Dhing Tang : हेच आमुचे ‘शिवतीर्थ’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang
ढिंग टांग : हेच आमुचे ‘शिवतीर्थ’!

ढिंग टांग : हेच आमुचे ‘शिवतीर्थ’!

इतिहासास सारे काही ठावकें आहे. नेमके सांगावयाचे म्हणजे कार्तिकातला तो एक दिवस होता. कार्तिकात इतरत्र गारठा वगैरे असतो, पण मुंबईत पंखा किमान ‘चार’वर सोडावा लागतो. थोडक्यात, बखरीचें भाषेत सांगावयाचे तर टळटळीत दुपार होती. उन्हे मी म्हणत होती. ‘शिवतीर्था’वर सारे काही शांत होते. तसल्या उकाडा-कम-गारठा दिवशी रा. नानासाहेब फडणवीस (नागपूर गादी) यांसी तांतडीचा सांगावा आला. निकडीचा निरोप असल्याचे सांडणीस्वाराचे म्हणणे होते, म्हणोन रा. नानासाहेबांनी त्यास वामकुक्षीपश्चात बोलावून घेतले. पाहतात तो काय! दस्तुरखुद्द राजियांचा निरोप!! मजकूर येणेप्रमाणे : ‘‘

राजमान्य राजेश्री मा. नानासाहेब यांसी, कृतानेक अभीष्ट विनंती विशेष. कळविणेस अत्यंत आनंद होत आहे की, आम्ही नव्या संवत्सरात नूतन वास्तूत निवासास प्रारंभ केला असोन महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे महत्कार्य येथोनच पार पाडले जाणार आहे. महाराष्ट्राच्या पर्यटनास चालना मिळावी व आपसूक नवनिर्माणही घडावे या हेतूने आम्ही शिवतीर्थाच्या काठावर ‘शिवतीर्थ’ उभारले असोन (शिव) तीर्थप्रसादासाठी सवडीने येवोन जाणे. साहेबकामी हयगय न करणे. अन्यथा खळ्ळ खट्याक! बैसला असाल तर उठोन यावे, चांलत असाल तर धावत यावे. जेवत असाल तर आंचवायास यावे. अधिक काय लिहिणे? तुरंत रुजू व्हावे. कळावे. राजे (साहेब). शिवतीर्थ, शिवतीर्थ, दादर, मुंबई-२१.

ता. क. : चतुर्थीचे दिशी आल्यास ‘प्रकाश’चा साबुदाणावडा व खिचडी (किंवा दोन्ही) यांचा आस्वाद घेता येईल. बुधवारचे दिशी आल्यास मुंबईच्या समुद्रातील मासे थोडे कमी करण्याची संधी प्राप्त होईल. पुन्हा कळावे.

सदरील खलिता प्राप्त जाहला तेव्हा रा. नानासाहेब वामकुक्षी घेत होते. वामकुक्षीनंतर यावे की न यावे? हे राजियांनी सांगितले नसल्याने नानासाहेब बुचकळ्यात पडले. अखेरीस कार्तिक शु. पंचमीचे दिशी रा. नानासाहेबांनी ‘शिवतीर्था’कडे कूच केले…

सुदिन सुवेळ त्या पुण्यभूमी ‘शिवतीर्था’चें प्रवेशद्वाराशी रा. नानासाहेबांचा रथ येवोन थांबला. रथातून सपत्नीक पायउतार होताना रा. नानासाहेबांनी कान टवकारुन अदमास घेतला. भुंकण्याचा आवाज तर येत नाही ना? ‘‘इश्श! पेट श्वानांना कसले घाबरताय? चला आत! म्हणे मी पुन्हा येणार…हु:!!,’’ कुटुंबाने तेथल्या तेथे ढोसकल्याने नाविलाज जाहला. पायउतार होताच समोर चार-सहा पायऱ्या दिसल्या. पायऱ्या बघून रा. नानासाहेबांचा धीर थोडका खचला. साडेपाच मजली महालातलिफ्टची सोय असेल ना? नाहीतर कंबख्ती!!

‘या!’ पायऱ्यांच्या वरल्या अंगाने खर्जात स्वागत जाहले. हे स्वागत आहे की आदेश? हे कळेपर्यंत फडणवीसनाना पायऱ्या चढून वर गेले.

‘आपण आधी सगळं घर बघू, म्हंजे भूक चांगली लागेल!’’ कुणीतरी सूचना केली. मुख्यमंत्री असतो तर असली भिकार सूचना करणाऱ्याची ताबडतोब गच्छंती केली असती, असा हिंस्र विचार नानासाहेबांचे मनीं दाटून आला. ‘‘एवढे मोठे घर बघायचे म्हणजे एका जेवणावर भागायचे नाही! हाहाहा!!,’’ नानासाहेबांनी बाष्कळ विनोद करुन आपली वेदना आवरली. सगळे उपचाराखातर हसले. ‘शिवतीर्था’च्या सज्जातून शिवतीर्थ दिसत होते. हे शिवतीर्थ खरे की ते शिवतीर्थ खरे? हा विचार नानासाहेबांच्या मनात आला खरा, पण त्यास त्यांनी थारा दिला नाही. ‘‘कसं वाटलं आमचं शिवतीर्थ?’’ खर्जातल्या सुरात राजियांनी विचारले. ‘‘आता हेच आमचं शिवतीर्थ!’’ रा. नानासाहेब अदबीने म्हणाले. जेवण अजून बाकी होते.

…यानंतर मुंबईच्या समुद्रातले बरेच मासे कमी झाल्याची इतिहासात नोंद आहे.

loading image
go to top