ढिंग टांग : आता तरी, दोनशेवरी..!

नुकत्याच होऊन गेलेल्या लोकसभा निवडणुकीत करारी हार पदरात पडल्यानंतर महायुतीमध्ये बरेच मंथन झाले. आत्मपरीक्षण झाले.
Dhing Tang
Dhing Tangsakal

नुकत्याच होऊन गेलेल्या लोकसभा निवडणुकीत करारी हार पदरात पडल्यानंतर महायुतीमध्ये बरेच मंथन झाले. आत्मपरीक्षण झाले. आत्मक्लेशदेखील झाले. कारण आत्मचिंतनही करा, असा आदेश दिल्लीतील आत्मनेत्यांनी दिला होता. पराभवाचे विश्लेषण करुन झालेल्या चुका टाळून अजिबात गाफील न राहता आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवण्याचा संकल्प महायुतीने सोडला.

माटुंग्याच्या षण्मुखानंद हॉलमध्ये महायुतीची त्रिमुखे बोलली. आनंद वाटला. यापुढे या हॉलला त्रिमुखानंद हॉल असे नाव ठेवावे, असा प्रस्ताव आहे. असो. आत्मचिंतन यथायोग्य पार पडिले. त्रिमुखांमधून बाहेर पडलेल्या विचारदुग्धातील नवनीत येथे ठेवीत आहो.

कर्मवीर भाईसाहेब : आत्मचिंतन करावेच लागते. मी नेहमी करतो. मागल्या खेपेला गुवाहाटीला जाऊन केले होते. त्याचा फायदा झाला. गुवाहाटी ही आत्मचिंतनासाठी उत्तम जागा आहे, असे माझे मत मुंबईत परत आल्यानंतर झाले. लोकसभा निवडणुकीत ‘अबकी बार चारसोपार’ अशी घोषणा देण्यात आल्याने सगळा घोळ झाला. कार्यकर्ते आपापल्या घरी निघून गेले!!

यावेळी जागांचा आकडा जाहीर करण्याच्या फंदात आपण पडू नये, असे वाटते. त्याऐवजी ‘मतदार माझा लाडका’ ही योजना जाहीर करुन संकल्पपत्राच्या मुखपृष्ठावर माझा फोटो छापावा, दोन-सव्वादोनशे जागा कुठे जाणार नाहीत. हे गतिमान सरकार आहे. लोकांच्या मनातले सरकार आहे, घरात बसून राहणारे सरकार नाही. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. जागांचा आकडा जाहीर न करता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मात्र जाहीर करुन टाकावा, असे वाटते. अर्थात आपण काही दिल्लीतील महाशक्तीच्या शब्दाबाहेर नाही.

वि. सू : अन्य दोन पक्षांना तडजोड करावी लागेल, हे नक्की.

बारामतीकर दादासाहेब : आधी मी खूप आत्मचिंतन करत असे, पण महायुतीत आल्यापासून एखादा माणूस विडी किंवा तंबाखू सोडतो, तसे मी आत्मचिंतन सोडले. मुळात काही ठरवूच नये, या मताचा मी आहे. जागाही ठरवू नका, आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहराही जाहीर करु नका. भानगडच नको. उगाच काही तरी गमज्या मारायच्या आणि नंतर तोंड लपवत फिरण्याचा उद्योग सांगितला आहे कोणी?

आपल्या तिघांमध्येच समन्वयाचा अभाव असल्याने लोकसभेत बेक्कार पराभव झाला. इतका बेक्कार की मी बारामतीलाही रात्री जाऊन पहाटेच निघतो!! पन्नासपार, शंभरपार, दीडशेपार, दोनशेपार…असला पाराचा पाढा न म्हणता गपगुमान आली तशी निवडणूक लढवावी, असे माझे प्रामाणिक मत आहे. हिते एक सीट येताना मारामार, आणि दोनशेपार कसले जाताय?

वि. सू. : अन्य दोन पक्षांना तडजोड करावी लागणार यात शंका नाही.

फडणवीस नानासाहेब : मी अगदी करेक्ट आत्मचिंतन करुन आलो आहे. लोकसभेच्या वेळी आपण तीन पक्षांशी लढलो, पण चौथ्या पक्षाशी लढलोच नाही. मी बाळासाहेब आंबेडकरांच्या ‘वंचित’बद्दल बोलतोय, असे कोणाला वाटेल, पण मी ‘एफएनपी’ ऊर्फ फेक नॅरेटिव पार्टीबद्दल बोलत आहे. आपले विरोधक खोटे बोलत राहिले, आणि आपण गाफील राहिलो. रोज सकाळी नऊ वाजता टीव्हीवर येऊन आपले विरोधक काहीही खोटेनाटे बोलतात.

माध्यमे ते दिवसभर दाखवतात. त्यामधून फेक नॅरेटिव तयार होते. यावेळी आपण गाफील राहता कामा नये. दोन लाख मते जास्त मिळवून महाविकास आघाडीने ३० जागा मिळवल्या. आपण २० लाख मते मिळवून दोनशे जागा सहज जिंकू!! हे अगदी सोपे गणित आहे. चला, मी पुन्हा आलो, तसे तुम्हीही पुन्हा या, पुन्हा या, पुन्हा या!!

वि. वि. सू. : तडजोड सगळ्यांनाच करावी लागणार, विशेषत: अन्य दोन पक्षांना!!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com