esakal | ढिंग टांग - बिगिन अगेन!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

युगायुगांच्या काळोखी कुहरात
व्यतीत केलेल्या हरेक 
वेदनादायी क्षणांची गणना 
खंडित झाली अचानक...
त्याने कान टवकारले अंधारातच-
कारण त्याला ऐकू येत होते
दूरस्थ परवलीचे तालबद्ध ढोल.
डम-डम-डम-डम-डम-डम-डम-डम...
हे खुणेचे ध्वनी आहेत की, नेहमीप्रमाणे
क्षणात नाहीसे होणारे दिव्य भास?

ढिंग टांग - बिगिन अगेन!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

युगायुगांच्या काळोखी कुहरात
व्यतीत केलेल्या हरेक 
वेदनादायी क्षणांची गणना 
खंडित झाली अचानक...
त्याने कान टवकारले अंधारातच-
कारण त्याला ऐकू येत होते
दूरस्थ परवलीचे तालबद्ध ढोल.
डम-डम-डम-डम-डम-डम-डम-डम...
हे खुणेचे ध्वनी आहेत की, नेहमीप्रमाणे
क्षणात नाहीसे होणारे दिव्य भास?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या कुहरातील पाषाणह्रदयी काळोख
आताशा चिरपरिचयाचा झाला आहे...
त्याला आत्ता कुठे कळू लागली होती
येथील दगडी भिंतींच्या गर्भात
झुळझुळणाऱ्या भूजलाची स्पंदनभाषा.
अष्टौप्रहराची ओल झाली आहे-
सुरक्षित मातेच्या कुशीसारखी.
संसर्गजन्य संकटाला हूल देत
त्याने गाडून घेतले होते स्वत:ला
अस्वलासारखे महानिद्रेत, 
त्याला किती काळ लोटला? 
हा दिवस, प्रहर, पळ कोणता?
कधी होणार पुनरुत्थान?
को जानाति! कोण जाणे?

इतिहास, वर्तमान आणि भविष्य
एकत्रित सांकळून निर्माण झालेल्या
घट्ट शाईसारख्या निबीड अंध:कारात, 
तो नि:शब्दपणे ओरडला :
‘कुणी आहे का? आहे का कुणी?’
तालबद्ध ढोलांतून उमटले
शब्दातीत आश्वासन :
‘ते तर तुलाच ठाऊक आहे ! ’
तो उठला जागचा आणि
साडेसहा कोटी वर्षे मुरलेल्या
उरल्यासुरल्या शक्तीनिशी त्याने
पायानेच लोटली पुढ्यातील
महाकाय शिळा, जिने
चेचले होते त्याचे 
देही-विदेही अस्तित्त्व.
युगानुयुगे.

सहस्त्र सुयांच्या तीक्ष्ण आविर्भावात
प्रकाशाची किरणे शिरली
 त्याच्या डोळ्यांत.
झकाझोर झाले पळभर 
सारेच पुन्हा काही...
अडखळते पाऊल टाकत 
उघड्यावर येत त्याने 
किलकिल्या डोळ्यांनी पाहिले...
शांत, निस्तब्ध सृष्टी
अंगभूत हिरवाईने त्याच्याकडे
पाहात मंद हांसत होती.
चराचरात भरून राहिलेले जीवन
शेकडो हातांनी त्याला आलिंगन
द्यायला धावले एकसमयावच्छेदेकरून.

आभाळातील घनांनी म्हटलेल्या
पर्जन्यसूक्तांच्या पार्श्वभूमीवर
त्याने घेतला एक दीर्घ,
स्वतंत्र आणि निर्भय श्वास.
आणि क्षणभरात आपले मुंगीपण
संपूर्णत: विसरून मेघांआड
दडलेल्या सूर्यबिंबाकडे बघत
आपल्या गगनभरारीचा घेतला
फक्त एक अदमास.
आता इथून पुढे-
नवी झेप. नवे आस्मान. नवे पंख.

Edited By - Prashant Patil

loading image