esakal | ढिंग टांग : क्‍वारंटाइन लाइफ!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : क्‍वारंटाइन लाइफ!

सौ. वाघ : (मिशा फेंदारत) अहो, ऐक्‍लं काऽऽऽ..!
मि. वाघ : (पंजावर डोकं टेकून पेंगत) गुर्रर्र..!!
सौ. वाघ : (चिडून) गुरकावताय की घोरताय?
मि. वाघ : (सुस्तीत) पर्रर्र...!
सौ. वाघ : (नाक मुरडत) शी:!! उठा, आता! किती मेलं ते पडून राहायचं?
मि. वाघ : (कंटाळून) उठून काय करायचंय? 

ढिंग टांग : क्‍वारंटाइन लाइफ!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

सौ. वाघ : (मिशा फेंदारत) अहो, ऐक्‍लं काऽऽऽ..!
मि. वाघ : (पंजावर डोकं टेकून पेंगत) गुर्रर्र..!!
सौ. वाघ : (चिडून) गुरकावताय की घोरताय?
मि. वाघ : (सुस्तीत) पर्रर्र...!
सौ. वाघ : (नाक मुरडत) शी:!! उठा, आता! किती मेलं ते पडून राहायचं?
मि. वाघ : (कंटाळून) उठून काय करायचंय? 
सौ. वाघ : (सल्ला देत) पिंजऱ्यातल्या पिंजऱ्यात तरी शतपावली करा!
मि. वाघ : छे, कंटाळ्याचासुद्धा कंटाळा आलाय! 
सौ. वाघ : (घाबऱ्याघुबऱ्या आवाजात) वाघांनासुद्धा कोरोना होतो, अशी बातमी होती म्हणे! खरंय का हो?
मि. वाघ : (ओठ काढून) असेल बुवा! काय म्हाईत!! गेले काही दिवस पेपर वाचलेले नाहीत! रिलायबल बातमी मिळणं कठीण झालंय!
सौ. वाघ : (खुलासा करत) टीव्हीवर सांगत होते म्हणे! शेजारच्या पिंजऱ्यातला कोल्हा सांगत होता की वाघांची तपासणी करून त्यांना क्‍वारंटाइन करा, असं सरकारनं सांगितलं आहे म्हणे!! काळजी घ्या हं!!
मि. वाघ : (सुस्कारा सोडत) आता पिंजऱ्यातल्या वाघांना क्‍वारंटाइन करायचं म्हंजे अतिच झालं! आम्ही आयुष्यभर क्‍वारंटाइनमध्येच आहोत म्हणावं!!
सौ. वाघ : (काळजीच्या सुरात) आपल्याला विलगीकरण कक्षात ठेवतील का हो?
मि. वाघ : (खांदे उडवत) आत्ता आपण कुठे आहोत, असं वाटतंय तुम्हाला? 
सौ. वाघ : वाघांना कोरोना होईलच कसा?
मि. वाघ : (डोळे मिटून) वाघांना जंत होतात की नाही? पोट बिघडतं की नाही? मटण जास्त खाल्लं तर मूळ-
सौ. वाघ : (नाक वाकडं करत) पुरे हो!
मि. वाघ : (आत्मचिंतनाच्या मूडमध्ये) सतत एकाजागी बसून बसून राहायचं! काम ना धाम! वजन वाढतं ते वाढतंच! गेल्या वेळी त्या सुलतान वाघाला मधुमेह झाल्याचं निदान झालं होतं...आठवतंय? आता वाघांच्या रक्‍तातली साखर वाढायला काही स्कोप असतो का? पण झाऽऽला मधुमेह! हे असंच असतं! माणसांचे रोग वाघांना होतातच!
सौ. वाघ : (पिंजऱ्यातून दूरवर बघत) हल्ली माणसंसुद्धा फिरकेनाशी झाली आहेत आपल्याकडे!
मि. वाघ : लॉकडाउन चालू आहे ना! कशाला येतील?
सौ. वाघ : (त्राग्यानं) बोरिवलीचे दोन-तीन बिबटे, तीस-चाळीस हरणं, पाच-पंधरा मोर पार काळबादेवीपर्यंत जाऊन आले म्हणे परवा!! 
मि. वाघ : (हरखून) काय सांगतेस? मला एकदा बांदऱ्याला जाऊन यायचं भारी मनात होतं! नाही जमलं!! (भक्‍तिभावानं) आपल्या व्याघ्रकुलाचं कुलदैवत आहे तिथं! मी कधी गेलो नाही, पण ऐकलंय!!
सौ. वाघ : (स्वप्नाळूपणे) गेलात कधी, तर नवस बोलून या! कोरोनाचं संकट टळो, म्हणावं!
मि. वाघ : (हताशपणे) कांदिवलीत काळविटं, हसनपुऱ्यात हरणं, भायखळ्यात भेकरं, सॅंडहर्स्ट रोडला ससे, वाकोल्याला वाघ, मरीन लाइन्सला मोर...अरे, या मुंबईत काय चाल्लंय काय?
सौ. वाघ : (लगबगीनं) परवा तीन-चार मांजरं आली होती, मनीमावशी म्हणाल्या की तुमच्यामुळे आम्हालाही कोरोना होईल एक दिवस!...दिवस फिरले, एवढं खरं!
मि. वाघ : (आळस देत) क्‍वारंटाइनमध्येच आयसोलेट झालोय आपण! कठीण आहे!! (लकेर घेत) आकाऽऽशी झेप घे रे वाघरा, तोडी सोन्याचा पिंजराऽऽ....
सौ. वाघ : (मिशा फेंदारून) गप्प बसा हो! तो मास्क लावा आधी! क्‍वारंटाइनमध्ये अटक होईल नाहीतर! 

loading image