पावसानं जीव काढला आहे. बघावं तिकडं वलंचिक्कं झालंय. वेटोळा मारुन पडणार कुटं? शेवटी अंग झाडून कोतवाल उद्यानातल्या बाकाखालून उठलो आणि चालत चालत हनुमान मंदिराशी आलो. बघतो तर कबूतरखान्यावर ही मोठ्ठी ताडपत्री घातलेली..तरी अजून आजूबाजूला दोनचार कबुतरं घोटाळत होती. जाम लोचट जात! सौराष्ट्र फरसाणवाल्याच्या शेडवर बसलेला मजनू पारवा बोलला की, ‘भाई, आजकल अपुनका दानापानी बंद हय, क्या करनेका? गर्दन घुमाघुमाके परेशान होगएला हय..,’’ खरंच, हितल्या कबुतरांची जाम गोची झाली आहे. भुकेकंगाल कुटे कुटे उडत असतात.कुटं जातील? काय खातील? खिडकीवर बसून आचरट धंदे करण्याची खोड काही जात नाय यांची. आता बरी अद्दल घडली… आम्ही बरे! भाद्रपद आला की विषय सुरु आणि भाद्रपद संपला की विषय बंद! ही कबुतरं च्यामारी, बारमाही…जाऊ दे. जैसी करनी, वैसी भरनी!.…हनुमान मंदिराशी लेफ्ट घेऊन दादर टेशनपाशी येयाला लागलो, तेव्हाच फंट्या भेटला. शेपूट हालवत उभा ऱ्हायला. बोल्लो, ‘क्यूं फंट्याभाई, क्या हुआ म्याटर?’ फंट्यानं लश्शीवाल्याकडे तोंड फिरवलं, म्हनाला, ‘ऐची जय, साली खऱ्याची दुनियाच नाय ऱ्हायली. कालपरेंत कबुतरांची कल्हई चाल्ली होती, आता हे आपल्यावर घसरनार. अंडरग्राऊण्ड व्होयाला लागनार..!’फंट्या बरंच काय काय सांगत होता. पन आपलं लक्ष पलिकडल्या फूटपाथवरुन चाललेल्या भुरीकडे!! भुरी स्वताला लई शाणी समजते. लांब क्येसांचा क्येवडा माज!! तरी बरं जिंदगी हितेच फूटपाथवर गेली, दाकवते अशी की वरळी सीफेसच्या म्याडमची लाडकीच आहे..पन आहे एकदम आयटम! जुहू साइडला असती, तर फिल्म लायनीत गेली असती. फंट्यानी खबर काढली की, दिल्लीत धा लाख कुत्तेलोकांना जेलात टाकनार, रस्त्यांवर हुंगत येयाचं नाही, की काहीच नाही…कोर्टानंच आर्डर काढून दिल्लीत कुत्तेलोकांना वन फॉर्टीफोर लावलाय!‘दिल्लीत मोटाच कांड झाला काय? येवडा काय झाला?,’ डिशिल्वाच्या साइडनं येऊन उभा ऱ्हायलेल्या कानखाजव्याकडं माझं ध्यानच नव्हतं. कानखाजव्यासारखा घानेरडा कुत्रा होल बॉम्बेत नसंल. बगावं तिकडं गोचिड्यांची कॉलनी घेऊन फिरतो. जवळ आला तरी वास मारतो. तरी त्याची लाइन भुरीकडेच..औकात विसरुन जगणाऱ्या असल्या सडकछाप कुत्र्यामुळेच आम्ही फुकाफुकी बदनाम झालो. मी वैतागून त्याला बोल्लो, ‘छोड यार, वो भुरी तेरे बस की बात नै! अब तू इधरसे व्हंटास की गोली ले, मुन्सिपाल्टीवाले पैले तेरकूच पकडेंगे!’‘मार गोली मुन्शिपाल्टीवालों को…त्यांच्या पिंजऱ्याच्या गाडीत तीनदा जाऊन इज्जतीत परत रिटर्न आलोय! चार दिवस नाटक करतात, छोड याऽऽर, ‘मागल्या पायानं फुडचा कान खाजवत कानखाजव्यानं वार्ता केली. येवडी मस्ती बरी नाय, हे आपण त्याला सांगणार होतो, पण बोल्लो, जाव दे. कुटे या कुत्र्यांच्या तोंडी लागणार?.तेवढ्यात तांबूस रंगाचा बंटी कुटून तरी तोंडात पिझ्झाचा तुकडा घेऊन आला. आम्ही सगळे त्याच्यावर तुटून पडलो. पिझ्झा गेला कुटल्या कुटे. पिझ्झाच्या एका तुकड्यावरुन पाच-पंधरा कुत्तेलोग भिडले. फुल्ल गँगवॉर!! टॅक्सीवाले, भाजीवाले, दुकानवाले, सगळे हातात दगड, दांडके घेऊन धावून आले. ‘हाड हाड हाड’ आवाज घुमले.शेपूट दाबून भुंकत भुंकत मी नीट पोर्तुगीझ चर्चच्या साइडचा रस्ता नापला. म्हटलं, मरो तो पिझ्झा, मरो ती दुनियादारी! आपुण बरं, आपली जिंनगानी बरी. भाद्रपद उलटेपरेंत तरी नीट शिस्तीत ऱ्हायलं पायजे. नायतर- दिल्लीतलं पॉलिटिक्स गल्लीत आलं की आयशप्पत जीव जातो!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.