esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : जी हुजूर- २३ क्लब!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

माननीय, आदरणीय, वंदनीय श्रीमती महामॅडमजी यांच्या चरणी तेवीस कार्यकर्त्यांचा सामूहिक सा. नमस्कार. ‘जी (हुजूर)-२३ क्लब’ या नावाने आमचा हा (पत्रलेखकांचा) गट ओळखला जातो, हे तुम्हाला माहीत असणार! माझ्या घराच्या मागल्या बाजूच्या खोलीला लागून असलेल्या न्हाणीघरातून मी हे गोपनीय पत्र लिहीत आहे, याची कृपया नोंद घ्यावी. घराबाहेर पडण्याची सोय नाही, कारण बाहेर घोषणाबाजी आणि तुरळक दगडफेक चालू आहे. (पुढल्या बाजूच्या खिडकीची दोन तावदाने फुटली आहेत…) फुटक्या तावदानातून मी हेल्मेट घालून डोकावून पाहिलं. आपल्याच पक्षाचे काही कार्यकर्ते दगडफेक करत आहेत! मी काल फक्त पत्रकारांशी बोलताना एवढंच म्हणालो होतो की, ‘‘आमच्या पक्षात निर्णय कोण घेतं, हेच कोणाला माहीत नाही!’’ तेवढ्यावरुन ही दगडफेक! अर्ज किया है…

जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला,

हमनें तो बस कलियां मांगी, कांटों का हार मिला…

…अशी अवस्था झाली आहे. (मी पेशाने वकील असलो तरी थोडा ‘त्यातला’ आहे, हे तुम्हाला माहीत आहेच - शेरोशायरी वगैरे!) पंजाब हे सरहद्दीचं राज्य असून तिथल्या अनागोंदीचा गैरफायदा पाकिस्तानला होईल, असं माझं मत मी मांडलं. त्याचं बक्षीस काय? तर घरावर निदर्शनं, घोषणाबाजी! गेल्या वेळेला आम्ही २३ जणांनी आपल्याला एक गोपनीय पत्र लिहिलं होतं. ते गोपनीय पत्र काहीजणांनी आधी पत्रकारांना दिलं! हे पत्र आधी तुम्हाला पाठवतो आहोत, बाकीच्यांना नंतर देऊ!! यावेळी पत्र नेमकं कोणाला पाठवायचं हेच कळत नव्हतं. म्हणून मा. गुलाम नबीजींना फोन करुन विचारणा केली. ते म्हणाले की, ‘‘पत्र लिहा, पण तूर्त घरीच टेबलाच्या ड्रावरात ठेवा!’’ मा. मनिष तिवारीजींना विचारलं तर ते म्हणाले, ‘‘ हायकमांडच्या तिघांनाही पाठवा, आणि शिवाय पत्रक काढून वाटा!!’’ मा. आनंद शर्माजी म्हणाले की, ‘‘पत्राची एक प्रत थेट ‘पीएमओ’ आणि ‘होम मिनिस्टर’ना पाठवा! ’’

पंजाबात जे काही चाललं आहे, ते बघून माझ्या हृदयाला घरं पडतात! सरहद्दीच्या राज्यात अशा प्रकारचं अराजक माजणं अतिशय वेदनादायी आहे. आपले पक्ष-सहकारी आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री मा. कॅप्टनसाहेबांना मी काल फोन केला होता. ते चक्क पंजाबीतून हुंदके देऊ लागले! मीसुद्धा हुंदके देण्याइतपत पंजाबीत बोलू-लिहू शकतो. त्यांनी तस्सेच पंजाबी हुंदके मा. गृहमंत्री मोटाभाई यांना भेटून दिल्याचं कानावर आलं आहे. मा. मोटाभाईंनी गुजराथी भाषेमधून त्यांची समजूत घातली, असंही कळतं. आपल्या पक्षाला सध्या हायकमांड आहे की नाही? हे कळायला काही मार्ग उरला नाही. हायकमांडचं थोडेसं नियतीसारखं झालं आहे. नियतीच्या मनात काही वेगळंच चालू असतं, असं म्हणतात. याच हायकमांडच्या नावावर आम्ही (एकेकाळी) किती राजकारणं केली? आता हायकमांड आमच्या नावावर नेमकं काय करते आहे, हेच कळत नाही. आम्हा तेवीस जणांची ही भाषा ‘कमळ’वाल्यांसारखी वाटते, म्हणून प्लीज दुर्लक्ष करु नका. दुर्लक्ष केलंत तर आम्हालाही कॅप्टनसाहेबांप्रमाणे मा. मोटाभाईंकडे जाऊन हुंदके देण्यावाचून काही पर्याय उरणार नाही. काळ मोठा कठीण आला आहे. सत्तर वर्षात दगडफेक करण्याची वेळ आपल्या पक्षावर कधीही आली नव्हती, यात सारं आलं!

कळावं. आपला.

कपिल सिब्बल.

(वकीलसाब)

ता. क. : आम्ही एकनिष्ठ आहोत!..खर्रर्रच!!

loading image
go to top