ढिंग टांग : बंधुभेट : एक भावस्पर्शी क्षण...!

नान्हाभाईंना रातभर झोप लागली नाही. मन हुरहुरत होते. दिल्लीहून वडा भाईंचा निरोप आला होता की, ‘‘आवजो! बप्पोरे मळिये!’’ नान्हाभाईंच्या उत्साहाला मग पारावार उरला नाही.
Dhing Tang
Dhing TangSakal

स्थळ : ७, लोककल्याण मार्ग, न्यू डेल्ही.

वेळ : सकाळी अकरा वा.चा मंगल मुहूर्त.

नान्हाभाईंना रातभर झोप लागली नाही. मन हुरहुरत होते. दिल्लीहून वडा भाईंचा निरोप आला होता की, ‘‘आवजो! बप्पोरे मळिये!’’ नान्हाभाईंच्या उत्साहाला मग पारावार उरला नाही. एरवी बंगल्याच्या पुढल्या दिवाणखान्यात क्वचित येणारे नान्हाभाई चक्क विमान पकडून दिल्लीकडे निघणार होते. नान्हाभाईंनी ब्यागेत डझनभर मास्क, तीन सॅनिटायझर आणि दोन साबणवड्या एवढा ऐवज भरला, आणि ते सकाळची वाट पाहू लागले...

गेले अठरा महिने ज्याची वाट पाहिली, तो क्षण सकाळी अकरा वाजता येणार. नान्हाभाईने साश्रू नयनांनी (खुर्चीवर ठेवलेल्या) पायताणांकडे नजर टाकली. अरेच्चा! ती पवित्र पायताणे कुठे गेली? नेमकी देवळातल्यासारखी ऐनवेळी गहाळ झाली की काय? असती तर उद्या नेऊन दिली असती. पण जाऊदे. नाहीतरी जुनीच पायताणे होती. दहा ठिकाणी खिळे मारलेली! गेली, ती बरेच झाले. त्यांनी वडाभाईची पायताणे एकदा घालूनही बघितली होती, पण लेकाची चावतात!

पार्टी बदलली, म्हणून नाते का बदलते? त्यांना वडाभाईंची आठवण येऊन भरून आले.

...जाग्रणाने लालेलाल झालेल्या डोळ्यांनी, नान्हाभाईने सकाळी सातचे विमान पकडले आणि ते दिल्लीकडे रवाना झाले. सोबत मा. दादासाहेब बारामतीकर आणि मा. आशुक्राव नांदेडकर दोघेही होते.

‘‘मास्कबरोबर कुर्सी की पेटीही बांधा की साहेब!’’ विमानातील हसतमुख कर्मचारिणीने आर्जवाने विनंती केली. ती ऐकून मा. दादा आणि मा. आशुक्राव यांनी आधी मास्क तोंडाला बांधले, मग कुर्सी की पेटी!

वडाभाईंच्या घराचा पत्ता ‘७, लोककल्याण मार्ग’ असा दिला होता. नान्हाभाईंच्या मनात आले, ‘‘हे कसले बंगल्याचे नाव? बंगल्याचे नाव कसे, ‘मातोश्री’, ‘वर्षा’, ‘सिल्वर ओक’, असे भारदस्त असले पाहिजे. हा म्हंजे मोटार ग्यारेजचा पत्ता वाटतो! यहां किसी भी टायर का पंक्चर निकाला जाता है टाइप!! हॅ:!!...’’

नान्हाभाईं आणि अन्य दोघे उत्तमातले उत्तम पोशाख परिधान करुन वडाभाईंच्या निवासस्थानी पोचले. तिघांचीही उत्सुकता ताणली गेली होती. मनावर टेन्शन होते.

‘मी डबल मास्क लावलाय!’’ मा. आशुक्राव म्हणाले.

‘मी डब्बल मास्क काय, डब्बल कोट घातलाय!’’ मा. दादासाहेब म्हणाले. त्यांच्या मनातून ‘ती’ पहाट जात नव्हती.

‘मी बिनधास्त आहे, कारण वडाभाई माझे थोरले भाऊ आहेत!’’ नान्हाभाई अभिमानाने म्हणाले.

तेवढ्यात, अंत:पुरातून मा. वडाभाईंची तेज:पुंज मूर्ती प्रकट झाली.

‘आवो आवो, बेसो! केम छो?,’’ त्यांनी दोन गज अंतर राखून कडकडून नमस्कार केला. होय, कडकडून आलिंगन जसे देता (किंवा घेता) येते, तसा कडकडून नमस्कारही हल्ली करता येतो.

नान्हाभाईंनी सदगदित अवस्थेत मा. आशुक्राव आणि मा. दादासाहेब यांना खूण केली.

तिघांनीही आपापल्या खांद्याच्या पिशवीतून प्रत्येकी बारा फायली बाहेर काढल्या. मराठा आरक्षण, इतर मागास आरक्षण, वादळग्रस्तांना मदत, शेतकरी कर्ज, पीकविमा, कांजूरमार्गची कारशेड, बारा आमदारांची नियुक्ती, मराठी भाषेला अभिजात दर्जा... अशा चार त्रिक बारा फायली काढून पुढ्यात धरल्या. नान्हाभाई हक्काने म्हणाले : ‘‘वडाभाई, सोडवा बुवा या महाराष्ट्राच्या समस्या!’’

फायलींच्या वजनाने लपकलेल्या वडाभाईंना समस्यांचे वजन झटक्यात कळले. घाईघाईने सगळ्या फायली मेजावर दाणकन आदळून त्यांनी सुस्कारा टाकला, आणि दम खाऊन म्हणाले-

‘आटलु बध्दु काम हुं करुं, तो तमे शुं करशो?’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com