Dhing Tang : ग्लास्गो डायरीची पाने! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : ग्लास्गो डायरीची पाने!
ढिंग टांग : ग्लास्गो डायरीची पाने!

ढिंग टांग : ग्लास्गो डायरीची पाने!

गेल्या आठवड्यात मी ग्लास्गोमध्ये होतो. ग्लासगो स्कॉटलंडमध्ये आहे, स्कॉटलंडमध्ये! गॉट इट? महाराष्ट्राचं पहिलं वहिलं पर्यावरणविषयक आंतरराष्ट्रीय अवार्ड मी घेऊन आलो. पण इथं कुणाला त्याची पर्वा आहे का? पिकतं तिथं विकत नाही, अशी एक म्हण मराठीत आहे (म्हणे.) महाराष्ट्रात आजवर इतके पर्यावरणमंत्री होऊन गेले, कुणालाही इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालं नाही. मी मात्र दोन वर्षात ‘करुन दाखवलं’! अवॉर्ड मिळाल्यावर इथे मराठी न्यूजपेपर्समध्ये चिक्कार मोठे फोटो येतील, असं वाटलं होतं. तिथं मी काही लोकांना म्हटलंसुध्दा : ‘‘ थँकयू सोमच…माझ्या महाराष्ट्रातली जनता माझी वाट पाहात आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी!’’

... पेपरात फोटो येतील, टीव्हीवर ‘ब्रेकिंग न्यूज’ झळकेल, विमानतळावर मला रिसीव करायला गर्दी होईल, बांदऱ्याच्या सिग्नलपर्यंत टीव्हीवाले माझ्या कारचा पाठलाग करतील, असंही स्वप्न मी पाहात होतो. पण छे! इथं तेच चालू आहे… शेतकरी, पेट्रोल, एसटी आणि व्हॉटनॉट! (या व्हॉटनॉटमध्ये मलिकचाचा आणि राऊतकाका पण इन्क्लुडेड आहेत! ) आपले च्यानलवाले टीआरपीच्या मागे धावतात, पण अवॉर्डच्या मागे धावत नाहीत. यांना पॉझिटिव काहीही नको असतं. जाऊ दे. स्कॉटलंड मला जाम आवडलं. ग्लासगोत खूप फिरलो. आणखी दोन वर्षात आपल्या बोरिवलीचं ग्लासगो करुन दाखवीन, असा संकल्प मी सोडणार आहे.

तिथं एक मोठं कथीड्रल आहे. सेंट मंगोचं! चार कवितेच्या ओळी तिथं पाहिल्या : अ बर्ड दॅड नेव्हर फ्ल्यू, अ ट्री दॅट नेव्हर ग्र्यू...’ मी चाटंचाट पडलो. अ बर्ड दॅट नेव्हर फ्ल्यू... म्हंजे पेंग्विन!! मला वाटलं की या ओळी माझ्या स्वागतासाठी लिहिल्या आहेत की काय! पण तसं नव्हतं. सेंट मंगोच्या काळापासून हे स्कॉटिश काव्य गाइलं जात आहे. एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे : ग्लासगोचा ग्लासशी काहीही संबंध नाही!! तिथल्या गेलिक संस्कृतीनुसार ग्लास्गोचा अर्थ ‘माझं प्रिय हरित स्थळ’ असा काहीतरी होतो म्हणे. (गाईड सांगत होता…) मलाही मुंबईत असंच करायचं आहे. यापुढे बोरिवली नॅशनल पार्कला ग्लास्गो ऊर्फ ‘माझं प्रिय हरित स्थळ’ असं म्हणण्याबाबतचा वटहुकूम काढायला सीएमसाहेबांना सांगणार आहे. स्कॉटलंडमध्ये हिंडताना मी सगळ्यांना सांगत होतो की, ‘‘स्कॉटलंडचा आणि माझा फार लहानपणापासून संबंध आहे, कारण मी माहीमच्या बॉम्बे स्कॉटिशचा विद्यार्थी आहे!!’’

अवॉर्ड स्वीकारताना मी महाराष्ट्राच्या कल्चरची इलॅबोरेटली इन्फर्मेशन दिली. लोकांनी खूप अप्रशिएट केली. एका स्कॉटिश बाईंनी विचारलं की, ‘आडिट्याचा अर्थ काय?’’ मी बॉम्बे स्कॉटिशचा विद्यार्थी असल्याने बरोब्बर ओळखलं. ‘‘अडिट्या नाही, आदित्य…म्हंजे सन! सूर्य!!’’ मी सांगितलं. महाराष्ट्रातले लोक सूर्यपूजक आहेत, आणि सोलर एनर्जीवर खूप भर देतात, असं तिचं मत झालं. मी ते खोडून काढत बसलो नाही.

ग्लासगोला मी कधी येईन असं वाटलं नव्हतं. पण आलो! नुसता आलोच असं नव्हे, तर चक्क एक लफ्फेदार भाषणही ठोकलं, आणि पुरस्कारही घेतला. भाषणाआधी थोडी गडबड झाली. मी बराच वेळ माइक्रोफोनसमोर उभा होतो. सगळे वाट बघत होते. एका आयोजकाने खूण केली : ‘प्लीज स्टार्ट!’ तुतारीला स्कॉटलंडमधले गेलिक लोक काय म्हणतात? ते आठवेना! तुतारीशिवाय भाषण सुचेना!!...शेवटी तुतारी न वाजताच मी भाषणाला प्रारंभ केला.

मॉरल ऑफ द स्टोरी : यु डोण्ट नीड तुतारी…टु विन!

loading image
go to top