esakal | ढिंग टांग - सरहद्द!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग - सरहद्द!

सरहद्दीला नसते ठाऊक
अल्याडचे अन्‌ पल्याडचेही
नाही तिजला माहीत काही
माणूस नामक प्राण्यांमधल्या
मुलुखगिरीचे डावपेचही.

ढिंग टांग - सरहद्द!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

सरहद्दीला नसते ठाऊक
अल्याडचे अन्‌ पल्याडचेही
नाही तिजला माहीत काही
माणूस नामक प्राण्यांमधल्या
मुलुखगिरीचे डावपेचही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

युद्धेबिद्धे, करारनामे
तोफा, बंदुक, गस्तपहारे
शिरा ताणुनी दिले-घेतले
उच्चरवातील उज्ज्वल नारे
सारे काही फिजूल आहे
अदृष्टातील सरहद्दीवर...
तिला कशाला मानवतेचा
(आणि फुकाचा)
 लळा असावा?
तिच्या अंतरी कशास तेव्हा
माणुसकीचा मळा फुलावा?
कुणि अधिकारी सुज्ञपणाने
थंडगार खोलीत बसोनी,
पुढ्यात ओढून कोरा कागद
रेघ ओढतो, बिनदिक्कत अन्‌
सरहद्दीला जन्म लाभतो...

लालनिळ्या शाईतून जेव्हा,
उमटत जाते वक्रवाकडी
सरहद्दीची अंतिम रेषा
निर्जीव कागद कात टाकतो,
उभा राहतो एक नकाशा.
अकादमीच्या भिंतीवरती
चर्चेसाठी लटकत केव्हा
तोच नकाशा असा मिरवतो,
जणू कोठल्या आर्टवर्तुळी
किनखापाच्या मंद्र दालनी
अमूर्तातले चित्र असावे!

सरहद्दीला मोलच नसते,
काल्पनिकाचा नसतो थारा,
तिचिया पोटी वाहे लाव्हा
पृष्ठावरती अगीनवारा.
सरकारी दरबार दफ्तरी
या रेषेचा भलता तोरा
शस्त्र, शास्त्रवेत्ते अन्‌ नेते
तिच्याचसाठी पळत राहती
सैरावैरा.

सरहद्दीची नावनोंदणी
जरि कागदावरीच असते
भूमीवरती हीच चेटकी
राष्ट्र, संस्कृती अलग पाडते

वेळवखत पाहून एकदा
वखवखलेले श्वापद जैसे
सावजावरी तुटून पडते,
तसले काही मरणखेळ ही
धृष्ट अवदसा करून दाविते
...आणि अचानक सरहद्दीवर
भूक अमंगळ अशी उसळते
रक्तसड्यातच कलेवरांचा
ढीग लागतो, काळिज तुटते.

कुटुंबीयांचा निरोप घेऊन 
सरहद्दीवर कर्तव्यावर
उत्साहाने पोहोचलेला 
जवान साधा कळीकाळासम
तुटून पडतो शत्रूवरती
मारत मारत, झुंजत झुंजत
कोसळतो मग धारातीर्थी.
गणवेशातील सुग्रासाचे
घास घेऊन अखेर जेव्हा
सरहद्दीचे पोटच भरते...
तृप्तीचा देऊनिया ढेकर
पुन्हा कागदी जाऊन बसते.

म्हणून म्हटले-
सरहद्दीला नसते ठाऊक
अल्याडचे अन्‌ पल्याडचेही
नाही तिजला माहीत काही
माणूस नामक प्राण्यांमधल्या
मुलुखगिरीचे डावपेचही.

loading image