Dhing Tang : मीच आलो पुन्हा...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : मीच आलो पुन्हा...!
ढिंग टांग : मीच आलो पुन्हा...!

ढिंग टांग : मीच आलो पुन्हा...!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

हातातल्या मोबाइलमध्ये आलेला संदेश सतराशेव्यांदा बघूनही विनोदवीर तावडेजींचा विश्वास बसत नव्हता. कधी कधी चुकून असे मेसेज येतात. मागल्या खेपेला ‘अभिनंदन! आपके बैंक खाता अमूक अमूक में रु. ग्यारह लाख मात्र की राशी जमा हुई है. आप के बचत खाते में बैंक बैलन्स रु ग्यारह लाख ग्यारह मात्र इतना है….’ असा एक मेसेज आला होता, तेव्हाही असेच झाले होते. मेसेज भलत्याचाच होता. कसले ग्यारह लाख नि कसले काय!...विनोदवीरांनी स्वत:ला सतराव्यांदा चिमटा काढून पाहिला. ‘ओय’ असे सुखद ओरडत ते स्वत:शीच हसले. अहा! आता आपण जगातील सर्वात मोठ्या लोकशाही पक्षाचे महामंत्री झालो!!

आरशासमोर उभे राहून त्यांनी स्वत:च्याच प्रतिमेकडे पाहिले. खुदकन हसले. आपण हरियाणामधले प्रभारी आहोत, आणि महाराष्ट्रातले विधान परिषदेचे आमदार होण्याची संधीही होती. ‘तुमचं नाव यावेळेला फायनल आहे’ असे महाराष्ट्रातील कमळाध्यक्ष मा. चंदूदादांनी फोन करुन कळवले होते. पण घडले भलतेच. आमदारकीची वाट पाहात असताना चक्क दिल्लीहून फोन आला. ‘आपको पक्ष का राष्ट्रीय महामंत्री घोषित किया जाता है’ एवढे एक वाक्य बोलून फोन ठेवला गेला. पद्म पुरस्कारांची वेळ झाली, की असले फोन बऱ्याच जणांना येतात म्हणे. (त्यातल्या काही जणांना चक्क पुरस्कार मिळतोदेखील!) तसेच हे असेल, असे वाटून विनोदवीरांनी लक्ष दिले नाही. मग परम आदरणीय नड्डाजींचा फोन आला.

‘ॐ नमो भगवते गोरक्षनाथाय! नवा कोट शिवायला टाकला का?,’’ त्यांनी विचारले. त्यांना काय सांगणार? गेली तीन वर्षं सगळे नवे कोरे कोट पडून आहेत, हे कसे सांगायचे? हसून वेळ मारुन नेली.

आपके संयम का यह पुरस्कार है, विनोदजी! चुनाव का टिकट कटनेके बादभी आप शांती बनाये रख सके…आपका भला होगा!’’ नड्डाजींची कौतुकोद्गार काढले, तेव्हा डोळ्यात पाणी तरळले होते…गेली काही वर्षं अज्ञातवासात कशी काढली ते आपल्यालाच ठाऊक!

काहीही म्हणा, नड्डाजींच्या फोनमुळे मात्र संशय बळावला. आपण खरोखर महामंत्री होणार की काय? या शंकेने ग्रासले. पण कन्फर्म कसे व्हावे? आपले खरोखर पुनर्वसन होते आहे, याचा पुरावा कुठे शोधावा? शेवटी मुंबईच्या प्रदेश कार्यालयात चक्कर मारली.

तिथे सगळे सामसूम होते. (हा पहिला पुरावा!) तेवढ्यात समोरुन किरीट सोमय्याजी आले.हात दाबून म्हणाले, ‘चहा पाजा चहा!’ (हा दुसरा!) समोरुन वकीलसाहेब ऊर्फ शेलारमामा चालत येताना दिसले. त्यांना हात केला. त्यांनीही हात वर करुन मनगटावरच्या घड्याळात पाहिले, आणि चक्क अबौट टर्न केले! (तिसरा!) कार्यालयात फलकावर नावापुढे ‘राष्ट्रीय महामंत्री’ असे पद लिहिलेले पाहिले,(हा फायनल पुरावा!) आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. सर्वांना चहा मागवावा, म्हणून (माणसे मोजण्यासाठी) ते इकडे तिकडे पाहात होते,

तेवढ्यात प्रवेशद्वारातून साक्षात फडणवीससाहेब आले. (एक चहा वाढला!) विनोदवीरांना बघून एकदम चमकले! ‘थँक्यू! तुम्ही तिकिट कापलंत, म्हणून मी आज महामंत्री होऊ शकलो!,’ पुढे होऊन नवनिर्वाचित महामंत्र्यांनी नम्रपणे त्यांना सांगितले.

‘अरेच्चा? असं कसं झालं...काहीतरी गडबड आहे!,’ असे पुटपुटत ते आतमध्ये निघून गेले. हा तर ढळढळीत पुरावा होता! खात्रीच पटली!!

‘मी पुन्हा येईन’ म्हणणाऱे आतल्या खोलीत गेले, आणि ‘मीच आलो पुन्हा’ असे ठणकावून सांगत विनोदवीर हसतमुखाने दिल्लीला जायला निघाले.

loading image
go to top