esakal | ढिंग टांग : उचलली जीभ..!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

अंगराज कर्णाच्या बाणांनी पुरता
घायाळ झालेला युधिष्ठिर
देहावरल्या रक्‍तखुणांनी
हादरून रडू लागला, तेव्हा
सहदेवाने त्याला उचलून
आपल्या औषधालयात नेले...

ढिंग टांग : उचलली जीभ..!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

अंगराज कर्णाच्या बाणांनी पुरता
घायाळ झालेला युधिष्ठिर
देहावरल्या रक्‍तखुणांनी
हादरून रडू लागला, तेव्हा
सहदेवाने त्याला उचलून
आपल्या औषधालयात नेले...

युधिष्ठिराची विचारपूस करायला
आलेल्या पार्थाला उद्देशून
युधिष्ठिर म्हणाला : पार्था,
तू म्हणे अजेय आहेस,
अनुपमेय धनुर्धर आहेस,
पण ते धनुष्य काय चाटायचे आहे?
ज्याचे प्राण कधीच कुडीतून
मुक्‍त करायला हवे होतेस,
तो कर्ण आज माझ्या जिवावर उठला.
मरता मरता वाचलो मी!
लक्ष्यवेधाच्या स्पर्धेत अचूक
नेम साधणे वेगळे, आणि
युद्धात विजयी होणे वेगळे,
तुझ्याच्याने झेपत नसेल युद्ध,
तर तुझे ते दळभद्री गाण्डिव धनुष्य
दुज्या कुणाला देऊन टाक!
आणि तपोसाधनेसाठी
हिमालयात निघून जा कसा!

युधिष्ठिराच्या बोचऱ्या बोलांनी
संतापलेल्या अर्जुनाचा संयम सुटला.
तो ओरडला : ए, थोरल्या, थोबाड
बंद कर तुझे! युद्ध करणे म्हणजे
तुझ्यासारखे शाब्दिक बुडबुडे
उडवणे नव्हे, त्यासाठी छातीत
रणवीराचे हृदय लागते.
शशमंडळातल्या कोल्ह्यासारखी
तुझी गत! थोरला आहेस म्हणून
तुझी पत्रास ठेवतो की काय!
एका घावात मुंडके उडवीन!
एवढे म्हणून धनुर्धर पार्थाने
खरोखर निकट पडलेले खङ्‌ग
उचलले, आणि तो धावला
युधिष्ठिराच्या अंगावर...

पूजनीय गाण्डिव धनुष्याचा
अपमान करणाऱ्याला कंठस्नान
घालण्याची प्रतिज्ञाच केली होती
धनुर्धर पार्थाने.

युधिष्ठिराचे हनन करणे
त्याला क्रमप्राप्त होते...

युगंधराने वेळीच केला हस्तक्षेप.
दोघांनाही शांतवून तो म्हणाला :
हे वीर्यवानांनो, एकमेकांचा अपमान
करून तुम्ही एकमेकांची हत्त्या
आधीच केली आहे...आता 
शरीराचे काय घेऊन बसलात?’’

धाकल्या बंधूसाठी किती
नतद्रष्ट शब्द युक्‍त केले, 
म्हणून युधिष्ठिर पस्तावला.
संतापाच्या भरात थोरल्याचा 
मानभंग केल्याखातर
पार्थ दु:खी झाला...

ते पाहून युगंधर म्हणाला :
शिव्याशाप आणि अद्वातद्वा
बोलणे हादेखील युद्धनीतीचाच
एक भाग असतो, पंडुपुत्रांनो!
गालिप्रदान हे अनेकदा 
तीक्षातितीक्ष्ण शस्त्रापेक्षा 
अधिक असते घातक, म्हणून
ते आप्तेष्टांवर नव्हे, तर
शत्रूवर चालवायचे अस्त्र असते.
काही कळले?’’

दुसऱ्या दिवशी गाळ्यांचा
भडिमार करत धनुर्धर पार्थाने
साक्षात कुरुसेनापती द्रोणांना
अचंबित केले, आणि युधिष्ठिरानेही
आपल्या संभावित मुखांमधून
अपशब्दांचे लोट वाहात
कौरवांचा नाश घडवला...

भारतीय युद्ध संपले, परंतु
गालियुद्ध अजूनही चालूच आहे,
असे म्हणतात!

loading image