esakal | ढिंग टांग : येणारे आणि जाणारे!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : येणारे आणि जाणारे!

आजची तिथी : प्रमादी संवत्सर श्रीशके  मार्गशीर्ष चतुर्दशी. (दत्तजयंती)
आजचा वार : ट्यूसडेवार!
आजचा सुविचार : आऽऽनेवालाऽऽ पलऽऽऽ जानेवाला है...थोडासा जो इसमें जिंदगी
बिता दूं, कल तो ये जानेवाऽऽला है...हो होऽऽ!!

ढिंग टांग : येणारे आणि जाणारे!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

आजची तिथी : प्रमादी संवत्सर श्रीशके  मार्गशीर्ष चतुर्दशी. (दत्तजयंती)
आजचा वार : ट्यूसडेवार!
आजचा सुविचार : आऽऽनेवालाऽऽ पलऽऽऽ जानेवाला है...थोडासा जो इसमें जिंदगी
बिता दूं, कल तो ये जानेवाऽऽला है...हो होऽऽ!!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: ( १०८वेळा लिहिणे) सकाळी उठताक्षणी लक्षात आले की आज दत्त जयंतीचा उपवास आहे! दिवसभर सावध राहायला हवे. उत्साहाने उठलो. आन्हिके आटोपली आणि दोन बश्‍या साबुदाणा खिचडी, तीन प्लेट साबुदाणा वडा (चटणीयुक्त) अशी हलकी, अल्पशी उपवासाची न्याहारी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेले काही दिवस मनातल्या मनात राजकारणावर चिंतन सुरु आहे. राजकारणात दोन प्रकारचे नेते असतात : येणारे आणि जाणारे! येणारे कुठून तरी येणार असतात, जाणारे कुठे तरी जाणार असतात. या  ‘कुठून’ आणि ‘कुठे’ या दोन शब्दांमध्ये साऱ्या राजकारणाचे सार साठून राहिले आहे.
उदाहरणार्थ, आमचे प्रदेश कमळाध्यक्ष मा. चंदुदादा कोल्हापूरकर (की पुणेकर?) परवा म्हणाले, ‘मी परत जाईन’. पण ‘कुठून कुठे जाणार’ हे त्यांनी कुठे सांगितले? त्यामुळेच की काय कुणास ठाऊक, कधी जाणार हेही त्यांनी स्पष्ट केले नाही. मा. दादांकडून याचे स्पष्टीकरण मिळवायला हवे!
‘येणारे’ आणि ‘जाणारे’ यावर मनात विचारांचे येणेजाणे सुरु झाले. शेवटी तो उद्योग थांबवून आज कुठल्या विषयावर सरकारला धारेवर धरायचे, याचा थोडा विचार सुरु केला.
कुणालाही धारेवर धरण्याइतके सोपे काम दुसरे नसेल! धारेवरच्या संभाव्य विषयांचा विचार करत असताना अचानक आमचे महाराष्ट्र कमळाध्यक्ष मा. चंदुदादा आले. हाश्‍शहुश्‍श करत बसले. चष्मा पुसला. (ही त्यांची लकबच झाली आहे! चष्मा नसेल तरी उगीच बोटांनी काचा पुसल्यासारखे करीत असतात. जाऊ द्यात. एकेकाची सवय!)

‘या, या! कधी आलात?’, आम्ही त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासोबत कंपनी म्हणून पुन्हा एक बशी साबुदाणा खिचडी खाल्ली.
‘आलो नाही, चाललोय!’ ते म्हणाले.
‘कुठे?’ बुचकळ्यात पडल्यापडल्या आम्ही विचारले.
‘कोल्हापूर!’ दंडाची बेटकुळी दाखवल्यागत करुन ते म्हणाले. कोल्हापूर म्हटले, की असे तालमीत चालल्यासारखे वागावे का? पण आमच्या दादांना हे सांगणार कोण? जाऊ दे. ‘कायमचे?’ आम्ही.
‘तसं कायमचंच. पण अजून पुण्यातली कामं संपलेली नाहीत...’ ते म्हणाले. तसे पुण्यातले कुठले काम संपते? मुळात पुण्यात काम असे असतेच कुठले? पण आम्ही काही बोललो नाही.

‘बारामतीचे दादासाहेब रागावलेत! म्हणाले, परत जायचं होतं तर आलात कशाला? हिते कोणी आवतण देऊन बोलावणं केलं होतं?’ मा.चंदुदादांनी पडेल आवाजात सांगितले. आम्हीही चेहरा टाकला. म्हणालो, ‘ लागतो लळा एखाद्याला! नाही होत सहन ताटातूट! आल्यासारखे राहा पुण्यात काही दिवस! मग जा!’

‘निघतो’ एकदम उठून मा. दादा निघालेच. ‘निघतो किंवा जातो म्हणू नये, दादा. निरोप घेताना ‘येतो’ असं म्हणावं! त्यांना प्रेमाने दटावले. ते किंचित हसले. थोडा वेळ विचार केल्यानंतर हादरलो. ‘पुन्हा येईन’ चा अर्थ महाराष्ट्राने उलटा तर घेतला नाही ना? हरे राम!

Edited By - Prashant Patil

loading image