esakal | ढिंग टांग : वाटीतलं ताटात..!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : वाटीतलं ताटात..!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

सदू : (खोल आवाजात) ओण ओलतंय? ओण आहेऽऽ…

दादू : (खणखणीत आवाजात) सदूराया, अरे असं काय करतोस? ओळखला नाहीस का माझा आवाज? अरे, मी तुझा दादू!!

सदू : (आणखी खोल आवाजात) तुझा आवाज एवढा खणखणीत कसा?

दादू : (कपाळाला आठ्या…) हा महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे! तुझा आवाज कुठे गेला?

सदू : (बसक्या आवाजात) ओरीला एला…चो-री-ला गे-ला!

दादू : (अचंब्याने) चोरीला गेला?

सदू : (मवाळपणाने) होय, चोरीच!

दादू : (संतापाने) माझ्या महाराष्ट्रात चोऱ्या होतात? हे कदापि सहन केलं जाणार नाही! चोऱ्या करणाराचे हात कलम केले जातील!

सदू : (छद्मीपणाने) फू:!!

दादू : चोऱ्या, दरोडेखोरी, बलात्कार, भ्रष्टाचार…याला माझ्या महाराष्ट्रात थारा नाही, हे सांगून ठेवतो तुला सदूराया! ही महाराष्ट्राची दौलत आहे! आणि या दौलतीसाठी हा तुझा दादू तळहाती शिर घेऊनिया लढेल! इथे राहायचे असेल तर नियम-कायदे पाळावेच लागतील!

सदू : (खचलेल्या आवाजात) गेली अनेक वर्ष मी हेच सांगतोय रे!..म्हंजे सांगत होतो!!

दादू : …महाराष्ट्र माझा, मी महाराष्ट्राचा!

सदू : (शोकाकुल अवस्थेत) हीसुध्दा एकेकाळी माझी घोषणा होती!!

दादू : (जीभ काढत) असेल! आता नाही! त्यामुळे काय फरक पडतो? की फर्क पईंदा? मी म्हणतो माझा महाराष्ट्र...तू म्हणतोस महाराष्ट्र माझा! एवढंच!

सदू : (गले में खराश…) काळजी घे बरं, दादूराया! मास्क लाव, सुरक्षित अंतर पाळ आणि हो, वारंवार हात धू!!

दादू : (तडफेने) माझ्या महाराष्ट्रासाठी मी काहीही करीन, सदूराया! हजारवेळा हात धुवीन!

सदू : (बदललेल्या आवाजात) किंबहुना धूच! धुतल्याशिवाय राहू नकोस!

दादू : (दुर्लक्ष करत) माझा महाराष्ट्र गुन्हेमुक्त करण्याचं वचन मी कुणाला तरी स्वप्नात दिलं होतं…!

सदू : सगळ्याच गोष्टी तू स्वप्नात का करतोस?

दादू : (दुर्लक्ष करत) माझ्या महाराष्ट्रात गुन्हेगारांवर वचक राहील! आयाबहिणी सुरक्षित राहातील! सामान्य रयत सुखात राहील! असं मी तुला वचन देतो, सदूराया!

सदू : (सावधगिरीने) आत्ताही तू झोपेत तर नाहीस ना?

दादू : (त्वेषाने) …या मुंबईत कोण येतो, कोण जातो? कुठून येतो, कुठे जातो? काय करतो, नाव काय, पगार काय, उंची काय…सगळ्याची नोंद ठेवायचे आदेश दिले आहेत मी! मुंबई म्हंजे काही ‘आओ, जाओ, घर तुम्हारा’ अशी धर्मशाळा नाही!!

सदू : (खोल खोल आवाजात) अरेच्चा! हेच मी गेली अनेक वर्ष बोलतोय ना!

दादू : (बेफिकिरीने) असेल! आता मी बोलतोय, ते महत्त्वाचं आहे!

सदू : (कसनुसे शब्द उच्चारत) आपल्या व्यक्तिमत्त्वात केवढा बदल झालाय ना? एकेकाळी मी केवढा आक्रमक होतो! ‘लाव रे तो व्हिडिओ’ ही माझी आज्ञा ऐकली की भल्याभल्यांची गाळण उडत होती! माझी कडक भाषा ऐकून लोक चळाचळा कापत होते!...आणि तू मवाळ, तुपाळ बोलत होतास!

दादू : (मायेने) …आता यापुढे तुझं ते माझं!! तुझ्या सूचना चांगल्या असतात, हे आता मला पटलंय!! काहीही झालं तरी आपण भाऊबंद आहोत ना!! वाटीतलं ताटात आलं, बिघडलं कुठं?

सदू : (हताशपणे) ताटातलं वाटीत कधी येणार, याचा विचार करतोय! जय महाराष्ट्र!

loading image
go to top