Dhing Tang : पंडितमैत्री, सभेत संचार...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : पंडितमैत्री, सभेत संचार...!
ढिंग टांग : पंडितमैत्री, सभेत संचार...!

ढिंग टांग : पंडितमैत्री, सभेत संचार...!

बेटा : (सर्वोदयी मृदू आवाजात..) ढॅण ट ढॅण...क्या मैं अंदर प्रविष्ट हो सकता हूं?

मम्मामॅडम : (कागदपत्रं चाळ्यात मग्न..) अभी नहीं…मैं बिझी हूं!

बेटा : (विनम्रपणे) तो फिर ठीक है…मी इथंच उपोषणाला बसतो!

मम्मामॅडम : (चमकून) ओह! तू होय! मला वाटलं की-

बेटा : (दोन्ही हात जोडत) बालदिन की बहुत बहुत सुंदर शुभकामनाएं, मम्मा!! क्या मैं यहां दो क्षण बीता सकता हूं?

मम्मामॅडम : (चक्रावून) हे काय चाललंय? तरी मी सांगत होते, बालदिन असला म्हणून काय झालं?, उगीच जास्त केक नि चॉकलेटं खाऊ नयेत!

बेटा : (खोल आवाजात) सकाळपासून मी फक्त तीन खजूर खाल्लेत!! पण मला केक आणि चॉकलेटं नकोत मम्मा! सदाचारही सार्वजनिक जीवनी का मूलमंत्र है…

मम्मामॅडम : (आता मात्र गंभीर होत…) ओ, गॉड!...तुला काय झालंय?

बेटा : (शांतदग्ध आवाजात) मी नुकताच वर्ध्याला जाऊन आलो, त्याचा हा परिणाम आहे! पू. विनोबाजींच्या कार्यस्थळी जाऊन आपल्या कार्यकर्त्यांना मी बहुमोल मार्गदर्शन केलं! (डोळे मिटून…) ईश का आवास है यह सारा जगत…जीवन यहां जो कुछ उसीसे व्याप्त है…अतएव करके त्याग उसके नाम से…तू भोगता जा वह जो तुझे प्राप्त है…

मम्मामॅडम : (घाईघाईने विषय बदलत) …वर्ध्याला कसा गेला होतास?

बेटा : (प्रेम, दया, क्षमा आणि शांती या तत्त्वांनी परिपूर्ण सुरात…) वर्धुअली…आय मीनव्हर्च्युअली!! तिथं मी कार्यकर्त्यांना खरं हिंदुत्त्व समजावून सांगितलं!! खरं हिंदुत्व म्हंजे काय, खोटं म्हंजे काय, यात फरक असतो, तोही समजावून सांगितला!

मम्मामॅडम : (धक्का बसून) हातात काय आहे तुझ्या बघू? ओह, ‘विनोबा जीवनी’?

बेटा : (शांतरसाचे पान करीत…) मी उपनिषदं वाचली आहेत मम्मा! निरपराध माणसाला ठार मारा, असं एकाही उपनिषदात म्हटलेलं नाही! परवा मी आपल्या कार्यकर्त्यांना अगदी हेच सांगितलं! पण ते हसले!!

मम्मामॅडम : (नाराजीनं) मी उपनिषदं वाचली आहेत, असं ठोकून का दिलंस? नाही वाचली तरी काही बिघडत नाही! उगीच असं कशाला सांगावं? तुला ‘उपनिषद’ हा शब्दसुध्दा धड उच्चारता येत नाही, अशी टीका करतात ते नतद्रष्ट कमळवाले!!

बेटा : (ठामपणाने) उपनिषदं सोड, ते तर बेसिक आहे! मी चारही वेददेखील वाचले आहेत! रामायण आणि महाभारत, व्यास, वाल्मीकी, चार्वाक, भवभूती, भर्तृहरी, भरतमुनी, मेघदूत, रघुवंश…यू नेम इट! मी सगळं वाचलं आहे!

मम्मामॅडम : (अविश्वासानं) काहीही हं बेटा!! आत्ता आत्तापर्यंत स्पायडरमॅन आणि हॅरी पॉटर वाचत होतास! काहीही न वाचताच ‘वाचलं’ असं कशाला सांगायचं?

बेटा : (मंद स्मित करत) ॐ पूर्ण है वह, पूर्ण है यह, पूर्ण से निष्पन्न होता पूर्ण है…पूर्ण में से पूर्ण को यदि ले निकाल…शेष तब भी पूर्ण ही रहता सदा…

मम्मामॅडम : (सडेतोडपणे) जे आपल्याला शोभतं तेच करावं, बेटा! संस्कृतमधलं हे पांडित्य आपल्या काही कामाचं नाही!!

बेटा : (बिनतोड युक्तिवाद करत) कमळ पक्षाचे नमोजी प्रत्येक भाषणात संस्कृत श्लोक टाकून गार करतात! त्यांना कुणी विचारलंय का की, ‘बुवा तुम्ही हे खरंच वाचलंय का?’

loading image
go to top