esakal | ढिंग टांग : लसीकरण : एक मंत्रविद्या!

बोलून बातमी शोधा

Dhing Tang
ढिंग टांग : लसीकरण : एक मंत्रविद्या!
sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

‘क्या विवाह संभव नही? नौकरी की समस्या सता रही है? रिश्ते में खोट? धनयोग की कमी? तुरंत मिलें : बाबा बंगाली गाझियाबादवाले, कमरा नं.१०२, रेड रोज होटल के सामने, दूरभाष… (बिना अपाइण्टमेंट न पधारें) हमारे यहां जीवन की हर समस्या को गारंटी के साथ निपटाया जाता है…’ ही जाहिरात तुम्ही कुठल्याशा सार्वजनिक स्वच्छतागृहात डकवलेली पाहिली आहे का? ते आम्हीच!! असे स्वच्छतागृह नाही की आमची जाहिरात तेथे झळकली नाही! असो.

या क्षेत्रात आमचा एकेकाळी नावलौकिक होता. जारणमारण, जादूटोणा, भानामती, वशीकरण आदी तंत्रविद्यांमध्ये आम्ही पारंगत होतो. त्यासाठी कठोर साधना लागते.

हडळीची हाडे, झुरळाचे डोळे, घोरपडीचे शेपूट, घुबडाचे पंख, गिधाडाची चोच अशा दुर्मिळ चीजवस्तुंचा चांगला संग्रह आमचेकडे होता. विशेषत: वशीकरणाच्या क्षेत्रात आमचा दबदबा होता. एखाद्यास (किंवा एखादीस) आपल्याकडे आकर्षून घेण्यासाठी या विद्येचा उपयोग होत असे. अति अवघड आणि आव्हानात्मक काम आहे! वशीकरण फसले तर एकतर गिऱ्हाईक जोड्याने मारते किंवा ज्याला वा जिला वश करण्याचा खटाटोप उघड होतो, तो पहिले पायताण वशीकरणकर्त्यावरच म्हंजे मांत्रिकावरच उगारतो. आम्ही किमान दीडदोन डझनवेळा प्राणांतिक संकटातून वाचलो आहो!!

…परंतु, एक दिवस काहीचिया बाही जाहले. काही अंधश्रध्दा निर्मूलनवाल्यांनी ऐनवेळी घात केला. त्यांना भूत झोंबो!! एखाद्या माणसाला रोजगारावरुन उठवणे अत्यंत अमानुष कर्म आहे. ते त्यांनी केले. परिणामी तीन आठवडे इस्पितळात (पलिस्तरासहित) आणि सहा महिने तळोज्याच्या कारागृहात उपचार करुन घेऊन आम्ही नुकतेच स्वगृही परतलो आहो.

सध्या आम्हीही अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हाती घेतले असून ‘जादूटोणा, वशीकरण वगैरे शुध्द बकवास असल्याचे आम्ही जनलोकांस सांगत असतो. असो. वशीकरणापेक्षा लसीकरण ही अधिक प्रगत आणि शास्त्रीय विद्या आहे, हे कोणासही मान्य व्हावे. त्यासाठी कोठल्याही भयंकर ठिकाणी मध्यरात्री जाऊन काळी विद्या शिकावी लागत नाही. लसीमुळे रोगाचा प्रतिबंध होतो, असे म्हणतात. पण काहींना तीच अंधश्रद्धा वाटते. लस घेतली की आपण हिंडायला मोकळे, अशीही काही लोकांची अंधश्रद्धा आहे. आणखी एक महत्त्वाची अंधश्रध्दा सध्या अफवेच्या वेगाने फैलावत आहे. ती म्हणजे लस साऱ्यांना फुकट मिळणार आहे! काहीही फुकट म्हटले की काही अंधश्रध्द माणसांना काहीच्या काहीच इसाळ येतो. ते अत्यंत स्वाभाविक आहे.

मुळात फुकट या शब्दाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. फुकटेपणाची फुकाची अंधश्रध्दा येणेप्रमाणे : जेहत्ते कालाचे ठायी लसनिर्मिती करणाऱ्या संस्था केंद्र सरकारला (जवळजवळ ) फुकटच लसी पुरवणार असून केंद्रातर्फे राज्य सरकारला फुकट लस मिळेल. राज्य सरकार लसीकरण केंद्रांना फुकट लस देईल. केंद्रावरील नर्सभगिनीही फुकटच आपल्याला ही लस टोचतील. लस घेऊन झाली की ‘आता उठा खुर्चीतून ’ असे फुकटच सांगतील! आपण फुकट उठून फुकटच आपापल्या घरी यायचे! आहे की नाही गंमत? असे फुकटच सारे काही फुकट, एकदम ‘चकटफू’ आहे. फुकट, फुकट, फुकट! मात्र त्यासाठी तुमचे वय १८ वर्षांवरील आणि ४५पेक्षा कमी असायला हवे!! फुकट या शब्दातच सरसकट लसीकरणाचे गुह्य दडले आहे, हे आता तुम्हाला कळले ना? त्यालाच आमच्या बंगाली जादूच्या भाषेत वशीकरण असे म्हणतात!