esakal | ढिंग टांग : मोवॅक्सिन!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

भयानक साथरोगावर लस शोधून काढल्यावर जसे लोकांना हायसे वाटते, तसेच लसीलादेखील टोचली जात असताना कृतकृत्य वाटत असते. तसा कृतार्थतेचा क्षण एका मोवॅक्सिन लसीच्या कुपीच्या जीवनात काल आला. त्याचीच ही चित्तरकथा. हो, मो-वॅक्सिनच... कोवॅक्सिन नाही!!

ढिंग टांग : मोवॅक्सिन!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

भयानक साथरोगावर लस शोधून काढल्यावर जसे लोकांना हायसे वाटते, तसेच लसीलादेखील टोचली जात असताना कृतकृत्य वाटत असते. तसा कृतार्थतेचा क्षण एका मोवॅक्सिन लसीच्या कुपीच्या जीवनात काल आला. त्याचीच ही चित्तरकथा. हो, मो-वॅक्सिनच... कोवॅक्सिन नाही!!
...पहाटेचा सुमार होता. सूर्योदय अजून झाला नव्हता. तरीही इस्पितळात धावाधाव झाली. इस्पितळाचे मुख्य डॉक्टर धावत धावत लससाठा केंद्राच्या उणे आठ अंश सेल्सियस तापमानाच्या थंडीत घाईघाईने शिरले. हुडहुडी आवरत त्यांनी एक मोवॅक्सिनची कुपी काढून कोटाच्या खिशात टाकली, व ते बाहेर आले.

कोटाच्या खिशात पडून राहिलेल्या चिमुकल्या कुपीने डोळे उघडले, आणि कान टवकारले. हे काय चाललंय?
‘न..न...नर्स! त..त..तयारी क...क...करा...!’’ त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. तो उणे आठ अंशाच्या थंडीने की घाबरगुंडीने, हे कुपीला कळले नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बराच घोळ झाल्यानंतर कुपीने खिशातून ऐकले ते असे : देशाचा नव्हे, तर मानवतेचा तारणहार आज स्वत: लस टोचून घेणार असून त्यासाठी धावपळ सुरु आहे. तसे पाहू गेल्यास या तारणहारांस लसबिस टोचून घेण्याची काहीच गरज नव्हती. कारण त्यांना आव्हान देईल, असे त्रिखंडात काही नाही. अखंड योगाभ्यास आणि आध्यात्मिक उंचीमुळे त्यांची प्रतिकारक्षमता एवढी अफाट झाली आहे की विरोधकांनी मध्यंतरी ‘डंडे मारो’ मोहीम जाहीर करुनही त्यांचे काहीही बिघडले नाही. सहा महिन्यात रोज सूर्यनमस्कार घालून त्यांनी स्वत:चे शरीर इतके डंडेप्रूफ केले की विरोधकांच्या हातातले डंड्यांची पडवळे झाली. महाजनांच्या पंथावर चालतचि राहावे, असे एक संस्कृत सुभाषित आहे. त्यानुसार श्रीमान तारणहारांनी लस टोचून घेतली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

...तारणहार सकाळच्या प्रहरी इस्पितळात आले. मुख्य डॉक्टरांची हुडहुडी अजूनही गेली नव्हती. थर्थरत्या हातांनी त्यांनी ती कुपी पुडुचेरीच्या नर्सबाईंकडे दिली. त्यांच्यापाठी सहायक नर्सबाई होत्या. त्या केरळी होत्या. श्रीमान तारणहारांनी दोघींकडे पाहात मंद स्मित केले असावे, असा भास झाला. भास एवढ्याचसाठी म्हणायचे की हल्ली तारणहारांनी मुबलक प्रमाणात दाढी बाळगली आहे. त्या निबीडतेतून स्मित शोधून काढणे अवघड जाते. त्याक्षणी कुपीने ती देखणी मूर्ती पाहियली! अहाहा!! ती भरदार दाढी...थेट रविंद्रनाथांची आठवण करुन देणारी! खांद्यावरली ती तमीळनाडूची शाल, गळ्यातला आसामी गमछा!

...बंगाल, केरळ, तमीळनाडू, पुडुचेरी आणि आसाम...या पंचराज्यांचे प्रतिनिधित्त्व जणू तेथे एकवटले होते. क्षणभर कुपी गोंधळली. तिच्या मनात आयडेंटिटी क्रायसिस निर्माण झाला. पाचही राज्ये इथे उपस्थित आहेत, मग मी कोण? असे तिला वाटू लागले...

एवढ्यात पुडुचेरीच्या नर्सबाईंनी टचकिनी इंजेक्शनची सुई कुपीत खुपसून तिचा आत्मद्रव ओढून घेतला, आणि श्रीमान तारणहारांच्या दंडात हलकेच सोडला. काही लोक इंजेक्शनच्या वेळी ‘उई मां’, ‘मरी गयो’, ’पती गयो’, ‘सूपडो साफ थयो’ अशा आशयाचे उद्गार काढतात, हे कुपीला ठाऊक होते. पण तसे घडले नाही.

‘लगा भी दिया? पताही नहीं चला!’’ एवढेच श्रीमान तारणहार म्हणाले. पुडुचेरीच्या नर्सबाईंचा कमालीचा हात हलका होता. केरळच्या नर्सबाईंना मनात थोडी जळुशी झाली. इथे कुपीचा आत्मद्रव श्रीमान तारणहारांच्या देहात भिनला. कुपीचा निष्प्राण देह नजीकच्या डबड्यात जाऊन पडला. एकदाच मतदान करुन विस्मरणात जाणाऱ्या मतदाराची कृतार्थता कुपीच्या मिटल्या डोळ्यात साकळली होती.
संपली आमची गोष्ट : तूर्त तुम्ही मास्क लावा, वारंवार हात धुवा आणि दो गज की दूरी राखा!

Edited By - Prashant Patil

loading image