ढिंग टांग : नवे वर्ष, नवे संकल्प! (काही खरे, काही खोटे) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang
ढिंग टांग : नवे वर्ष, नवे संकल्प! (काही खरे, काही खोटे)

ढिंग टांग : नवे वर्ष, नवे संकल्प! (काही खरे, काही खोटे)

सर्वप्रथम आमच्या तमाम (पक्षी : लाखो) वाचकांना नव्या वर्षाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. हे वर्षही तुम्हां-आम्हां सर्वांना टणकपणे जावो, ही प्रार्थना आहे. गेले दोन दिवस आम्ही आमच्या (पक्षी : तुमच्याही) राजकीय आप्तमित्रांचे नववर्षाचे संकल्प जाणून घेण्याच्या मोहिमेवर होतो. बऱ्याच जणांनी आपले संकल्प सांगितले. काहींनी जाहीर सांगितले, काहींनी कानात सांगितले! या राजकीय आप्तमित्रांच्या संकल्पांवरच आपले पुढले वर्ष कसे जाणार, हे कळून येते. वानोळा म्हणून निवडक काहींचे संकल्प देत आहो :

उधोजीसाहेब (मा. मु. म. रा.) : नव्या वर्षाचे काही संकल्प आहेत. का नसावेत? आहेतच मुळी! किंबहुना असलेच पाहिजेत. नव्या वर्षात दोन शत्रूंचा संपूर्ण बीमोड करण्याचा विडा मी उचलला आहे. (खुलासा : हा वाक्प्रचार आहे. मी विडा खात नाही. वाईट असतो तो! त्याने दात तांबडेलाल होतात. असो.) एक कमळाबाई आणि दुसरा कोरोना!! तीर्थरुपांना दिलेला शब्द मी पाळून दाखवला. आता चि. आदित्य मला काय शब्द देतो, हे ऐकायला माझे कान आतुर आहेत.

चि. आदित्य : दोन दिवस बॅब्स माझ्याकडून शब्द मागत आहेत! मी जाम तोंड उघडले नाही! येत्या वर्षभरात शब्द देण्याची वेळ हुकवण्याचा संकल्प केला आहे!! शिवाय मला शिवाजी पार्कच्या मैदानात वड, पिंपळ, अर्जुन, साग, साल, हिरडा, बेहडा अशी हजारो वृक्षांची लागवड करायची आहे. मैदानाचं अरण्यात रुपांतर करुन त्यात वाघ सोडायचा संकल्प आहे!

रावसाहेब दानवेजी : नववर्षाच्या स्वागतासाठी फटाके फोडण्याचा इरादा होता. त्यासाठी खिशात काड्याची पेटी बाळगली होती. पण ती पाहून मा. (एकनाथभाई) शिंदेसाहेबांचा गैरसमज झाला! मी ‘त्यांच्यात’ आगी लावतोय, असं त्यांना वाटलं. पण मी आगी लावण्याचं काम करत नाही. मी आगीचा बंब आहे! आग विझवतो!! येत्या वर्षात नव्या आगी लावून त्या विझवण्याचा संकल्प आहे…

दादासाहेब बारामतीकर : हे बघा, लोकशाहीत याठिकाणी प्रत्येकाला संकल्प करण्याचा अधिकार आहे. ज्यानं त्यानं तो त्याठिकाणी करावा, त्याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही. माझा संकल्प हा माझा अधिकार आहे, योग्य वेळी सांगीन! पुन्हा पुन्हा तेच तेच काय विचारता?

नानासाहेब फडणवीस : माझा गेल्या वर्षीचा संकल्प यंदाही ‘कॅरी फॉर्वर्ड’ करावा लागणार आहे. गेल्या वर्षीचा संकल्पही त्याच्या आदल्या वर्षीचाच होता. येत्या वर्षात आमचा संकल्प पुरा होवो, आणि पुढल्या वर्षात ‘कॅरी फॉर्वर्ड’ न होवो, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू! कुठला संकल्प? तोच तो- ‘मी पुन्हा येईन’! मी पुन्हा येईन! मी पुन्हा येईन!

चंदुदादा कोल्हापूरकर : माननीय मोदीजी आणि माननीय मोटाभाई यांच्या आशीर्वादाने आमचे नानासाहेब फडणवीस यांना पुन्हा एकदा ‘यायला’ मिळो, हाच आमचा संकल्प आहे. मग ती राष्ट्रपती राजवट असेल,‌ ‌किंवा मध्यावधी!!

चुलतराजसाहेब : गेल्या वर्षी नवा झेंडा, नवं चिन्हं वगैरे मिळवलं. नवा ‘राजगड’देखील मिळाला! सगळं काही मिळालं, पण संकल्प मात्र शोधूनही सापडत नाही. नवा संकल्प शोधणं हाच नव वर्षातला नवा संकल्प असेल! झेंडा, चिन्हं बदलून बघितलं. काहीही उपयोग होताना दिसत नाही. पार्टीचं नाव बदलून बघावं का? असं मनात येत आहे. बघू या काय होतं! जय महाराष्ट्र!!

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top