ढिंग टांग : क्या आपने व्होट किया?

मतदान हे रक्तदानानंतरचे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. वेळवखत पाहून आम्ही याच वाक्यात अन्नदानानंतरचे सर्वश्रेष्ठ दान असेही मतदानाचे वर्णन करतो.
Voting
Votingsakal

मतदान करतो तो मनुष्यप्राणी, अशी एक मानववंशशास्त्रातील व्याख्या आहे. ती सर्वमान्य आहे कां की अन्य कुणी द्विपाद अथवा चतुष्पाद अथवा जलचर, नभचर अथवा उभयचर प्राणी मतदान करताना दिसत नाहीत. सुविख्यात मानववंशशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांनी गालापागोस बेटांवर जाऊन उत्क्रांतीचे निरीक्षण केले. त्यांच्या नोंदींमध्येही प्राण्यांच्या मतदानाचा उल्लेख नाही. जिथे माणूस आला, तिथेच मतदान होते!! त्या दृष्टीने पाहू गेल्यास, ज्या कोणी काल रोजीपर्यंत मतदान केले, ते बव्हंशी मनुष्यप्राणी होते, असे म्हणता येते.

मतदान हे रक्तदानानंतरचे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. वेळवखत पाहून आम्ही याच वाक्यात अन्नदानानंतरचे सर्वश्रेष्ठ दान असेही मतदानाचे वर्णन करतो. दुपारची वेळ कुणालाच चुकली आहे? मतदान करणे हे सर्व (जबाबदार) नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे. सुप्रसिध्द जबाबदार क्रिकेटसितारा श्री. सचिनराव तेंडुलकर यांनीही असेच मत व्यक्त करुन सर्वांना मतदानाचे आवाहन करणारा मौखिक संदेश स्वखर्चाने धाडला.

त्यांना ‘थँक्यू, करतो’ असे उलट सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. किंबहुना अशा प्रयत्नांचे आम्ही शतक ठोकले. परंतु, व्यर्थ! सचिनरावांना आमचा संदेश पोचू शकला नाही. श्रीयुत संजय दत्त, हृतिक रोशन, फरहान अख्तर आदी जबाबदार नागरिकांनीही मतदान करुन चाहत्यांना बोटे उंचावून दाखवली. ‘आम्ही केले, तुम्हीही करा’ असे ते आवर्जून म्हणाले. केवढे हे सामाजिक भान!!

अक्षय कुमार यांनी तर पहिल्यांदा मतदान केले म्हणे! अशा फर्स्ट टाइम व्होटरांचे आपण स्वागत केले पाहिजे, कारण तेच भविष्यातील भारताचे आधारस्तंभ आहेत. लोकशाही टिकवण्यासाठी या ताऱ्यासिताऱ्यांचे योगदान अपूर्व आहे. अतएव आम्ही सर्वांप्रति कृतज्ञ आहो.

मतदान केंद्रावरील वातावरण हमेशा अत्यंत उत्फुल्ल असते. आपण देशासाठी रांगा लावून ऱ्हायलो आहो, ही प्रखर राष्ट्रभावना रांगेतील सर्वांच्याच मनात असते. रांगेत उभे राहून मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या चुका हुडकणे, हा एक चांगला वेळ घालवण्याचा उद्योग आहे, याचा साक्षात्कार आम्हाला रांगेतच झाला. इतर सर्व बूथ रिकामे असून, आपल्याच मतदान केंद्रावर येवढी गर्दी का? असा प्रश्न पडतो. अन्य केंद्रांवर अत्यंत निष्णात निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली असून, आपल्या वाट्याला आलेल्या केंद्रावर मात्र निव्वळ कामचुकार कर्मचाऱ्यांचा भरणा केला आहे, याची खात्री वाटू लागते. हेच तर लोकशाहीचे सौंदर्य म्हणायचे.

आम्ही मतदान कां करतो? या प्रश्नाची विविध उत्तरे मिळतात. बोटांवर शाई लावावयास भेटते, असेही एक कारण आम्ही ऐकले. मतदान केंद्रावरील बोटास शाई लावणाऱ्या बाई अत्यंत निर्दयपणे फसकिनी डाव्या तर्जनीच्या नखावर फराटा ओढतात, त्याने मनास अतिशय वेदना होतात. लोकशाहीची शाई जरा नजाकतीने लावावी, याचे जरासुद्धा भान त्यांना नसते. हे गैर आहे!

तथापि, मतदान केल्यानंतर आणखी एक अत्यंत महत्त्वाची कृती करावी लागते. तशी ही कृती सोपी आहे. पण ती स्टेप बाय स्टेप येणेप्रमाणे करावी. एक, बोटास शाई लावून झाली की केंद्राबाहेर यावे. दोन, चांगलीशी पार्श्वभूमी बघून मोबाइल फोन काढावा.

तीन, क्यामेरा ऑन करुन सेल्फीचे बटण दाबावे. आणि चार, क्लिक! क्लिक!! चांगलासा फोटो ताबडतोब समाजमाध्यमांवर टाकावा. आणि सेलेब्रिटी सिताऱ्यांसारखेच अन्यजनांस विचारावे, ‘‘हमने किया, क्या आपने व्होट किया?’

…त्या क्षणापुरते तरी आपण सेलेब्रिटी असतो. मतदानयंत्राचे बटण आणि सेल्फी क्यामेऱ्याचे बटण…ही दोन बटणे नसती, तर आपल्या महान लोकशाहीचे काय बरे झाले असते? नुसत्या कल्पनेदेखील अंगावर शहारा येतो. असो. लोकशाही चिरायु होवो!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com