ढिंग टांग : विपुल पुलांतील एकच पूल!

नदिया बहै है बाढसे, बिछडै दोनो तीर, पुल बांधै जो प्रेम का, वही रांझा, वही हीर
Dhing tang
Dhing tangSakal
Summary

नदिया बहै है बाढसे, बिछडै दोनो तीर, पुल बांधै जो प्रेम का, वही रांझा, वही हीर

नदिया बहै है बाढसे, बिछडै दोनो तीर,

पुल बांधै जो प्रेम का, वही रांझा, वही हीर

आमचे खरेखुरे मार्गदर्शक मा. नितीनजी गडकरीजी यांना भेटताक्षणी आम्हाला उपरोक्त दोहा सुचला. त्यांच्या निव्वळ दर्शनहेळामात्रेच आमच्या मनात काव्यशक्तीचा वाहनांसारखा सुळसुळाट होतो, प्रतिभेचे उड्डाणपूल उभे राहतात, आणि कल्पनांच्या रो रो बोटी मनरुपी जलाशयावर मन:पूत तरंगू लागतात. आमच्यासारख्याचे जर हे होत असेल तर ओरिजिनल प्रतिभावंतांचे काय होत असेल अं? समोर भेळीचे पुडे होते. त्या पुड्यांच्या पलिकडे साक्षात गडकरीसाहेब बसले होते. त्यांनी मूगभज्यांची ऑर्डर नुकतीच दिली होती. ती ऐकून आम्हाला स्फुरण चढले…

‘साहेब, एक चिनी म्हण आहे, तुमच्याकडे दोन पैसे असतील तर एका पैशाची रोटी घ्या, दुसऱ्या पैशाचं फूल घ्या. रोटी तुम्हाला जगवेल, आणि फूल तुम्हाला जगण्याचा आनंद देईल,’ आम्ही सद्गदित सुरात सुविचार फेकला. (मूगभज्यांसाठी काहीही!) पण आमच्या सुविचारमौक्तिकांकडे गडकरीसाहेबांनी सपशेल दुर्लक्ष केले.

‘दोन पैशात रोटी? काकानं ठेवली तुझ्या!’’ गडकरीसाहेबांनी आमचे व्यवहारज्ञान काढले. म्हणाले, ‘आणि या देशाला फुलांची नाही, पुलांची गरज आहे,’

भेळीची प्लेट रिकामी करत गडकरीसाहेबांनी आमचा आख्खाच्या आख्खा सुविचार टिश्यू पेपरसारखा तोंडाला पुसून चोळामोळा करुन कचऱ्याच्या डब्यात (लांबूनच) नेम धरुन फेकला.

‘पेट्रोल-डिझेलऐवजी इथेनॉल वापरण्याची तुमची आयडिया झकास आहे, साहेब!,’ आम्ही विषय बदलला. इथेनॉल म्हटलं की गडकरीसाहेबांची कळी खुलते. गाडी (किक न मारता) बटन स्टार्ट होते, हे आम्ही ओळखून होतो.

‘कसलं इथेनॉल घेऊन बसला बे! पाण्यावर चालवा गाड्या...!,’ मूगभज्यांचा सुगंध आसमंतात दर्वळला, लौकरच प्लेटी बाहेर येणार या कल्पनेने आमची कळी खुलली. ‘पूल बांधण्यात तर तुम्ही तज्ज्ञ आहा!,’ आम्ही म्हणालो. पूल म्हटले, की गडकरीसाहेब फुल फॉर्मात येतात, हेही आम्ही ओळखून होतोच. मूगभज्यांनंतर पावभाजी किंवा पिझ्जा यावा, अशी आमची दूरगामी योजना होती…

‘इंग्लिश खाडीवर फ्रान्स ते इंग्लंड पूल टाकता येईल का, असं विचारायला इंग्लिश इंजिनीअरांचं शिष्टमंडळ येऊन गेलं! मी तिथल्या तिथे दोन लाख कोटी पौंडाची योजना समोर टाकली...,’ भेळ आणि मूगभज्यांच्यामध्ये इंटर्वलला चिवडा आला! त्याचा आस्वाद घेत घेत गडकरीसाहेबांनी आंतरराष्ट्रीय योजना समजावून सांगितली. त्यांच्याप्रति आमच्या मनात असलेला आदरभाव इंग्लिश खाडीला भरती यावी, तसा दुणावला…

‘आपल्याकडे पुलांना एक्सपायरी डेटच नसते, असं तुम्ही परवा म्हणालात, त्याचं,’ मूगभज्यांची एण्ट्री झाल्याने आमचे वाक्य पूर्ण होऊ शकले नाही.

‘पुलांचं ऑडिटच होत नै नं! भैताडंच आहेत लेकाचे!,’ गडकरीसाहेबांनी तक्रार केली.

आम्हीही भैताडासारखी मान डोलावली.

‘पुलाचा विषय काढलात म्हणून सांगतो! नव्या उड्डाणपुलाची ऑर्डर आली आहे...,’

गडकरीसाहेबांनी खालच्या आवाजात ब्रेकिंग न्यूज दिली.

‘कुठल्या?’’ ही कुठली तरी किमान साठ हजार कोटींची योजना असणार, याबद्दल आमच्या मनात शंका नव्हती.

‘आमची कमळाबाई आणि तुमची उधोजीसाहेबांची सेना यांच्यात पूल बांधण्याची ऑफर आहे…बघू!’’ गूढ हसत गडकरीसाहेब म्हणाले.

मनोमन आमच्या प्रतिभेचे वाहन त्या पुलावरुन भरधाव धावू लागले होते, आणि समोर नवाकोरा टोलनाका दिसू लागला होता. इति.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com