ढिंग टांग : मी पुन्हा जाईन..!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) ‘मी पुन्हा येईन’ असे म्हटले होते. त्याप्रमाणे मी पुन्हा आलो, पण पुन्हा का आलो?
Dhing Tang
Dhing Tangsakal

(डायरीतले एक पान)

आजची तिथी : क्रोधी संवत्सर श्री शके १९४६ ज्येष्ठ शु. पंचमी.

आजचा वार : ट्यूसडेवार

आजचा सुविचार : दुखी मन मेरे, सुनो मेरा कहना, जहां नहीं चैना, वहां नहीं रहना..!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) ‘मी पुन्हा येईन’ असे म्हटले होते. त्याप्रमाणे मी पुन्हा आलो, पण पुन्हा का आलो? याचा पुन्हा पुन्हा पश्चात्ताप होत असल्यामुळे आता मी पुन्हा जाईन असे मनातल्या मनात म्हणू लागलो आहे. पुन्हा यावे, की पुन्हा जावे? पुन्हा जावे आणि पुन्हा यावे? पुन्हा पुन्हा यायचे, तर मग जायचेच कशाला? पुन्हा पुन्हा जायचे आहे, तर यायचेच कशाला?... पार गोंधळून गेलो आहे. काय क्रावे ब्रे?

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत होत्याचे नव्हते झाले. जे कधीही होणार नाही, ते घडले. जिसे हमेशा जीतने की आदत है, उसे हारना मंजूर नही होता! तरीही आमची निवडणुकीत वाट लागली. मी खट्टू झालो. ‘मला मोकळे करा’ असा निरोप पू. मोटाभाई आणि वं. नड्डाजींना पाठवला. त्यांनी ‘येऊन भेटा’ असे सांगितले. त्या प्रमाणे भेटलो, पण मी काही काळ हवापालटासाठी लंडनला वगैरे जाऊन यावे, म्हणून म्हणतो आहे असे त्यांना वाटले. हे म्हणजे राजीनामा देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला बॉसने भरपगारी सुट्टी मंजूर केल्यापैकी झाले! असो.

पुन्हा यावे? की, जाऊन पुन्हा यावे? या विचारात मी एकटाच घरी बसलो असताना कर्मवीर भाईसाहेबांचा निरोप आला की, ताबडतोब एकत्र दौऱ्यावर निघायचे आहे. बारामतीचे दादासाहेबही तयार झाले आहेत. अवश्य यावे. त्या प्रमाणे मी गेलो...

कोस्टल रोडवरल्या बोगद्यातून आम्ही तिघांनी प्रवास करायचा बेत ठरला होता. मागल्या खेपेला मी आणि भाईसाहेबांनी समृद्धी महामार्गावर सुसाट गाडी चालवली होती, तेव्हा आम्ही दोघेच होतो, बारामतीकर ‘जॉइन’ झाले नव्हते, पण तेव्हा गाडीचे चाक माझ्या हाती होते. या वेळी मला मागल्या सीटवर बसवण्यात आले!! अहह!!

उघड्या टपाची व्हिंटेज मोटार होती. मोटारींचा ताफा होता. समोर टीव्ही-कॅमेरेवाले गाडीच्या टपावर बसून शूटिंग करत होते, तेव्हा गाडीत आमचा संवाद झाला तो असा :

दादासाहेब : (कपाळाला हात लावून) सगळा घोटाळा झाला! झुणका खाल्ल्याचं निमित्त झालं आणि -

भाईसाहेब : (समजूत घालत) तुम्ही असं म्हणालात, तर आम्ही काय म्हणावं? हे नानासाहेब होते, म्हणून मी डेरिंग केली!

दादासाहेब : (माझ्याकडे जळजळीत नजर टाकत) मी पण!

भाईसाहेब : (नाराजीनं माझ्याकडे बघत).... आणि हे नानासाहेब म्हणतात, मी पुन्हा जाईन!!

दादासाहेब : (खोल आवाजात) मग आम्ही कुठं जावं? आम्हाला वाऱ्यावर सोडू नका, नानासाहेब!

भाईसाहेब : (सल्ला देत) माझं ऐका, गुवाहाटीला एकदा कामाख्यादेवीला जाऊन या! पावेल!!

दादासाहेब : (चिडून) पण तुम्ही का जाताय? आपलं काय वाईट चाललंय?

... त्याच वेळेला माझा कोस्टल रोडवरच्या वाऱ्यावर नेमका डोळा लागला. समुद्रावर भणाणलेले वारे वाहात होते. आभाळात पावसाचे ढग होते, पण माझे मन अजिबात लागत नव्हते. कसाबसा प्रवास करून घरी परतलो.

‘मी पुन्हा येईन’ असे म्हटले, तेव्हा सगळ्यांनी माझी चेष्टा केली. ‘मी पुन्हा जाईन’ असे आता म्हणतो आहे, तर त्याचीही चेष्टा करतात, पण मी खमक्या आहे. मी पुन्हा जाईन तो परत येण्यासाठीच हे साऱ्यांना ठाऊक आहे. या येण्या-जाण्यालाच राजकारण म्हणतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com