ढिंग टांग : सारे काही काळजीपोटी!

ढिंग टांग : सारे काही काळजीपोटी!

बेटा : (नेहमीच्या उत्साहात) ढॅणटढॅऽऽण…मम्मा, आयॅम बॅक!

मम्मामॅडम : (थंडपणे) हं!

बेटा : (खुर्चीत बसकण घेत) हुश्श! सुटलो!! आता आरामच आराम! जरा काहीतरी मस्तपैकी खायला कर!

मम्मामॅडम : (कागदपत्रे हातावेगळी करण्यात मग्न…) आधी हात साबणाने धुऊन घे! आणि निवडणुकांच्या काळात आपल्याला कसला रे आराम? कुठून येतोयस?

बेटा : (आरामशीर बसत) निवडणुकांच्या प्रचार दौऱ्यावर गेलो होतो! हेच आसाम बिसाम! धमाल दौरे चालू होते! जावं तिथं हीऽऽ गर्दी! सगळे म्हणायचे, ‘एकदा आमच्या मतदारसंघातही येऊन जा ना! तुम्ही येऊन गेलात की सीट शुअर होऊन जाते! हाहा!!

मम्मामॅडम : (विषय बदलत) काय म्हणतेय निवडणूक?

बेटा : (आत्मविश्वासपूर्वक) आपण जिंकतोय नक्की, पण आता यापुढले माझे सगळे दौरे क्यान्सल! मम्मामॅडम : (आश्चर्यानं) का बुवा?

बेटा : (गांभीर्यपूर्वक) कारण मी एक जबाबदार नागरिक आहे! मला माझ्या देशवासीयांची काळजी आहे! मी असा प्रचाराचे दौरे करत बसलो तर या लोकांना किती जड जाईल, याची कल्पना आहे?

मम्मामॅडम : (कणखरपणे) विरोधकांची इतकी काळजी करण्याची काहीही कारण नाही! गेली सहासात वर्ष त्या लोकांनी आपली काही काळजी केली का? हुं!!

बेटा : (खुलासा करत) विरोधकांची नाही, मला जनतेची काळजी आहे! मला बघण्यासाठी लोक किती गर्दी करतात, हे तुला माहीतच आहे! मी जातो तिथे तुफान गर्दी होते. उमेदवार माझ्या मागे लागतात, ‘साहेब, आमच्या मतदारसंघात एक सभा घ्या, सीट नक्की होऊन जाईल!’ मग माझाही नाइलाज होतो! माझ्याशी हात मिळवण्यासाठी सामान्य मतदार अक्षरश: धडपडतात! कोरोनाच्या काळात हे किती घातक आहे, हो की नाही?

मम्मामॅडम : (कौतुकानं) शाब्बास! म्हणून तू दौरे रद्द केलेस? एवढा समंजसपणा आहे का त्यांच्या एकाच्यात तरी! जाऊन विचारा त्यांना!!

ढिंग टांग : सारे काही काळजीपोटी!
राहुल गांधींचा मोठा निर्णय ते जेईई परिक्षा स्थगित...वाचा एका क्लीकवर

बेटा : (रेलून बसत) येस, मम्मा, परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे! ना औषधं,ना ऑक्सिजन, ना इस्पितळात खाटा, ना डॉक्टर्स, ना नर्सेस! हे नमोसरकार फेल आहे फेल! मग शेवटी मीच ठरवलं! नो प्रचार सभा, नो रोड शोज…नथिंग! आता बास झालं! इनफ इज इनफ!! मुळावरच घाव घातला पाहिजे!!

मम्मामॅडम : (भिवया उंचावत) पण बाकीचे सगळे पक्ष प्रचार जोरात करताहेत!! ते कमळवाले बघ, बंगालमध्ये धुमाकूळ घातलाय त्यांनी!! किती हा बेजबाबदारपणा! छे!!

बेटा : (हाताने उडवून लावत) खुळे आहेत ते खुळे!! ते आगीशी खेळताहेत हे त्यांना माहीत नाहीए! (खांदे उडवत) मी तरी यापुढे प्रचारसभा घेणार नाही! त्यांच्यासारख्या मोठ्या सभा तर मुळीच नाही!! लोक उगाचच गर्दी करतात…धिस इज व्हेरी व्हेरी डेंजरस, आय टेल यू!! त्यामुळे साथीचा प्रादुर्भाव वाढतो!!

मम्मामॅडम : (हताशपणाने) आपण इथं घरात बसून राहू, आणि ते मेले कमळवाले मैदान मारुन न्यायचे!!

बेटा : (डोळे मिटून) त्याची काळजी तुला नको! मी ऑनलाइन प्रचार करणार आहेच! शिवाय ‘ट्विटर’वर बरंच काही करता येतं! मी तर म्हणेन की इतर पक्षांनीही माझा आदर्श ठेवून ऑनलाइन प्रचार करावा!

मम्मामॅडम : (विचारपूर्वक) हरकत नाही! तू काळजी घे, मतांची काळजी नकोच करायला…ती एरवी तरी कुठं धड मिळतायत?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com