esakal | ढिंग टांग : परीक्षा पे चर्चा : एक भावानुभव!

बोलून बातमी शोधा

dhing tang

दिवसभर टुकत बसलो होतो. सायंकाळी साक्षात प्रधानसेवक श्रीश्रीनमोजी स्वत: विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी टिप्स देणार, या वृत्ताने मनाला आधार वाटत होता. पोरास दोनदा आंघोळ घालून टीव्हीसमोर बसवले.

ढिंग टांग : परीक्षा पे चर्चा : एक भावानुभव!
sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

दिवसभर टुकत बसलो होतो. सायंकाळी साक्षात प्रधानसेवक श्रीश्रीनमोजी स्वत: विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी टिप्स देणार, या वृत्ताने मनाला आधार वाटत होता. पोरास दोनदा आंघोळ घालून टीव्हीसमोर बसवले.
‘‘ते काय सांगतात ते नीट ऐक! नोट्स घे!!’’ पोराला बजावले. एवढा मोठा गुरु स्वत: ‘परीक्षा पे चर्चा’ करतो आहे, आपणही तयार नको का? पोराने मान डोलावली.
‘‘ते गणिताचा पेपर फोडतील का?’’ मुलांचा निरागसपणा कधी कधी फार अंगावर येतो. त्यातलाच हा एक हिंसक प्रश्न. अगदीच पेपर फोडणार नाहीत, पण एकदोन प्रश्न कदाचित सांगतील, असे कुटुंबाचे सर्वसाधारण मत पडले. माणसाने आशावादी असले पाहिजे.
‘‘प्रश्न विचारण्यापूर्वी त्यांना ‘प्रणाम’ म्हणायचं हं! ‘हाय देअर’, ‘हे ड्यूड’ असलं काहीही म्हणायचं नाही! फटके देईन!!,’’ आम्ही काळाची पावले ओळखून दम देऊन ठेवला.
‘‘आजोबा म्हणू का?’’ आणखी एक निरागस, पण हिंसक प्रश्न. कधी एकदा हा ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम उरकतो, असे वाटू लागले.
...आणि अखेर सायंकाळ उजाडली.
...टीव्हीच्या पडद्यावर एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व झळाळून उठले. ते तेज सहन न होऊन आम्ही टीव्हीचा ब्राइटनेस थोडा कमी केला. शुभ्र दाढी, शुभ्र भिवया, शुभ्र डोई... एका प्रशस्त बंगल्याच्या हिरवळीवर तो तारणहार सुहास्य वदनें उभा होता...
‘‘द्रोणाचार्य!’’ पोरगे भान हरपून ओरडले. आमचा इलाज नव्हता. गेल्या लॉकडाऊनमध्ये नतद्रष्टाने संपूर्ण महाभारत मालिका टीव्हीला नाक लावून पाहिली होती.
‘‘परीक्षा के काल में बच्चे कुछ ठीक से खाते नहीं! प्लेट में आधा छोड देते हैं! अच्छा पोषण नहीं हुआ तो उनके परिश्रमपर असर पडता है! उन्हे क्या खिलाया जाए?’’ एका विद्यार्थ्याच्या मातेने अपराधी चेहऱ्याने प्रश्नवजा तक्रार केली. तिचे पोर चांगलेच वाभरे असणार!! आम्ही अन्न टाकले की आमचे अन्नदाते पालक भरल्या ताटावर बसलेल्या अवस्थेतच लाथलत असत, ते आठवून आमच्या डोळ्यात पाणी आले...असो.
‘‘...त्याला शेतात घेऊन जा. अन्न कसे पिकते ते दाखवा. दुकानात न्या, कसे आणि किती पैशाला विकले जाते, ते दाखवा. मग पदार्थ घरी तयार करुन दाखवा. एका पदार्थासाठी कितीजणांची मेहनत लागते ते त्यांना कळू द्या...,’’ श्रीश्रीनमोजींनी सल्ला दिला. शिक्षण, शिक्षण म्हणतात ते हेच बरं!! मुलांना कृषी उत्पन्न बाजार समितीत नेऊन घाऊक व्यवहार कसे होतात, हेही दाखवा, हे त्यांनी सांगायला हवे होते, असे वाटले. पण ते असो.
परीक्षा ही आधीच ठरलेली असल्यामुळे तिचे टेन्शन घेण्याचे काहीच कारण नाही. ते काही संकट नव्हे! परीक्षा ही उलट एक मज्जा असते. ज्ञान हेच मनोरंजन असते. माणसाने डोळे, कान आणि मेंदू उघडे ठेवून सारे काही निरखावे... असे कितीतरी बहुमोल सल्ले घरबसल्या मिळाले. ‘परीक्षा हे संकट असल्याचे काही पालकच मुलांवर बिंबवतात’ असे त्यांनी सांगितल्यावर आम्ही च्यानल चेंज करण्याचा प्रयत्न केला. पण तो फेल गेला. कारण सगळ्याच च्यानलांवर ‘परीक्षा पे चर्चा’ सुरु होती. अखेर दोन-अडीच तासांनी हा तास थांबला.
...इतका वेळ टीव्हीसमोर निम्यूटपणे बसून राहिलेल्या पोराकडे बघून भडभडून आले. ‘किती भोगता रे...आमच्यावेळी असं नव्हतं!’’ असे मनातल्या मनात म्हणून त्याला मायेने एक टप्पल मारली.