ढिंग टांग : करु नको विस्तार, सख्या रे...!

सर्व सहकारी- तातडीचे आणि महत्त्वाचे. परवाच्याच दिवशी दिल्लीला जाऊन आलो. मंत्रिमंडळ विस्तार केव्हा करु? असा कौल मागण्यासाठी दिल्लीला गेलो होतो.
Dhing Tang
Dhing Tangsakal

सर्व सहकारी- तातडीचे आणि महत्त्वाचे. परवाच्याच दिवशी दिल्लीला जाऊन आलो. मंत्रिमंडळ विस्तार केव्हा करु? असा कौल मागण्यासाठी दिल्लीला गेलो होतो. उजवा कौल मिळाला आहे! शिवाय महाशक्तीने पोटभर आशीर्वाद दिला. (ढोकळा, ठेपला, खांडवी, फाफडा असा प्रसाद सेवन केला.) आशीर्वाद देताना महाशक्तीने पुढच्या दिल्लीवारीत मंत्रिमंडळाची यादी बनवून आणायला सांगितली आहे.

गेल्या वर्षभरात ज्यांनी वारंवार मंत्रिपदाची मागणी केली, त्यांना चक्क्यासारखे टांगावे, जे क्याबिनेट मंत्रिपद मागतील, त्यांना राज्यमंत्रीपद, आणि जे राज्यमंत्रीपद मागतील, त्यांना महामंडळ द्यावे, अशी सूचना पुढे आली आहे. जे अगदीच ऐक्कत नाहीत अशा सहकाऱ्यांना दिल्लीतील केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले जाईल, असा सज्जड इशाराही यावेळी महाशक्तीने दिला आहे.

संपूर्ण कार्यक्रम ठरवून आलो आहे. कार्यक्रमाची रुपरेषा अशी : संभाव्य मंत्र्यांची यादी पूर्ण झाली की ती महाशक्तीच्या पायाशी ठेवण्याचा कार्यक्रम रीतसर होईल. ज्यांनी गेल्या वर्षात जास्त पापे केलेली असतील, त्यांच्या नावावर काट मारली जाईल. महाशक्तीने फायनल उजवा कौल दिला की मग वाजतगाजत ती यादी (पालखीत घालून) मुंबईत ‘सागर’ बंगल्यातील मिनिमहाशक्तीच्या चरणी ठेवली जाईल. मिनि-महाशक्तीला कमी समजू नये. तिची पॉवरही जाम चालते, हे मी दिल्लीवारीत बघितले आहे. तिथे आणखी काटछाट होईल. मग मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख यथावकाश जाहीर होईल. कुणीही घाई करणेची नाही!

तुम्ही सर्व साथीदार गुवाहाटीपासून माझ्यासोबत आहात. तुमची निष्ठा दाद देण्याजोगी आहे. परंतु, महाशक्तीची साथ तुमच्याही आधीपासून आहे, हे कृपया ध्यानी घ्या! किंबहुना अकरा महिन्यांपूर्वी उठाव करावा, असे माझ्या मनात आले, त्याच्याही आधीपासून महाशक्ती माझ्या पाठीशी आहे!! महाशक्तीचा विजय असो.

…तारखेकडे लक्ष ठेवा. तुमच्यापैकी काही जणांना फोन येतील. तयारीत रहा. तुमचा फोन कायम चार्ज करुन ठेवा. जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांचा. कर्मवीर लोकनाथ. (मु. पो. ठाणे)

प्रिय मा. कर्मवीरसाहेब यांना मानाचा मुजरा. मंत्रिमंडळाचा विस्तार आज-उद्याकडे होणार, असे गेले दहा महिने ऐकतो आहे. विस्तार कधी? या प्रश्नाची आजवर वेगवेगळी उत्तरे ऐकली. अधिवेशनानंतर, अधिवेशनाआधी, हिवाळ्यानंतर, उन्हाळ्याआधी, उन्हाळ्यानंतर, पावसाळ्याआधी आणि पावसाळ्यानंतर…अशी अनेक उत्तरे आत्तापर्यंत मिळाली आहेत- मंत्रिपद तेवढे मिळाले नाही!! असो.

मंत्रिमंडळ विस्ताराचे टेन्शन मनातून गेले होते. जी घटना कधीच घडणार नाही, तिचे टेन्शन कशाला घ्यायचे? पण यावेळी मामला जरा सीरियस वाटतो आहे! जे अजिबात ऐक्कत नाहीत, त्यांना केंद्रात मंत्रिपद देणार, हे ऐकून आपल्या सर्वच सहकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. दिल्लीत माणूस पाठवला की परत येणे अशक्य!!

साहेब, एकवेळ विस्तार राहू द्या, पण हे असले प्रकार नकोत! गेल्या अकरा महिन्यात आम्ही दरवेळी निमूटपणाने ऐकून घेतले. विस्तार कधी? असे विचारणेही आम्ही सोडून दिले आहे. यावेळीही ऐकू! आताशा पुढल्या विस्तारात आपला नंबर लागणार, या कल्पनेतच चांगला वेळ जातो. हवे कशाला ते मंत्रिपद? दिल को खुश रखने को, गालिब ये खयाल अच्छा है!!

मंत्रिमंडळ विस्तार होणार ही आनंदाची बातमी आहे की धमकी? असा प्रश्न पडला आहे. तेव्हा ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ या उक्तीनुसार चालले आहे तसेच चालू ठेवावे, ही विनंती. विस्तार सोडला तर बाकी सगळे ‘ओक्के’ आहे. आपला एकनिष्ठ सहकारी.

ता. क. : मी सुरतेलाच जॉइन झालो होतो, गुवाहाटीवाले मला ज्युनियर आहेत, याची कृपया नोंद घ्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com