काहीबाही घडू शकते. ते पाप आपल्या माथ्यावर (तूर्त) घेऊ नये, अशा निर्णयाप्रत आम्ही सारे कमळ बांधव आलेलो आहोत. सबब, हे सरकार पाडण्यामध्ये आम्हाला बिलकुल इंटरेस नाही, याची नोंद घ्यावी.

उलटपक्षी, (हिंमत असेल तर) तुम्हीच पुन्हा एकदा जनादेश मागण्यासाठी निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान आम्ही तुमच्यासमोर फेकत आहो! हिंमत असेल, तर उचला च्यालेंज!! तुम्ही तिन्ही पक्ष विरुद्ध आम्ही एकटे अशी झुंज झाली तरी बेहत्तर!! हिंमत असेल, तर उचला आमचे आव्हान...

आणखीही बरीच आव्हाने आहेत. त्यापैकी ठळक आव्हाने येथे नमूद करीत आहे. यापैकी कुठलीही पाच आव्हाने उचललीत तरी चालेल.

१. हिंमत असेल तर बांदरा ते मलबार हिल बेस्टच्या बसमधून एकदा येऊन दाखवा!

२. हिं. अ. त. स्कूटरवर बसून खड्डे हुकवत बोरिवलीपर्यंत जाऊन दाखवा!

३. हिं. अ. त. डोम्बिवली फास्ट लोकलमध्ये नुसते आत शिरून दाखवा!

४. हिं. अ. त. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याने कुठले पीक घेतले आहे (किंवा होते) हे नुसत्या नजरेने ओळखून दाखवा. त्या शेतकऱ्याशी त्याच्या भाषेत बोलून दाखवा किंवा त्याचे खरेखुरे बोलणे पाच मिनिटे सलग ऐकून दाखवा!

५. हिं. अ. त. आमचे सामनावीर मित्र मा. राऊतसाहेब शेजारी बसलेले नसताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर दिल्लीत वाटाघाटी करून दाखवा! (चहा- बिस्कुटही मिळवून दाखवा.)

६. हिं. अ. त. खराखुरा वाघ घरात पाळून दाखवा! (टीप : फायबरचा चालणार नाही!)

७. हिं. अ. त. गडकिल्ल्यांचे फोटो हेलिकॉप्टरमधून नव्हे, चालत, चढत जाऊन काढून दाखवा!

८. हिं. अ. त. सलग पंचवीस पाणीपुऱ्या किंवा तीन प्लेट बटाटेवडे किंवा पाच प्लेट भेळपुरी एकट्याने खाऊन दाखवा!

९. हिं. अ. त. बारा सूर्यनमस्कार न थांबता घालून दाखवा! (टीप : ही अट रद्द समजावी. बारा सूर्यनमस्कार घालणे आम्हालाही भयंकर अवघड आहे! जाऊ दे.)

१०. हिं. अ. त. मुंबईतील किंवा पुण्यात किंवा नागपुरात किंवा कुठेही रात्री बारा वाजता आमच्या कमळ पार्टीच्या नेत्यांना (पक्षी : मलाच!) गुप्त बैठकीला बोलावून बंद दाराआड चर्चा करून दाखवा!

...वरील दहा आव्हानांपैकी कुठलीही पाच आव्हाने स्वीकारावीत, तसे घडल्यास आम्ही बंद दाराआडल्या सर्व अटी जाहीर मान्य करावयास तयार आहोत. कळावे. 
(अजूनही) आपलाच. नानासाहेब फ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com