स्थळ : मातोश्री हाइट्स. वेळ : रात्रीची निजानीज टाइम.
चि. विक्रमादित्य : (खोलीच्या दारावर टकटक करत) हाय देअर, बॅब्स…मे आय कम इन?
उधोजीसाहेब : (पांघरुणात शिरत) छे…ही काय वेळ झाली? आता उद्या!! गुड नाईट!!
विक्रमादित्य : (दार ढकलून बिनदिक्कत आत येत) कमॉन, बॅब्स…रात्र वैऱ्याची आहे! झोपू नका!!
उधोजीसाहेब : (पांघरुण घेत) वैऱ्याची रात्र असेल तर झोपलेलंच बरं! उगाच कशाला जागायचं? तूसुद्धा दूध पिऊन झोप!!
विक्रमादित्य : (परिस्थितीची जाणीव करुन देत) राजकारणात बरीच उलथापालथ होतेय! शत्रू एकवटतोय!! घड्याळवाले आणि तुतारीवाले एकत्र येऊन आपला बँड वाजवणार असं दिसतंय!! आपण जागे राहायला नको?