ढिंग टांग : चलो, अयोध्या चले...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang
ढिंग टांग : चलो, अयोध्या चले...!

ढिंग टांग : चलो, अयोध्या चले...!

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांनो, जय महाराष्ट्र. बरेच दिवस घराबाहेर पडलो नव्हतो. फार्फार्तर पुण्यापर्यंत जाऊन आलो.- आता महाराष्ट्रात फिरतो आहे. (केडगावचा मटण रस्सा मी खाल्ल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. खोटारडे लेकाचे! ) यंदा मे महिन्यात कुठेतरी बाहेर जाऊ असं ठरवलं होतं. पण उकाडा फार आहे. शेवटी अयोध्येची टूर काढण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या पाच जून रोजी अयोध्येला पोचायचं आहे. (तिकिटं काढली आहेत…) आता पाच जून हीच तारीख का? तर या प्रश्नाची उत्तरसभा एक मे रोजी संभाजीनगरात (झालीच तर) होईल. तेव्हा कळेलच!

आम्ही जे काही करतो, त्याची हल्ली री ओढली जाते. आम्ही हनुमान चालिसा म्हणायला लागलो, काँग्रेसवालेसुद्धा घाईघाईने हनुमानाच्या मंदिरात पोचले! आम्ही महाआरतीची प्रथा सुरु केली, त्यांनीही टाळ हातात घेतले ! आता आम्ही अयोध्येला निघालो, हे कळल्यावर सर्वपक्षीय अयोध्या दौरे जाहीर होत आहेत. काय हे? पण आपली पार्टी अयोध्येत सर्वात आधी पोचली पाहिजे.

अयोध्येत या आधीच आम्ही जाणार होतो. परंतु, तेव्हा उत्तर भारतीयांच्या विरोधात आमचे ‘खळ्ळ खटॅक’ सुरु होते. सध्या तिथे न गेलेले बरे, असे आम्हाला दुखऱ्या आवाजात सांगितले गेले. सध्या उत्तर भारतीय मंडळी आपल्यावर खुश आहेत. आता जायला काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा सगळ्यांनी ५ जूनला अयोध्या! कळलं ? जय महाराष्ट्र. साहेब.

ता. क. : तिकिटं आपापली काढायची आहेत! भलते लाड चालणार नाहीत!!

मा. चंदुदादा कोल्हापूरकर यांसी, शतप्रतिशत प्रणाम. आपले डिस्टंट मित्र मा. साहेब (शिवाजी पार्कवाले) यांनी चक्क अयोध्येची तिकिटं काढली आहेत. सध्या वेटिंग लिस्टवर आहेत, पण कन्फर्म होतील! अयोध्या तर आपलंच गाव आहे. आपण कधीही येऊ-जाऊ शकतो. मीदेखील मे-जूनमध्ये अयोध्येला चक्कर टाकीन म्हणतो! येणार आहात का सोबत?

कळावे.

आपला. नाना फडणवीस.

डिअर बॅब्स, हाय देअर, शिवाजी पार्कच्या काकांनी पाच जूनचं अयोध्येचं तिकिट (थ्री टिअर, वातानुकूलित शयनयान ) काढल्याचं कळलं. मला वाटतं की आपण त्यांच्याआधीच जाऊन यावं. मागल्या खेपेला इलेक्शनच्या वेळेला मी गेलो होतो, पण तेव्हा ‘सध्या अयोध्या नको’ असे सांगून संजयाजी राऊत यांनी मला हात खेचून दुसरीकडेच नेलं. आता मात्र मी जाणारच. हवं तर अयोध्येच्या पर्यावरणाची आणि पर्यटनाची पाहणी करण्यासाठी जात आहे, असं जाहीर करु. अयोध्येला आपण जाऊन दाखवलं, असंही सांगता येईल. कळावे.

आपला. विक्रमादित्य. (टूरिझम मिनिस्टर, स्टेट ऑफ महाराष्ट्र. इंडिया, एशिया. द अर्थ.)

मा. जयंत्राव पाटीलसाहेब, अध्यक्ष (आमची पार्टी) यांसी, अहो, जयंत्राव तुम्ही आमच्या पक्षाचे अध्यक्ष ना, मग बाहेर काय चाल्लंय बघा की जरा. महाराष्ट्रातल्या सगळ्या पार्ट्या अयोध्येच्या सहली आयोजित करत आहेत, आपण मागं राहून कसं चालंल? काढा की तिकिटं आपलीसुध्दा !!

कळवा. आपला. दादासाहेब बारामतीकर.

मा. महामॅडम, लक्ष लक्ष दंडवत. पत्र लिहिण्यास कारण की आमच्या महाराष्ट्रातील बरेच लोक अचानक अयोध्येचे दौरे काढू लागले आहेत. आम्ही काय करावे? वेषांतर करुन जाऊन यावे का? की ऑनलाइन भेट द्यावी? की सरळ विरोधच करावा? कृपया मार्गदर्शन करावे.

आपला नम्र आणि निष्ठावान कार्यकर्ता. पटोलेनाना

Web Title: Editorial Article Dhing Tang 19th April 2022 British Nandi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top