ढिंग टांग : तूच कर्ता, तू करविता...!

सर्वप्रथम हे कबूल केले पाहिजे की आम्ही भक्त आहो. नुसतेच भक्त नसून शतप्रतिशत परमभक्त आहो. आम्हाला प्रेरणा देणारी एक दिव्यशक्ती आहे, काही लोक तिजला महाशक्ती असेही म्हणतात.
Dhing Tang
Dhing TangSakal

सर्वप्रथम हे कबूल केले पाहिजे की आम्ही भक्त आहो. नुसतेच भक्त नसून शतप्रतिशत परमभक्त आहो. आम्हाला प्रेरणा देणारी एक दिव्यशक्ती आहे, काही लोक तिजला महाशक्ती असेही म्हणतात. त्या दिव्यशक्तीचा कृपाप्रसाद लाभावा म्हणून आम्ही ट्वेंटीफोर बाय सेवन धडपडतो. ट्वेंटी फोर्टिसेवनपर्यंत हा धडपडाट अखंड सुरु राहील, याची आम्ही हमी देतो.

कुठलीही समस्या आली की आम्ही त्या अपरंपार मायेने भरलेल्या दिव्य शक्तीचे नमोभावे स्मरण करतो. डोळे मिटून हात जोडतो. अगरबत्ती पेटवतो. डावा-उजवा कौल लावतो. कौल लावणे ही तशी दिसायला सोपी, परंतु, अतिअवघड प्रक्रिया आहे. त्यासाठी अंत:करण अतिशय शुद्ध आणि भक्तीने भारलेले असावे लागते. हे फार्फार कठीण असते. अशा दिव्य अवस्थेत दिव्य शक्तीच्या दिव्य चरणकमळांवर आपले मस्तक ठेवावे लागते.

मगच प्रश्न विचारल्यास कौल मिळतो. उदाहरणार्थ : गुरुवार, उदईक प्रात:काळी प्रसाद म्हणून काय सेवन करावे? मिसळ की साबुदाणा वडा? बव्हंशी उजवा कौल मिळतो. ‘वत्सा, उद्या मिसळ खा!’ असे दिव्य शक्तीचे म्हणणे पडते. परंतु, दिव्य शक्ती सांगते की, ‘काहीही खा, पण त्यासाठी स्वत: पैसे खर्च करु नकोस. कां की, पैसा कधीही अस्थानी खर्च करु नये, तो सत्कारणी लावावा.’ मग नाइलाजाने आम्हाला गिऱ्हाईक धुंडाळावे लागते.

त्याच्यासोबत आम्ही निरिच्छपणे मिसळीच्या दुकानीं जातो. मिसळदेखील आम्ही खातच नाही. खाणारे आपण कोण? देणारा वर बसला आहे. ‘देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे’, असे कुणीतरी म्हटलेच आहे. मिसळीचे बिल भरणाऱ्या मित्रालाही दिव्य शक्तीनेच प्रेरित केलेले असते, इतकेच नव्हे, तर ते पैसे त्याच्या खिशात आपसूक येतील, असेही पाहिलेले असते. ती दिव्य प्रेरणाच आम्हाला मिसळ खाण्यास उद्युक्त करते.

लोकांना वाटते, हा इसम किती खादाड आणि निलाजरा आहे! काय हे हपापलेपण, किती खातो हाऽऽ!! सातसात पाव खाते का कुणी? शी:!! पण त्या शिव्यांची लाखोलीही आम्ही सॅम्पलमध्ये बुडवून पाव खावा, तितक्या सहजतेने खातो. निस्संग माणसाला भूक लागत नसते, भूक ही माया आहे, हे त्या अज्ञ जनांना कोण सांगणार? कळेल एक दिवस!! आम्ही काय कुणाचे खातो रे...

दिव्य शक्तीच्या आशीर्वादामुळे आजवर आम्हाला काहीही कमी पडलेले नाही. ‘दाने दाने पर लिखा है खानेवाले का नाम’ हे किती खरे आहे! पाच-पंचवीस रुपड्यांसाठी आम्हाला कधी ब्यांकेत जावे लागत नाही. कोणीही देते! कुणी खळखळ करु लागला तर त्याच्यासमोर जरा जास्त अभिनय करावा लागतो, येवढेच. तसे सोपे आहे. दिव्य शक्तीच्या प्रेरणेने चेहरा लांबट करावा. डोळ्यात पाणी आणावे. आवाज घोगरा काढावा.

संभाव्य दात्याचा मूड बघून रक्कम सांगावी. दोनशे हवे असतील तर कोडगेपणाने एकदम पाश्शेच मागावेत. -पन्नासेक तरी मिळतात. आपण कुठे आपल्यासाठी मागत असतो? त्यात लाज काय वाटून घ्यायची? हा देह मुळात नश्चर. त्यातील आत्मा तर त्या दिव्य शक्तीच्या चरणी ठेविलेला. असली नश्वर कुडी सांभाळण्यासाठी कुण्या दात्याला अन्नदानाचे पुण्य मिळवून देणे, हे आपले कर्तव्य नव्हे काय? पन्नासाची नोट खिशात टाकून पुढे चालते व्हावे...

आजवर दिव्यशक्तीच्या कृपेने सारे यथासांग चालू आहे. कधी कधी वाटते की, आपला जन्म काही सामान्य कामासाठी झालेला नाही. ती अज्ञात दिव्य शक्ती हे सारे आपल्या माध्यमातून घडवते आहे. आपण केवळ निमित्तमात्र.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com