ढिंग टांग : तोच आमचा डीएनए...!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे. लक्ष पुरा होत आला आहे…लक्ष ठेवणे! ) बाहु नुसते फुर्फुताहेत!
Dhing Tang
Dhing TangSakal

आजची तिथी : प्लव नाम संवत्सर श्रीशके १९४३ ज्येष्ठ कृ द्वादशी. आजचा वार : आखरी वार!

आजचा सुविचार : लोकशाहीच्या शत्रूसंगे युध्द आमुचे सुरु…!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे. लक्ष पुरा होत आला आहे…लक्ष ठेवणे! ) बाहु नुसते फुर्फुताहेत! इतके की माझ्या शेजारी कोणी उभे राहू नये, असा इशारा देऊन ठेवावा लागला. श्वास फुसफुसतो आहे! इतका की तोंडावर लावलेला मास्क च्युइंगमच्या फुग्यासारखा फुगून परत नाकातोंडावर येऊन बसतो आहे! प्रचंड स्फुरण चढले आहे. इतके की छप्पन्न इंचाची छाती फुगून मोजली, तेव्हा ९३ पूर्णांक आठ इतकी भरली! संतापाने अंग ताप ताप तापले आहे. इतके की कपाळावर रोखून ताप मोजणाऱी तीन यंत्रे भस्सकन निकामी झाली… जातीच्या लढवय्याचे हे असेच होते. स्फुरण चढले की मग खरा योध्दा कोण्णाचेही ऐक्कत नाही. लोकशाहीसाठी प्राणपणाने लढणे हे आमच्या डीएनएमध्येच आहे. आमचा डीएनए अजून ह्या लोकांना (खुलासा : ह्या म्हंजे ह्याच!) समजलेलाच नाही. ते काहीही असो. आता युध्दाला तोंड फुटले आहे. ही लोकशाही वाचवण्यासाठीची लढाई आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीची लढार्ई आहे. आमचे अधिकार आणि हक्कासाठीची लढाई आहे. गोरगरीब जनतेच्या न्यायासाठीची आहे. ही लढाई इतक्या कारणांसाठी आहे की सगळी कारणे एकाच ठिकाणी आठवणे अशक्य व्हावे! खोटी कुभांडे रचून आमच्या बारा सदस्यांना बाराच्या सुमारास निलंबित करुन लोकशाहीचे बारा वाजवण्यात आले. ह्या लोकांच्या बारा भानगडी बाहेर येऊ नयेत, म्हणून खोटी स्टोरी रचून सांगण्यात आली, असा आमचा धडधडीत आरोप आहे. साहजिकच आम्ही सभागृहाबाहेरील पायऱ्यांवर बसून अभिरुप सभागृह चालवले. म्हटले, जाव! तुमचे हौस वेगळे, आमची हौस वेगळी!!

सभाध्यक्ष म्हणून आम्ही कोळंबकरांना पायरीवर बसवले. ते गोंधळून विचारत होते की, ‘मी नेमकं काय करायचं आहे?‘ त्यांना सांगितले, ‘‘काहीही नाही!’’ पायऱ्यांवर बसून आपण सर्वांनी ‘देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयीऽऽ…’ हे भजन- कम-भक्तिगीत म्हणावे, अशी काही सदस्यांनी सूचना केली. पण मला ते पाठ नसल्याने मी दुर्लक्ष केले. मी रफीची गाणी छॉन म्हणतो, असं काही लोक म्हणतात. आमच्या सदस्यांना शिव्या येत नाहीत. त्या देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमच्याकडचे बहुतेक सदस्य वकील आहेत. उदाहणार्थ, आमचे शेलारमामा. वकील असले तरी ते वहिमीच्या उजव्या हाताला करड्या नजरेने उभ्या असलेल्या वरिष्ठ पो. नि. सारखे दिसतात, हा भाग वेगळा! त्यांचे सोडा, आमच्या गरीब बिचाऱ्या अळवणीवकिलांनाही निलंबित व्हावे लागले. वास्तविक हे गृहस्थ शुध्द साजूक तुपातले आहेत, त्यातून चक्क पार्ल्यातले!! (जिथे साबुदाणा वडा झक्क मिळतो! ) मेजावरल्या माशीलाही ‘जरा सरकून बसता का म्याडम?’ असे नम्रपणे सांगणाऱ्या अळवणीवकिलांवर गैरवर्तणुकीचा आरोप ठेवणे हेच मुळात गुन्हेगारी स्वरुपाचे (भा. द. वि. ४२० चाप्टर) आहे, असे माझे मत आहे. पण एकदा लोकशाहीचा खूनच करायचे म्हटले की, सगळी केसच ३०२ आणि ३०४ ची होते. जाऊ दे. हळू हळू पायऱ्यांवरुन अंगणात, अंगणातून रस्त्यात, रस्त्यातून चौकात, चौकातून घराच्या दिवाणखान्यात आणि तिथून माजघरात आरशासमोर आम्ही अभिरुप सभा घेतच राहू. लोकशाहीचा आवाज बुलंद करतच राहू. कारण तोच आमचा डीएनए आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com