ढिंग टांग : वज्रमुख आणि म्याटिनी शो...!

vajramuth uddhav thackeray politics sanjay raut
vajramuth uddhav thackeray politics sanjay rautsakal

स्थळ : मातोश्री महाल, वेळ : निकराची.

राजाधिराज उधोजीमहाराज आपल्या अंत:पुरात अस्वस्थतेने येरझारा घालत आहेत. नुकतेच सकाळचे सव्वानऊ होऊन गेले आहेत. टीव्ही बंद करुन महाराज वारंवार घड्याळाकडे पाहात आहेत. अब आगे...

उधोजीराजे : (अस्वस्थतेचा कडेलोट होत) कोण आहे रे तिकडे? कुणी जागेवर आहे की नाही?

संजयाजी फर्जंद : (आरामशीर येत) हा काय इथंच आहे!!

उधोजीराजे : (नाराजीने) मुजरा राहिला!

संजयाजी : (लगबगीने मुजरा करत) माफी असावी महाराज! काल वज्रमूठ सभेत खुर्च्या उचलून उचलून पाठ दुखायला लागल्यामुळेच ही गुस्ताखी घडली!

उधोजीराजे : (खुशालत) कालची सभा जोरदार झाली! नाही का?

संजयाजी : (अनुमोदन देत) तर तर! त्या खोकेबहाद्दरांचे डोळे पांढरे झाले असतील!

उधोजीराजे : (किंचित नाराजीने) पण आमची नेहमीची खुर्ची नव्हती!

संजयाजी : (खुलासा करत) उंच पाठीची खुर्ची मला हवी म्हणून आणखी दोघं अडून बसले होते ना!

उधोजीराजे : (वैतागून) पुढल्या सभेत सगळ्यांसाठी स्टुलं ठेवली पाहिजेत!! त्या छोट्या खुर्चीत बसून माझी पाठ दुखली!!

संजयाजी : पण तुमच्यासाठी खास फुलांनी सजवलेलं पोडियम आणलं की आम्ही! बाकीच्यांना लाकडी पोडियमशी उभं राहून भाषणं करावी लागली, महाराज!!

उधोजीराजे : (समाधानाने) ते एक बरं केलंत!

संजयाजी : (कानाला लागत) काही लोक तेही ऐकत नव्हते! म्हणाले, आम्हालाही फुलांची सजावट असलेलं पोडियम असतं, तर आम्हीही जोरदार, आक्रमक आणि तेजस्वी भाषणं केली असती!!

उधोजीराजे : (आत्मगौरवानं) आमच्यासारखी भाषणं करण्यासाठी पोडियम नाही, शब्दसंग्रह असावा लागतो! ते जाऊ दे...पुढली सभा कधी आणि कुठे आहे?

संजयाजी : (बेफिकिरीने) कुणाला माहीत?

उधोजीराजे : (संतापाश्चर्यानं) हे काय बोलणं झालं? पुढली सभा कधी आहे, हे तुम्हाला माहीत नाही? आपण दरवेळी पुढल्या सभेचं ठिकाण आणि तारीख आदल्या सभेत जाहीर करतो!! ती आपली महाविकास आघाडीची परंपरा आहे!

संजयाजी : (हाताची घडी घालून धोरणीपणाने) यापुढे वज्रमूठ सभेचा प्रयोग लावायचा नाही, असं ठरतंय!!

उधोजीराजे : (संतापातिरेकाने) कोणी ठरवलं हे?

संजयाजी : (थंडपणाने) मीच! माझा रोजचा सकाळचा मॅटिनी शो पुरेसा आहे! हव्यात कशाला त्या खुर्च्या आणि पोडियम? मी एकटा मैदान मारीन, महाराज!

उधोजीराजे : ॲहॅ, ॲहॅ! तुमच्या म्याटिनी शोच्यानंतर आणखी एक हॉरर शो सुरु केलाय त्या कमळवाल्यांनी! त्यांच्या शोमधले डायलॉग ऐकलेत ना? केस जळतील कानातले! तुमचा शो बंद केला नाही तर ते आमचे कपडे फाडणार म्हणताहेत!!

संजयाजी : (त्वेषाने) हिंमत असेल तर समोर ये म्हणावं! असले छप्पन आले-गेले, हा संजयाजी त्यांना पुरुन उरलाय!

उधोजीराजे : ऐकवत नाहीत हो तुमची मुक्ताफळं! आजवर तुम्ही एकटेच होता, आता सकाळी सकाळी दोन दोन शोज सहन करावे लागतात लोकांना! केवढी ही शिक्षा!...अशानं लोक टीव्ही विकत घेणं बंद करतील!!

संजयाजी : (गर्वानं) माफ करा, महाराज! उलट माझ्यामुळे टीव्हीचा सेल वाढलाय असं म्हणतात काही विक्रेते! इतकंच कशाला, काही पुरस्कर्तेही मला भेटून गेले...

उधोजीराजे : (अस्वस्थतेनं) त्या कोकणातल्या नव्या भोंग्याचं काय करायचं ते सांगा!

संजयाजी : (बेदरकारपणाने) दुर्लक्ष करा हो!

उधोजीराजे : (खचून जात) तुमचा होतो म्याटिनी शो, आणि आमचा जातो जीव!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com