ढिंग टांग : कॉल बॅक!

Dhing-Tang
Dhing-Tang

एकदा आम्ही चिडलो की कोणाला ऐक्कत नाही. त्यातून अंडरवर्ल्डवाल्यांबरोबर तर आमचा पूर्वीपासूनच पंगा आहे. दुबईच्या कोण्या भुरट्याने कराचीतल्या कुण्या भाईचे नाव सांगून मुंबईत फोन करुन अकारण दमबाजी करण्याचा उद्योग केला. अंडरवर्ल्डवाले लेकाचे माजले आहेत, त्यांची ही मजाल? मराठी माणसाशी असे शत्रुत्त्व घेण्याची जबर किंमत मोजावी लागेल, असा कडक इशारा देण्यासाठी आपणच तीन-चार फोन कराचीला दाऊदच्या घरी करावेत, असे आम्ही ठरवले, आणि सरळ फोन घुमवला. पहिल्या दोन वेळेला संभाषण त्रोटक झाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पहिला फोन :
आम्ही : (फोन फिरवत) कोन बोल रहेला है रे? (तुटक अपशब्द ऐकू येऊन लाइन बंद झाली.)
दुसरा फोन :
आम्ही : (आयडिया लढवत) माल कब आरेला है? (इथे पलिकडला डॉन जाळ्यात फसला! पण ‘दूसरे नंबर पे फोन लगा बे गधे!’ हे वाक्‍य उच्चारुन फोन कट करण्यात आला.)
तिसरा फोन :
आम्ही : (बेडरपणे फोन फिरवत) हलोऽऽजय महाराष्ट्र!
भाई : (घाबरत घाबरत) हलूऽऽ...कोन बोलतांव?
आम्ही : (कठोर आवाजात) कोन बोलतांव काय कोन बोलतांव! फोन का कट केलास?
भाई : (च्याट पडल्याच्या सुरात) मिनी कट केलांव? नाय, नाय! कोन बोलतांव तुमी?
आम्ही: (मिशी पिळत) तूच ओळख! नाही ओळखलंस? निर्बुध्द लेकाचा! अडाणी! (इथे आम्ही आमचे नाव सांगतो. पलिकडून फोन हातातून घरंगळल्याचे घबराटीचे आवाज येतात. थोड्यावेळाने पलिकडला इसम लाइनीवर येतो...)
भाई : (नम्रपणे) बोला ना शेठ, काय काम काऱ्हलांव?
आम्ही : (करारीपणाने) कासकर ना तुम्ही? (आमच्या आवाजात माहिती अधिकाऱ्याचा खडूसपणा आहे...
भाई : (जीभ चावून) आँ? कोन कासकर? नाय बा! छ्या!! मी बबलू बोलतांव!
आम्ही : (कपाळाला आठ्या घालून) थापा मारु नका! जास्त आवाजी नाय पायजे! तुम्ही आमच्या साहेबांना फोन केला होता ना?
भाई : मिनी केलतांव? कंदी? नाऽऽय वो!!
आम्ही : (संतापाचा कडेलोट होत) खोटारडे, लुच्चे, लफंगे! दमबाजीचे फोन करता ते करता, आणि वर खोटं बोलता? बांदऱ्याचा फोन कोणी केला, ते मुकाट्याने सांग!
भाई : (अजीजीने) तुमची गलतफहमी झालांव व्हो! मिनी नाय केला फोन! डेटा संपलाव!
आम्ही : (दम भरत) तुमच्या कुठल्या तरी भुरट्यानंच आमच्या साहेबांच्या घरी दुबईहून तीन-चार फोन केलेत! दुबई ही काय फोन करण्याची जागा आहे?
भाई : (दुजोरा देत) च्यॅक!
आम्ही : (सात्त्विक संतापाने ) मी म्हणतो, हिंमत होतेच कशी तुमची असले फोन करायची? मनात आणू, तर फरफटत आणू तुला इथे! समजलास काय? गाठ मराठी माणसाशी आहे, हे लक्षात ठेव, तुझ्यासारख्या भुरट्या भाडोत्री गुंडांना वठणीवर आणायला वेळ नाही लागणार!
भाई : (दचकून) आई ग्गो! फरपटत ? नको नको! लई खरचटतांव हो!!
आम्ही : (शूर पवित्र्यात) आमच्या साहेबांच्या घरी उगाचच फोन लावून तू नको ते संकट ओढवून घेतलं आहेस! परिणामांना तयार रहा!! फोन का केला होतास ते बऱ्या बोलानं सांग!!
भाई : (ओशाळवाणेपणाने) तांच तांच कोरोना आनि सुशांत सिंग राजपूतची सुसाइट टीव्हीवर बगून बगून बोरिंग झाली व्हो शेठ! टायमफास म्हनून फिरिवला फोन! सॉरी हां!! बांई बांई!!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com