ढिंग टांग : दो धाम यात्रा..!

बाय द वे, केदारनाथाच्या वाटेवर घोडेस्वारी करणे फारसे सोपे नाही, हे इथे नम्रपणे नमूद करावे लागेल.
ढिंग टांग
ढिंग टांगsakal

(एक राजकीय, आध्यात्मिक प्रवासवर्णन…)

ब्रिटिश नंदी

‘‘जय शिवशंभू, जय बमलेहरी…जय बाबा केदारनाथ!’’ घोड्याच्या पाठीवर बसून ब्यालंस सांभाळत असताना आमच्या कानावर हाळी आली. आसपास श्रध्दाळू चालत होते. काही डोलीत होते, काही (आमच्यासारखेच) घोड्यावर होते. त्यातच एक अश्वारुढ तेज:पुंज व्यक्तिमत्त्व उठून दिसले. मुद्रेवर कुटुंबवत्सलतेची प्रभा होती. पाहातो तो काय! ते दुसरे तिसरे कोणीही नसून आमचे लाडके नेते माननीय उधोजीसाहेब होते!! शेजारीच एका नाठाळ तट्टाच्या पाठीवर तेजस्वी सुपुत्र चि. विक्रमादित्य आरुढ होते. एका बाजूस पहाड, दुसऱ्या बाजूस खोल दरी…दरीत नदीचा ओहळ!

बाय द वे, केदारनाथाच्या वाटेवर घोडेस्वारी करणे फारसे सोपे नाही, हे इथे नम्रपणे नमूद करावे लागेल. कुठल्याही तीर्थस्थळी किंवा पर्यटनस्थळी असलेली घोडी ही अत्यंत नतद्रष्ट प्रजाती आहे. ते इमानी घोडे-बिडे इतिहासात राहिले!! इतके अवसानघातकी जनावर दुसरे नाही!! एक तर घोडे आपल्या साइजचे मिळणे कठीण!! उंच माणसास बुटके तट्टू यावे, आणि बुटक्या इसमाच्या बुडी लांबोडका घोडा यावा, हा बहुधा निसर्गाचा नियमच आहे.

‘‘सारखा सारखा दरीत डोकावून बघू नकोस…चक्कर येईल हं!,’’ उधोजीसाहेबांनी चिरंजीवांना दटावले.

‘‘बॅब्स, किती हाइट असेल?,’’ दरीतील निसर्गाचे रौद्र रुप न्याहाळत चि. विक्रमादित्यांनी निरागसपणाने विचारले.

‘‘पाच फूट दहा इंच!,’’ उधोजीसाहेब अनवधानाने बोलून गेले. सांगितले ना, घोडे अवसानघात करते.

‘‘जय महाराष्ट्र! साहेब, इकडे कुणीकडे?,’’ घोड्यावरुन आम्ही! आमचे घोडमेही मेले तिरके तिरके चालत होते. मधूनच दरीच्या काठाशी आले की पोटात मुरडा येई. घोड्यावर (बाकड्यासारखी) एका बाजूला पाय सोडून बसण्याची पद्धत कां नाही? याचा विचार आम्ही वारंवार करीत होतो. उधोजीसाहेबांसही तसेच काहीसे वाटत असावे, असे त्यांच्या मुद्रेवरुन आम्हाला वाटले.

‘‘आहे काय त्या महाराष्ट्रात? त्या राजकारणाच्या चिखलात लोळण्यापेक्षा चार धाम यात्रेला गेलेलं बरं!’’ घोडे आवरत साहेब पुटपुटले. त्यांचेही खरेच होते. असल्या चिखलात कमळे फार तर फुलतील, पण वाघ कसा लोळेल अं?

‘‘तुम्ही चार धाम यात्रा करताय? व्वा! म्हंजे यमुनोत्री, गंगोत्री झालं?,’’ आम्ही आदरपूर्वक विचारले. भिकारडे घोडे सारखे दचकत होते, त्यामुळे एवढे वाक्य मुखातून बाहेर पडण्यास बहुत कष्ट पडले.

‘‘बॅब्स, इथून खाली उतरलं तर डायरेक्ट मुंबईला जाता येईल?,’’ पुन्हा दरीत डोकावून चिरंजीव विक्रमादित्यांनी मनातली शंका विचारली. साहेबांच्या चेहऱ्यावर वेदना तरळून गेली. पण त्यांनी संयम राखून हिमालयाची उंची, समुद्रसपाटी वगैरे संकल्पना समजावून सांगितल्या.

केदारनाथाचे यथास्थित दर्शन घेऊन झाल्यावर उधोजीसाहेबांनी आमच्या खास आग्रहावरुन उदार मनाने सेल्फी घेऊ दिली. सुंदरशा कुडत्यावर त्यांनी लांब कोट परिधान केला होता. डोकीस थंडीविरोधक शिप्तर होते. चि. विक्रमादित्य उगीचच पुढे पुढे गर्दीत जाऊ पाहात होते. परंतु, ग्रुप फोटोच्या मिषाने त्यांना पुन्हा पुन्हा ओढण्यात आले. केदारनाथ यात्रेतील असुविधांचा पाढा आम्ही श्रध्दाळूंनी त्यांच्याकडे वाचला. त्यावर उधोजीसाहेबांनी ‘धीर सोडू नका,

आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ असे सांगितले. केवढा आधार वाटला!! केदारनाथ मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी ‘ २०२४ साली सत्तेवर आलो की, तुमचे प्रश्न सोडवीन’ असे आश्वासन दिले.

‘‘कधी कधी वाटतं, बांदऱ्यापेक्षा बद्रीनाथ बरं! बाबुलनाथापेक्षा केदारनाथ बरं!! पण राजकारणातला चिखल दूर करण्यासाठी मला बांदऱ्याला परत जायलाच हवं!’’ दूरवरची हिमशिखरे अनिमिष नेत्रांनी पाहात उधोजीसाहेब म्हणाले. घोड्यावर जमेल तशी टांग टाकून ते म्हणाले, ‘‘चलो बद्रीनाथ!’’

…आणि महाराष्ट्र हिमालयाकडे धावू लागला!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com