ढिंग टांग : नया अंदाज! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang
ढिंग टांग : नया अंदाज!

ढिंग टांग : नया अंदाज!

होराभूषण पं. नारायणशास्त्री यांना कोण ओळखत नाही? सूर्यमालिकेतील सारे ग्रहदेखील त्यांना वचकून असतात. त्यांना विचारल्याशिवाय राहू कुणाच्या राशीला लागत नाही, आणि त्यांच्या परवानगीशिवाय शनिचा फेरा होत नाही. केवळ मनात आले मंगळाला कुणाला पिडता येत नाही नि हर्षलबिर्षल तर त्यांच्या आज्ञेबाहेर कधीच नसतात. पं. नारायणशास्त्री यांची बत्तिशी वठली नाही, असे आजवर कधी झाले नाही.

शास्त्रीबुवांचा आश्रम माल्यवनात (पक्षी : मालवण) असतो. तेथे कुंडलीशास्त्र, हस्तसामुद्रिक, फलज्योतिष, खगोलशास्त्र, अंकभविष्य आदी अनेक विषयांचे अध्ययन चालते. गुरुगृही शिष्याने सकाळी उठून लाकडाच्या मोळ्या गोळा करायला जाण्याचा परिपाठ पूर्वापार आहे, हे आपण सारे जाणतोच. साहजिकच त्यांचे शिष्यगणही आसपास हिंडून मोळ्या बांधत काहींचे भविष्य घडवत असतात, काहींचे बिघडवत असतात. आम्ही मात्र आमचा हात त्यांच्यासमोर उघडून धरला होता. हो. भू. नारायशास्त्री पुढ्यात पोपटाचा पिंजरा घेऊन बसले होते.

‘तुका खेका होयां भविश्य आणि काय?,’ शास्त्रीबुवा करवादले. रोखून बघत शास्त्रीबुवांनी भिंग काढले आणि आमच्या तळहातावरल्या रेषा पाहू लागले. ‘चचच…’, ‘अगागागागा…’, ‘आवशीक खाव…’, हो शुक्राचो उंचवटो माय**…तुका ***.होईत!’ असले काहीबाही उद्गार काढत ते बराच वेळ हात बघत रवले! मग त्यांनी पोपटासमोर काही प्रश्न टाकले. पोपटाने ‘किर्रर्र’ असे उत्तर दिले.

‘पोपट सांगताहा की, जूनांत वादळ घोंगावताला, आणि सगळा नायनपाट करतलां!,’ गंभीर आवाजात शास्त्रीबुवांनी आकाशवाणी करावी, तसे भाकित सांगितले.

‘तुमचं ते ‘तौक्ते’ किंवा ‘निसर्ग’ टाइप वादळ येणारेय का? पावसाळ्याच्या तोंडावर ही असली वादळं आमच्या अपरांतात येतातच..,’ आम्ही कोकणी सहजतेने म्हणालो. वादळं- बिदळं, झाडंबिडं पडणं, यात काय विशेष? ‘ह्यां साधासुधा नाय हां, शंभर वादळां एका ठिकाणी केलंव, की असला चक्रिवादळ घोंगावतलां!,’ शास्त्रीबुवांनी पोपटाला मिरची खाऊ घातली.

‘बरं, बरं! पण बाकी ठीक ना?,’ पोपटाकडे बघत आम्ही.

‘ठीक? मेल्या, तुजा तळपाट होतला! तुजा घराणां नायनपाट होतलां! ‘तेल गेला, नि तूपही गेला, हाती धुपाटणां रवला’, अशी अवस्था होतली! तुजा काय खरां नाय..! भयंकर अनिष्ट योग आसा!! द्येवा, ह्याका वाचीव रे बाबा!,’ शास्त्रीबुवांनी अचानक ठणठणाट केला. पोपटानेही पिंजऱ्यात किर्रर्रकल्लोळ केला.

‘अहो, असं काय करता?’ आम्ही घाबऱ्या घुबऱ्या ओरडलो. कुठून हात दाखवून अवलक्षण करुन घेतले असे आम्हाला झाले. पोपट हसत असल्याचा भास आम्हाला झाला.

‘शिरा पडो तुज्या तोंडार…पोपट सांगताहा की, आघाडेचो सरकार बुडतला! सगळे खुर्चे व्होवान जातले! सगळी पांगापांग होतली!! बाप रे, बाप!,’ शास्त्रीबुवांनी सांगितले.

‘म्हंजे? मविआ सरकार पडणार म्हणताय, वादळात? माडासारखं?’ आम्ही. ‘…हो पोपट सांगताहा!,’’ दोन्ही कानाच्या पाळ्या पकडत शास्त्रीबुवा म्हणाले.

‘ह्या…तुम्ही आजवर डझनभर भाकितं केलीत! एकही अचूक आलं नाही, बुवा!,’ आम्ही जमेल तसा संशय व्यक्त केला.

‘गुरु तुमचो वरचो हा, म्हणान सगळां चल्लाहा! नायतर केवाच…’ चुटकी वाजवत हो. भू. नारायणशास्त्रींनी अंदाज चुकण्याचे कारण सांगितले. जून म्हैन्यात ईडीपीडा योग असून, सरकार नक्की पडतलंय,’ असेही ते ठामपणे म्हणाले.

‘नक्की का पण?,’ आम्ही काकुळतीने विचारले.

‘पैज लावतंस? लाव, बाबा रे, हो पोपट नवीन आसा!!,’ शास्त्रीबुवा म्हणाले. जूनमध्ये नक्की काय ते कळेलच!

Web Title: Editorial Article Dhing Tang 21st April 2022 British Nandi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top