ढिंग टांग : बेघर आमदाराचे कृतज्ञतापत्र!

माझ्यासारख्या गरीबगुरीब आमदारांसाठी मुंबईत तीनशे घरे बांधून देण्याची स्कीम तुम्ही डिक्लेर केल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पत्र लिहीत आहे.
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

माझ्यासारख्या गरीबगुरीब आमदारांसाठी मुंबईत तीनशे घरे बांधून देण्याची स्कीम तुम्ही डिक्लेर केल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पत्र लिहीत आहे.

मा. शि. प्र. मु. रा. उधोजीसाहेब (मा. मु. म. रा.) यांसी लाख लाख दंडवत आणि मानाचा मुजरा. मी आपल्या आघाडीतील एक साधासुधा सिंपल आमदार असून आयुष्यभर जनसेवेला वाहून घेतल्यामुळे माझी परिस्थिती बेताचीच आहे. निवेदन लिहिणेस कारण कां की, सध्या मला मुंबईत राहावयास घर नाही. हॉटेलमध्ये राहून जनसेवा करीत आहे.

माझ्यासारख्या गरीबगुरीब आमदारांसाठी मुंबईत तीनशे घरे बांधून देण्याची स्कीम तुम्ही डिक्लेर केल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पत्र लिहीत आहे. तथापि, आपल्याच आघाडीतील काही हितशत्रू ‘आमदार घरे स्कीम’ला विरोध करुन आमच्या भावी घरांवर राजकारणाचा बुल्डोझर चालवू पाहात आहेत. त्यांचा निषेध असो!!

आपल्या आशीर्वादाने मी आमदार म्हणून निवडून आलो. त्यापूर्वी मी जनसेवेला वाहून घेतलेले होते. सकाळपासून रात्री उशीरापर्यंत मी सारखा जनसेवा करायचो. घरात पाऊल टिकायचे नाही. संध्याकाळी सातनंतर मी जनसेवेसाठी रात्री उशीरापर्यंत नाक्यावरील ‘नाइट बर्ड रेस्टारंट अँड बार’ या सेवाभावी संस्थेत जात असे. तेथील गरजूंना जमेल तसे मार्गदर्शन करत असे. साधारणत: नऊ वाजल्यानंतर संपूर्ण मार्गदर्शन मी इंग्रजी भाषेत करीत असे. परंतु, माझी ही प्रगती वडलांना बघवली नाही. त्यांनी सरळ कॉलर धरुन घराबाहेर काढले. जाऊ दे.

कालांतराने जनसेवेत माझा जम बसला. नगरसेवक झाल्यानंतर वर्षभरातच माझ्या कार्यकर्त्यांनी आपुलकीने मला हे वाहन भेट म्हणून दिले होते. त्याच काळात मी वडलांना सोन्याची तीस तोळ्याची चेन भेट म्हणून दिली. (त्यांनी मला ताबडतोब घरात घेतले.)

माझ्या कुटुंबियांच्या नावावर आता सदुसष्ट एकर जमीन, चार दुकानाचे गाळे, आठ सदनिका, दोन ट्रक आणि एक ग्यास एजन्सी आहे. पेट्रोल पंप टाकण्यासाठी मेहुणे धडपड करत आहेत. होऊन जाईल! आमदार झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मला प्रेमाने लँडरोव्हर गाडी भेट दिली. केवढे हे प्रेम! चामड्याचे जोडे केले तरी हे उपकार फिटणार नाहीत. (काही कार्यकर्त्यांना मी चामड्याचे जोडे दिलेही!!) वडलांचा हट्ट म्हणून मी गावात छोटेसे तीन मजली घर बांधले. पाठीमागच्या बाजूला एक छोटासा स्विमिंग पूलही केला आहे. माझा पुत्र चि. बंटी हादेखील ‘पप्पा, हेलिचॉप्टर घ्या ना’ म्हणून मागे लागला आहे. काय करायचे आहे आपल्याला हेलिकॉप्टर? पण पुत्र ऐकत नाही...

एवढे असूनही मी एक बेघर आमदार आहे. माझ्या कुटुंबियांचे काही फ्लॅट मुंबई उपनगरात आहेत. काही वर्षांपूर्वी मुंबईत जुहू किनाऱ्यानजीक एक जागा बघून मी बंगला बांधायला घेतला होता, पण बंगल्याची जागा सीआरझेडमध्ये येत असल्याने बांधकाम थांबले. कालांतराने ती संपूर्ण जागा भलत्याच कुणाच्या तरी मालकीची आहे, हेही लक्षात आले!

सबब, मुंबईत घर होऊ शकले नाही. मुंबईत आलो की कुठे राहायचे असा प्रश्न पडतो. शेवटी मी ताजमहाल हॉटेलात खोली बुक करतो, आणि कसाबसा राहातो. साहेब, आपण दयाळू आहात, आमच्यासारख्या गरीबगुरीब आमदारांना घरे देणार आहात! आपले हे प्रेम मी कसे विसरु? एकजुटीच्या वेळी मी हे उपकार नक्की लक्षात ठेवीन!!

मुंबईतील घराबरोबरच प्रत्येक गरजू आमदाराला एकेक फार्महाऊस द्यावे, अशी विनंती आहे. बघा, जमते का! अधिक काय लिहू? धन्यवाद हा शब्द फार तोकडा वाटतो.

आपला आजन्म ऋणी. एक बेघर आमदार-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com