ढिंग टांग : बार्गेनिंग पॉवर ऑफ मराठी मॅन..!

कर्मवीर भाईसाहेब (मु. पो. ठाणे.) यांसी, कुणी कुणाला किती वेळा शपथ द्यावी, हा अधिकार लोकशाहीने ज्याला त्याला दिला आहे. त्यावर काही बोलण्याचा अधिकार मला नाही, आणि माझे आडनाव काही राऊत नाही.
eknath shinde and ajit pawar
eknath shinde and ajit pawarsakal

कर्मवीर भाईसाहेब (मु. पो. ठाणे.) यांसी, कुणी कुणाला किती वेळा शपथ द्यावी, हा अधिकार लोकशाहीने ज्याला त्याला दिला आहे. त्यावर काही बोलण्याचा अधिकार मला नाही, आणि माझे आडनाव काही राऊत नाही. पण शपथविधी सोहळ्यात आपला एकही माणूस नव्हता, हे माझ्या मनाला फार लागले आहे. समारंभाच्या वेळी शेजारच्या खुर्चीत आमचे प्रफुल्लभाई बसले होते.

ते कॅबिनेट दर्जा द्यायला तयार नाहीत. राज्यमंत्रिपद घ्या असे सारखे सांगत होते. मी प्रफुल्लभाईंच्या कानावर घातले. त्यांच्या डोळ्यात पाणीच आले. ते म्हणाले की, राज्यमंत्रिपद घेतले की माझे डिमोशन होईल. मी पहिल्यापासून कॅबिनेट दर्जाचाच माणूस आहे.

...मी गर्दीत बघितले. तुम्हाला खाणाखुणा करत होतो. पण तुम्ही दुर्लक्ष केले, तेही माझ्या मनाला फार लागले. बहात्तर लोक शपथ घेतात, आणि त्यात आपला एकही मेंबर नाही, हे काही बरोबर झाले असे मला वाटत नाही. विरोधी पक्ष खिजवू लागले आहेत. तुमच्या त्या फेमस राऊतसाहेबांनी तर ‘दादासाहेबांच्या हातात भोपळा मिळाला’ असाच टोमणा मारला. टोमण्यांची मला सवय झाली आहे, म्हणा. पण सीट मिळायला हवी होती, हे मात्र खरे.

मराठी माणसाची बार्गेनिंग पॉवर कमी पडते, हे शंभर टक्के सत्य आहे!

आपले दोघांचे मित्र नानासाहेबही गर्दीत हाताची घडी घालून बसले होते. त्यांनी ओळखही दाखवली नाही. पुढल्या वेळेस मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत वाट बघणे आले! आता काय, एकूणच वाट बघायचे दिवस आले आहेत. सवय करायला हवी. बाकी भेटीअंती बोलूच.

आपला विनम्र दादासाहेब (बारामतीकर)

वि. सू. ः शपथविधी सोहळ्याच्यावेळी शाहरूख खानाने अक्षय कुमारला मिठी मारली ते तुम्ही पाहिले का? मिठी मारताना ते एकमेकांच्या कानात कुजबुजताना माझ्याकडे पाहत होते... मी मान फिरवली! असो.

प्रिय दादासाहेब, जय महाराष्ट्र! शपथविधी सोहळ्यात मी तुम्हाला बघितलेच नाही. माझे लक्ष दुसरीकडेच होते. प्रफुल्लभाईंना मी हात केला, आणि ‘किती?’ असे विचारले. त्यांनी अंगठा हलवून ओठ काढला. मला वाटते, रुमाल काढून डोळेही पुसले. एकेक मंत्री येऊन शपथ घेत होता, तेव्हा त्यांचा चेहराही पडत होता. माझ्या पलीकडच्या रांगेत कोकणचे सुपुत्र नारायणदादा राणेजी बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तर ‘आवशीक खाव, शिरा पडो यांच्या तोंडार’ असे उद्‍गार मला स्पष्टपणे दिसले. आपली अवस्था त्यांच्यापेक्षा थोडी तरी बरी आहे. त्यांनीही ‘किती?’ असे विचारताच मी एक बोट दाखवले. त्यांनी ‘मजा आहे!’ अशी खूण केली.

एकंदरीत बार्गेनिंगमध्ये मराठी माणूस कमी पडतो, हे आता माझ्याही लक्षात आले आहे. साडेतीन वर्षांपूर्वी माझा गैरसमज झाला होता. मी कॅबिनेट मागितली होती, दोनेक राज्यमंत्रिपदेही मिळतील तर बरे, अशी सुरवात केली होती. पण एक मिळाले! तेही राज्यमंत्रिपद! हे म्हणजे होम डिलिव्हरीने घरात छान मिक्सर मागवावा, आणि आलेल्या पार्सलच्या खोक्यात चपला निघाव्यात, त्यापैकी झाले! खोके खोके, ओरडून शेवटी आमचे खोके रिकामेच निघाले!!

जाऊ द्या, झाले! आपण दोघेही समदु:खी आहोत. आमचा एनडीएला भक्कम पाठिंबा आहे, असे जाहीर करून हसतमुख राहिलेले बरे!! त्यातच आपले (सध्या तरी) हित आहे. बाकी बोलूच.

आपला. कर्मवीर भाईसाहेब (मु. पो. ठाणे.)

ता. क. - सोहळ्यामध्ये शाहरुख खानाने अक्षय कुमारला मिठी मारली ते मी पाहिले, पण तेव्हा ते माझ्याकडे बघून बोलताहेत, असा माझा समज झाला!! असो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com