esakal | ढिंग टांग : पुढाऱ्यांचे पूर-पर्यटन!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : पुढाऱ्यांचे पूर-पर्यटन!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

माननीय दादासाहेबांना कोण ओळखत नाही? सारा महाराष्ट्र ओळखतो. आता तुम्ही विचाराल, हे कुठले दादासाहेब? महाराष्ट्रात कुठल्याही दिशेला एक दगड मारला तर तीन दादासाहेबांना लागेल! आणि उरलेले तीन दादासाहेब स्वत: दुसरा दगड हातात उचलतील. त्यातून उरलेले तीन दादासाहेब ही दगडफेक लांबून पाहात बसतील. बाकीचे दादासाहेब आपण काहीतरी केलेच पाहिजे, या विचाराने घायकुतीला येतील. या महाराष्ट्रात डझनावारी दादासाहेब आहेत, आणि ते सगळेच माननीय आहेत, हे उघड आहे.

मग आपले जे कथानायक ते माननीय दादासाहेब कोण?

…तर दादासाहेब हे महाराष्ट्रातील एक नामचीन पुढारी आहेत. गरीबांच्या कळवळ्याचा जोर भयंकर वाढल्याने पौगंड वयातच ते राजकारणात शिरले. बघता बघता माननीय झाले.

जेथे जेथे गरीबांचे दु:ख आहे, तेथे तेथे दादासाहेब असतातच. किंवा बऱ्याचदा याच्या उलटेसुध्दा असते.... असे त्यांचे कुत्सित राजकीय विरोधक म्हणतात! पण ते जाऊ दे. दादासाहेबांना महात्मा गांधीजींचे ते सुप्रसिध्द भजन खूप आवडते. ‘‘वैष्णवजन तो तेणे कहिए, जे पीड पराई जाणे रे…’’ हे भजन ते स्वत: इतक्या आर्ततेने म्हणतात की त्यांच्या आळीतील श्वानमंडळी जोराजोराने भुंकून दाद देऊ लागतात.दादासाहेबांना गरीबांचे दु:ख पाहवत नाही, तरीही ते मनावर दरड ठेवून (दगड नव्हे, दरडच!) ते दु:ख पाहायला जातातच. परवा तसे घडले…

महाराष्ट्रभर ठिकठिकाणी खूप पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. जागोजाग महापूर आले. ते पाहण्यासाठी दादासाहेबांना दौरा काढावा लागला. दरड कोसळलेल्या ठिकाणी मातीचे ढिगारे आणि सरकारी यंत्रणा ढिम्म हलत नव्हती. दादासाहेबांनी त्यांना (यंत्रणेला, ढिगाऱ्यांना नव्हे!) यथेच्छ दरडावले. त्यांना बघून नोकरशहा नुसते चळाचळा कापतात, आणि घळाघळा रडतात. (खुलासा : चळाचळा आणि घळाघळापुरतेच आम्ही थांबतो आहो!) दरडग्रस्तांना पायजेल ती मदत करण्याचे फर्मावून दादासाहेबांनी दरडग्रस्तांचे सांत्वन केले. ‘तुम्ही स्वत:ला सावरा, बाकी मी बघून घेतो’ असा दिलासा त्यांनी दिला. स्वत:ला सावरायचे म्हंजे नेमके काय करायचे, हे त्या दरडग्रस्तांना कळेना! दादासाहेबांनी मग हेलिकॉप्टरमध्ये बसून पूरस्थिती पाहायला प्रस्थान ठेवले.

पूरपरिस्थिती फारच बिकट होती. गावागावात पाणी घुसले होते. दादासाहेबांनी नेहमीप्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांना बोलावून फैलावर घेतले. ‘‘मी कोण असंय, माहीत आहे ना? ’’ असा सवाल केला. सरकारी अधिकारी आधीच भिजून ओला झाला होता, म्हणून त्याची शोभा टळली इतकेच.

दादासाहेबांना पुढपर्यंत पूर पहायला जायचे होते. परंतु, नदीतील मगरी गावात घुसल्या आहेत, आणि छपराछपरांवर वाळत पडल्या आहेत, असे त्यांना कोणीतरी सांगितल्यावर त्यांनी पूर पहायला पुढपर्यंत जाण्याचा बेत रद्द केला. हेलिकॉप्टरने गावावरुन चक्कर मारल्यास छपरांवर पहुडलेल्या मगरी दिसतील, असे त्यांना कोणीतरी सुचवले. ती सूचना दादासाहेबांना बेहद्द आवडली. हेलिकॉप्टरमधून त्यांनी तीन मगरींची मनोहारी छायाचित्रे टिपली.

पुढल्या पूरग्रस्त गावात दादासाहेबांच्या मोटारींचा ताफा शिरला. पाहतात तो काय! तेथे ऑलरेडी मोटारी, जिपा, टीव्ही क्यामेरे यांची गर्दी होती. त्यांच्या पुढे तीन दादासाहेबांचा पूरपर्यटन दौरा सुरु असून आपला नंबर लागेपर्यंत संध्याकाळ होईल, असे त्यांना सांगण्यात आले.

संतापलेल्या दादासाहेबांनी मग पुढाऱ्यांच्या पूरपर्यटनाबद्दल नापसंती व्यक्त केली. त्या नापसंतीला आणखी तीन दादासाहेबांनी अनुमोदन दिले. उरलेल्या तिघांनी दाद दिली, आणि बाकीच्या दादासाहेबांनी विरोध केला.

loading image
go to top