ढिंग टांग : एकीचे बळ..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : एकीचे बळ..!

जगद्वरेण्य श्रीयुत सर उधोजीबाबू, महोदय, श्रीकरकमलेषु, प्रोणाम! मागल्या खेपेला बोंबायमध्ये येऊन गेले, तेव्हा नीट भेट होऊ शकली नाही. आता मात्र तांतडीने भेटण्याची गरज आहे.

ढिंग टांग : एकीचे बळ..!

जगद्वरेण्य श्रीयुत सर उधोजीबाबू, महोदय, श्रीकरकमलेषु, प्रोणाम! मागल्या खेपेला बोंबायमध्ये येऊन गेले, तेव्हा नीट भेट होऊ शकली नाही. आता मात्र तांतडीने भेटण्याची गरज आहे. कारण आपल्या दोघांच्याही राज्यात हल्ली तपास यंत्रणांनी प्रचंड उच्छाद मांडला आहे. हे संशयास्पद अधिकारी रात्रीअपरात्री येऊन दारे वाजवतात. घरात घुसून उचकापाचक करतात आणि काही कागदपत्रे पिशवीत घालून नेतात. नंतरची उचकापाचक पुन्हा नीट लावण्यात दोन-दोन दिवस जातात. गेल्या वर्षी सदर तपास अधिकारी आले असता, माझ्या भाच्याने त्यांच्याकरवी माळ्यावरचे पोते खाली काढून घेतले होते. तेवढा एकमेव फायदा सोडला, तर या तपास यंत्रणांचा काही म्हणता काहीही उपयोग नाही.

माझ्या भाच्याच्या घरात तर त्यांनी साधे बॉलपेनसुध्दा ठेवले नाही. समन्स मिळाल्याच्या पोचपावतीवर सही करण्यासाठीही त्याला शेजाऱ्यांकडून पेन मागवावे लागले!

असे किती दिवस चालणार? तुमच्या राज्यातही असलाच प्रकार चालू असल्याचे कळले. ‘आमच्या महाराष्ट्रात असलाच अन्याय चालू आहे, तुम्ही प्लीज आवाज उठवा,’ असा निनावी फोन मला परवा आला होता. मला आवाज तुमच्या संजयबाबूजींचा वाटला!! असो.

विरोधकांच्या राजवटी बुडवण्याची कारस्थाने चालू आहेत. अशा परिस्थितीत आपण भाजपेतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नवीन आघाडी उघडली पाहिजे. मी तर म्हणते की भाजपच्या विरोधातच आपण सारे एकजुटीने उभे राहिलो तरच हा प्रकार थांबेल!! माझी तर इच्छा आहे की एकजूट करुन थेट पंतप्रधान व्हावे आणि या भाजपवाल्यांच्या घरांवर रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ छापे टाकावेत! मग त्यांना कळेल!! अशी एकजूट वा आघाडी होणार असेल तर मी नेतृत्त्व करायला आणि २०२४ नंतर देशाचे पंतप्रधानपद भूषवायला तयार आहे.

कळावे. आपली अतिशय नम्र. ममतादिदी. (कोलकाता)

आदरणीय ममतादिदी, जय महाराष्ट्र.

काय सांगू तुम्हाला महाराष्ट्रातली कथा? इथे तर तपास यंत्रणा इतक्या शिरजोर झाल्या आहेत की, विचारु नका. आमच्या पक्षातले लोक घराबाहेर पडेनासे झाले आहेत, चुकून पडलेच तर घरात शिरण्यापूर्वी तीन-तीनदा फोन करुन खात्री करुन घेऊ लागले आहेत. हा ससेमिरा टाळण्यासाठी आपण साऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, हे मी मागेच म्हटले होते. त्यानुसार आपण सर्वांनी मुंबईत (माझ्या घरी)भेटावे, असे मी सुचवतो. मी फारसा बाहेर जात नाही! एकजुटीसाठी सिल्वर ओकच्या मोठ्या साहेबांना गळ घातली आहे. ते नक्की तयार होतील, असे दिसते. तसे घडले तर एकजुटीसाठी मी नेतृत्त्व करायला आणि २०२४ नंतर पंतप्रधानकी करायला मी तयार राहीन. (नाही तरी) एक ना एक दिवस मराठी माणूस पंतप्रधानपदाच्या खुर्चीत बसवीन, असा शब्दही मी आधीच कुणाला तरी दिला आहेच. तोही पाळल्यासारखे होईल.

कळावे.

आपला नम्र. उधोजीबाबू. (मुंबई.)

आदरणीय उधोजीअण्णय्या, नमस्कारा! ममतादिदींचे पत्र मला कालच्या डाकेने आले. तुम्हाला आले का? भाजपवाल्यांनी तपास यंत्रणांना हाताशी धरुन विरोधकांना सळो की पळो करुन सोडले आहे. त्याला चोख उत्तर देण्यासाठी आमच्या तेलंगणाने पाठबळ द्यावे आणि एकजुटीसाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे. या एकजुटीचे नेतृत्व मी करावे, आणि (यश मिळाल्यास) २०२४ नंतर मीच पंतप्रधानपदाची वस्त्रे परिधान करावीत, असेही त्यांनी सुचवले आहे. देशासाठी मी ही जबाबदारी घ्यायला तयार आहे.

आपला विनम्र. के. चंद्रशेखरा राव, तेलंगाणा.

Web Title: Editorial Article Dhing Tang 31st March 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top