कालपर्यंत केरळातील अलेप्पीच्या किनाऱ्यावर टहलणाऱ्या मोसमी पावसाने रातोरात पुणे-मुंबई गाठून दाणादाण उडवावी, अवघाचि पोपट व्हावा, हे काही शाश्वत विकासाचे लक्षण नव्हे. पावसाने मुळात असे बेभरवशी वर्तन करावे, ही बाबच धिक्कारार्ह आहे..गेल्या तीन-साडेतीन वर्षात महाराष्ट्रात जो गतिमान विकास झाला त्याचा रातोरात बोऱ्या वाजणे चांगले का? याचा दोष कोणाला द्यावा? पस्तीस वर्षे मुंबईवर राज्य करणाऱ्या पक्षाच्या नेत्यांवर खापर फोडावे? की गेल्या तीन-साडेतीन वर्षात गतिमान विकासाचा जागतिक कीर्तीमान स्थापणाऱ्या महायुतीला दोषी ठरवावे?.आम्हांस विचाराल तर सारा दोष हवामानाचा आहे. अर्थात असे घडू शकते, याचा अंदाज आम्हाला होताच. म्हणूनच जेव्हा मुंबईत वरळीचे मेट्रो स्थानक बदाबदा गळू लागले आणि पुण्यातचौकाचौकात वाहतुकीच्या कोंड्या झाल्या, तेव्हा आम्ही घरात बसून गालातल्या गालात हसत होतो….हवामान अंदाजांचा आमचा अंदाज उपग्रह अवकाशात सोडण्यापूर्वीपासूनच अचूक येत आलेला आहे. पाऊस येईल काय? या प्रश्नाचे उत्तर आम्ही निव्वळ मान डोलावून देऊ शकतो, हे कोणीही आमच्या आडनावाकडे बघूनच सांगेल!! केरळापर्यंत आलेला पाऊस रातोरात मुंबई-महाराष्ट्रापर्यंत थडकला.कालपर्यंत ज्यास अवकाळी पाऊस म्हणत होतो, तोच नेमका मोसमी निघाला, हे गूढ अनेकांना कळले नाही, यात आश्चर्य नाही. आमच्यासारख्या व्यासंगी, द्रष्ट्या आणि शुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या नामांकित हवामानशास्त्रज्ञांस काही कळले नाही, तेथे सामान्यजनांचा काय पाड? (संदर्भ : ‘पाऊस पाड गा पाऊस पाड’ हे गीत) मुळात मोसमी पाऊस म्हंजे काय, हे मुळातून तपासायला हवे..मोसमी पाऊस सर्वसाधारणपणे वरून खाली पडतो. परंतु, वारे वाहू लागले तर तो तिरकाही पडतो, असे निदर्शनास आले आहे. समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने केरळातून निघालेला पाऊस वाऱ्यांनी सुपरस्पीडने महाराष्ट्रात आणला. एका रात्रीत वंदे भारत ट्रेन कोचीहून मुंबईत येत नाही, पाऊस कसा आला? तो मॅगलेव तंत्रज्ञानाने आला असेल्का? हे तपासून पाहणे गरजेचे आहे. कमी दाबाचा पट्टा हा एक सामान्यजनांना न कळणारा हवामानाशी संबंधित एक प्रकार आहे..आम्ही सोप्या भाषेत समजावून सांगू! कमी दाबाचा पट्टा म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून जुना कमरेचा पट्टा होय! पट्ट्याच्या जवळच्या छिद्रात क्लिप गेल्यास कमी दाबाचा पट्टा तयार होऊन पाटलोण घसरते आणि अनवस्था प्रसंग गुदरतो. मुंबईकरांच्या विकासाचे तस्से झाले. विकासाची प्यांट नवी असूनही पट्टा कमी दाबाचा निघाल्याने घसरली!!.सामान्य वाचकांना मॅडन-ज्युलियन दोलनाचा सिध्दांत माहीतच असेल. त्यात वेगळे काय सांगायचे? त्यामुळे त्या तपशीलात शिरून आम्ही वेळेचा, जागेचा आणि शब्दांचा अपव्यय करणार नाही. या मॅडन-ज्युलियन दोलनामुळे अतिवेगाने केरळातून पाऊस महाराष्ट्रात खेचला गेला, असे सांगितले जाते.असेल बुवा! हिंदी महासागर आणि पॅसिफिकमध्ये हा प्रकार आढळून येतो, असे मॅडन आणि ज्युलियन दुक्कलीने १९७१ मध्ये शोधून काढले. काही गरज होती? जी गोष्ट आमच्याकडचे नंदीबैलही रवंथ करता करता सांगू शकतात, त्यासाठी ही खिल्लारी जोडी कशाला हवी? जाऊ दे..नाही तरी, पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करून आपल्या श्रेष्ठ परंपरा, वैज्ञानिक शोध विसरण्याचेच हे युग आहे... मुद्दा एवढाच की जो अवकाळी पाऊस होता, तो अवकाळी नव्हताच. तो पूर्वमोसमी होता, असे जे (नंतर) म्हटले गेले तोही मोसमीच होता. मोसमी असूनही तो मे महिन्यात म्हणजे बेमोसमीच आला. अचानक आलेल्या बेमोसमी पावसामुळेच हवामान खात्याचा अंदाज चुकला, असे आमचे अनुमान आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.