
ढिंग टांग : भोजनवारचा बेत!
माणसाने कितीही खेळकर व्यक्तिमत्त्वाचे, आनंदी स्वभावाचे आणि रसिक वृत्तीचे असले तरी दिवसातून चारवेळा जेवणे हे काही बरे लक्षण नाही. आमचा दिल्लीतील मंगळवार हा असा जेवून जेवून दमण्यात गेला! सकाळी एक तीन अंड्यांचे आमलेट आणि मोजून सहा पावाचे स्लाइस, दोन बशा पोहे आणि तीन कप चहा एवढी माफक न्याहारी केली होती. वास्तविक आलु पराठे हा आमचा दुर्बळबिंदू (पक्षी : वीक पाइंट) आहे. तीन-चार भलेभक्कम आलुप्रांठे चेपले की आमचे काम भागते. सोबत दही, अचार आणि जमल्यास थोडे लोणी असले तर काम फत्तेच. आलु प्रांठे आवडतात म्हणून खानसाम्याने त्यांची चळत बाजूला आणून ठेवली. पण म्हटले उगीच अतिरेक नको.- एकच खाल्ला!
महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांना संसदीय प्रशिक्षणासाठी राजधानीत बोलावण्यात आले आहे. त्यात आमची जिम्मा झाली. न्याहारी नेमस्तपणे पार पडली हे बरे झाले, कारण दिवसभरात दोन-दोन जेवणाची निमंत्रणे होती. दुपारचे जेवण मुद्दाम थोडेसेच घेतले. माणसाने कसे अल्पाहारी असावे. दोन घास कमी खावेत. किमान बारा सूर्यनमस्कार आणि काही योगासने करावीत. तब्बेत चांगली राहाते. (म्हणे!) महाराष्ट्र सदनात हल्ली बरे जेवण मिळत नाही, असे ऐकून होतो. म्हणून घाबरत घाबरतच एक अमृतसरी छोले, एक पनीर माखनवाला, पाच कुलचे आणि एक दम बिर्याणी मागवली. म्हटले अतिरेक नको! पोटात थोडी जागा ठेवली पाहिजे. सायंकाळी दोन दोन रात्रिभोजनाची निमंत्रणे आहेत…
रात्री ‘६, जनपथ ’ येथे थोरल्या साहेबांच्या बंगल्यावर सर्वपक्षीय आमदारांसाठी निमंत्रण होते. त्यासाठी मी वेगळा कुर्ता शिवून घेतला. जाकिटही नवेकोरे घेतले. दिल्लीत बरे पडते! तेवढ्यात घाबऱ्या घुबऱ्या होत्साते कुणीतरी म्हणाले की, ‘संजयाजी राऊतसाहेबांनी दुपारी चहाला बोलावले आहे, चला, चला!’ गेलो, झाले!
राऊतसाहेबांनी चहा दिलाच, सोबत बटाटेवडेही आणले. वर ‘कांदाभजी सोडायला सांगू का?’ असेही खेळीमेळीने विचारले. मी ‘नको’ म्हणालो, म्हटले कशाला उगीच अतिरेक? पण राऊतसाहेब कोणाचे ऐकतात?त्यांनी टोपलेभर कांदाभजी आणून टाकली! बराच वेळ तिथं बसल्यावर कुणीतरी म्हणाले, ‘‘ इथंच थोडी शतपावली करु, मग डिनरची वेळ होईलच!’’
शतपावली नाही, पण तिथेच टाइमपास केला. सायंकाळी ‘६, जनपथ’ला पोचलो तेव्हा पोट जड झाले होते. तेथे सर्वपक्षीय ‘हाहा होहो हीही’चा कार्यक्रम होता. तेवढ्यात तेथे ज्येष्ठ मंत्री व भारताचे स्पायडरमॅन मा. नितीनभौ गडकरीसाहेब आले. ते आल्याआल्या ’खोखो खीखी ह्या ह्या ह्या…’चा कार्यक्रम सुरु झाला. हिरवळीवर खुर्च्या टाकून सगळे बसले होते. पण बुफे कुठे लावला आहे, हे कळेना! यथावकाश तेथे भोजनाची ताटे आणून ठेवण्यात आली. ‘‘खाऊन घ्या रे! ईडीचा फेरा आला की हे पदार्थ बघायलासुद्धा मिळणार नाहीत…’’ कुणीतरी दहीवड्यांवर ताव मारत म्हणाले. मी अतिरेक केला नाही. थोडासा पुलाव, मग थोडा आणखी पुलाव आणि शेवटचा आणखी थोडा जास्त पुलाव एवढेच खाल्ले!! सलाद, कोशिंबिरी, पुऱ्या वगैरे आम्ही जेवणात जमेस धरत नाही. गडकरीसाहेबांनी ‘हुंऽऽ..लगे रहो बेटा’ असे प्रोत्साहन दिले नसते तर बरे झाले असते! जाऊ दे.
एवढे झाल्यावर गडकरीसाहेबांनी माझ्या खांद्यावर हात टाकला, म्हणाले : ‘‘येवढ्यात दमले का बावा? अजून रावसाहेब दानव्यांकडलं जेवण बाकी आहे नं? उरलं म्हंजे मग?’’
Web Title: Editorial Article Dhing Tang 7th April 2022 British Nandi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..