Dhing Tang : मी पुन्हा (रस्त्यावर) येईन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : मी पुन्हा (रस्त्यावर) येईन!
ढिंग टांग : मी पुन्हा (रस्त्यावर) येईन!

ढिंग टांग : मी पुन्हा (रस्त्यावर) येईन!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

आजची तिथी : श्रीशके १९४३ आश्विन शु. त्रयोदशी.

आजचा वार : वेन्सडेवार.

आजचा सुविचार : अजून चालतोचि वाट…माळ हा सरेना!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) रस्त्यारस्त्यांवर प्रचंड गर्दी आहे. मैलोंगणती लांबीचा विशाल मोर्चा मुंबईत धडकला आहे. अवघ्या महाराष्ट्राची जनता रस्त्यांवर उतरली आहे. ध्येय एकच - हे भ्रष्ट, खंडणीखोर सरकार खाली खेचायचे!..विशाल

मोर्चाचे नेतृत्त्व मी स्वत: करतो आहे. आंदोलक माझ्याकडे मोठ्या आशेने, आणि नेते कौतुकाने बघत आहेत. ‘शाब्बास, मेरें पठ्ठेंऽऽ…लगें रहों’ असा प्रेमळ सानुनासिक कौतुकाग्रह (दिल्लीहून) कानाशी रुंजी घालतो आहे. पुढला मुख्यमंत्री (पुन्हा) मीच, हे आता जणू ठरलेच आहे. सत्ताधारी आघाडीच्या मंत्र्यांची पळता भुई थोडी झाली आहे. माझ्या डाव्या हाताला कोकणच्या दोन सुपुत्रांसहित खुद्द राणेदादा आहेत, तर उजव्या हाताला साक्षात किरीट सोमय्या आहेत. साहजिकच सत्ताधारी मिळेल त्या वाटेने सूंबाल्या करण्याच्या प्रयत्नात आहेत. मी गालातल्या गालात हसतो आहे. तेवढ्यात-…शी:!! तेवढ्यात जागच आली. किती सुंदर स्वप्न पडत होते. तेदेखील पहाटे!

गांजा, खंडणी आणि भ्रष्टाचाराच्या चर्चेमुळे महाराष्ट्रातील वातावरण बिघडून गेले आहे. हे सरकार खाली खेचायचे असेल तर रस्त्यावर उतरावेच लागेल’ असा इशारा मी कालच आमच्या पक्षाच्या कार्यकारिणीत बोलताना दिला. सगळ्यांनी त्याला मान डोलावली. टाळ्यासुद्धा वाजवल्या. ‘नानासाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा दिल्या गेल्या. सकाळी आमचे कमळाध्यक्ष चंदूदादा कोल्हापूरकर चहासाठी आले. (ते नेहमीच चहासाठी येतात!) तेव्हा मीच विषय काढला. ‘‘कसं झालं माझं भाषण?’’ चहा दिल्यानंतर मी म्हणालो. शिवाय दोन बिस्कुटेही पुढे केली.

‘कुठलं?’’ आमचा चहा पिऊन हे आणखी वर!

‘कुठलं काय? कालचं, कार्यकारिणीतलं!,’’ कातावून मी. त्यावर ते काही बोलले नाहीत.नुसताच चहाचा घुटका घेत बसले.

‘दादा, आता रस्त्यावर उतरण्यावाचून आता पर्याय उरला नाही, ’’ मी मान हलवत निर्वाणीच्या सुरात म्हणालो.

‘मग आता आपण कुठं आहोत?,’’ दादांनी चहाचा शेवटचा घोट संपवत म्हटले. हे असे बोलणार असतील तर चहा द्याच कशाला? असा एक विचार मनात दाटून आला. मन विषण्ण झाले. कुठून सुरवात केली होती? कुठे वाटचाल सुरु आहे? ‘मी पुन्हा येईन’ असे सांगून खुर्चीवरुन पायउतार झालो होतो. ‘आमचं ठरलंय?’ अशा आणाभाका झाल्या होत्या. पण पुढे सगळे विपरीत घडले. ‘मी पुन्हा रस्त्यावर येईन’ असे सांगण्याची वेळ आली!!

काळाचा महिमा…दुसरे काय म्हणायचे?

मग मी दादांना पहाटेच्या स्वप्नाबद्दल सांगून टाकले.

‘…हा मी असा सर्वांच्या पुढ्यात…रस्त्यावर! मागे मोठा घोषणा देत चालणारा जमाव…तोही रस्त्यावर!! समोर एक उंच पाठीची खुर्ची…त्या खुर्चीवर बसलेले आपले माजी मित्र…मी त्यांना सांगतोय की, अहो, उ. ठा., उठा, उठा!! किती वेळ बसलात? झाला तितुका खेळखंडोबा खूप झाला!... ’’

‘‘व्वा!’’- दादा म्हणाले.

‘…ते खुर्ची जाम सोडायला तयार नाहीत, मी झटापट करतोय…तेवढ्यात जागच आली!

काय अर्थ असेल या स्वप्नाचा?,’’ मी.

खांदे उडवत दादा म्हणाले, ‘‘ नानासाहेब, पहाटेची स्वप्न खरी होतात ही अंधश्रद्धा आहे, आणि पहाटेचं वास्तवही खरं नसतं, हेही आपल्याला कळलंय! नाही?’’

loading image
go to top