ढिंग टांग : ‘बी’ टीम वि. ‘ढ’ टीम! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang
ढिंग टांग : ‘बी’ टीम वि. ‘ढ’ टीम!

ढिंग टांग : ‘बी’ टीम वि. ‘ढ’ टीम!

दादू : (रागारागाने फोन फिरवत) गुर्रर्रर्र! गुर्रर्रर्र!! गुर्रर्रर्रर्र!!

सदू : (फोन उचलत थंडपणाने) कोणाला एवढं गॅस ट्रबल झालंय आमच्यामुळे? सोडा प्या, सोडा!!

दादू : (संतापाने कसेबसे शब्द फुटत) सद्या, तोंड सांभाळून बोल! गॅस ट्रबल नाही, डरकाळी आहे ही वाघाची!

सदू : (खट्याळपणाने) अस्सं होय! तरीच म्हटलं, आज अचानक म्याव म्यावऐवजी गुर्रर्र गुर्रर्र आवाज कसा आला? हाहा!!

दादू : (भयंकर रागाने) खामोश! हे काय करुन ठेवलंस? प्रत्यक्ष गनिमाशी सलगी? महाराष्ट्राच्या कट्टर दुश्मनांशी हातमिळवणी? कुठल्या मराठी माणसानं आता तुमच्यावर भरवसा ठेवावा?

सदू : (गुरकावून) हु:!! तुमच्यावर भरवसा ठेवणारांचं काय झालं, ते बघतोय आम्ही!

दादू : (नमतं घेत) …असं कसं चालेल रे सदूराया! कालपर्यंत ज्यांचे व्हिडिओ लावत होतास, त्यांनाच डोक्यावर घेतोस? शोभतं हे का तुला? गेल्या निवडणुकीच्या वेळी किती धमाल आणली होतीस! व्हिडिओ काय, भाषणं काय, डायलॉगबाजी काय!!

सदू : (दुरुत्तर करत) हो, पण मतं मिळाली तुम्हाला! ज्यांच्या विरोधात तुम्ही निवडणुका लढल्या, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलात ना? मग आता का मिरच्या झोंबतात?

दादू : (हताश होत्साते) वाटलं होतं, माझ्या महाराष्ट्राचं भलं करण्याच्या कामी तू मला साथ देशील! या मुंबईचा विकास करण्यासाठी मदत करशील! कारण कसाही असलास तरी भाऊ आहेस माझा! पण घरचेच वासे फिरले…

सदू : (उपरोधानं) गेल्या अडीच वर्षात तुम्ही महाराष्ट्राचं किती भलं केलं, ते बघितलं आम्ही!!

दादू : (भडकून) एक शब्द बोलू नका! तुम्ही त्या कमळवाल्यांची ‘बी’ टीम आहात, ‘बी’ टीम!

सदू : (कोरडेपणाने) तुम्ही त्या घड्याळवाल्यांची ‘ढ’ टीम आहात! हाहा!!

दादू : (चिडून) नाही, नाही, कमळवाल्यांची ‘बी’ टीम त्या ओवेसीची आहे! तुम्ही ‘सी’ टीम आहात!

सदू : (नेहले पे देहला…) तुम्ही ‘फ’ टीम आहात!

दादू : (आणखी चिडून) तुम्ही ‘डी’ टीम आहात, ‘डी’!

सदू : (आणखी चिडवत) हेहेहे!! म्हणे मराठीचे कैवारी! नावं ठेवताना बाराखडी तरी मराठी वापरा! तुम्ही ‘ळ’ टीम आहात, ‘ळ’!! ज्जा!!

दादू : (काहीही न सुचून) आम्ही ‘ढ’ असू, ‘ण’ असू नाही तर ‘ख’ असू! तुम्हाला काय करायचंय? एक नगरसेवक नाही निवडून आणता येत तुम्हाला! आणि गमजा कसल्या मारता? शिवाजी पार्कात गर्दी जमवली म्हंजे निवडणुकांचा फड जिंकला, असं होत नसतं!

सदू : (स्पेशल खर्जात) आगे आगे देखो होता हय क्या! आमचं इंजिन यार्डातून सुटलं की थेट बुलेट ट्रेनच्या वेगानं येऊन पोहोचेल! स्टेशन अब दूर नहीं!!

दादू : (खिजवत) कालपर्यंत परप्रांतीयांच्या नावानं खडे फोडत ‘खळ्ळ खटॅक’ चाललं होतं तुम्हा लोकांचं, आता एकदम हनुमान चालिसा? कोलांटउडी म्हंटात ती हीच!!

सदू : (थंडपणाने) ही कोलांट उडी नाही, हनुमान उडी आहे! हनुमानचालिसा तो ट्रेलर है, मी तर अयोध्येलासुध्दा जाणारेय!!

दादू : (वैतागून) जाशील, जाशील!! आधी झेंडा बदललास, मग निवडणूक चिन्हाचं रेल्वे इंजिन बदललंस…आय मीन, त्याची दिशा बदललीस! आता थेट पार्टीच बदललीस!! त्या कमळाबाईशी तुझं काहीतरी गॉटमॅट चाललेलं दिसतंय!!

सदू : (एक सॉल्लिड पॉज घेत)…आमचं ठरलंय!

Web Title: Editorial Article Dhing Tang 5th April 2022 British Nandi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top