ढिंग टांग : इन्नोवातिल ईश्वर येतो...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang
ढिंग टांग : इन्नोवातिल ईश्वर येतो...!

ढिंग टांग : इन्नोवातिल ईश्वर येतो...!

जगणे झाले आगफुफाटा

माथ्यावरती जळते ऊन

गिधाड घेते नभात गिरक्या

गुणगुणते मरणाची धून

कडकड फुटती खोडे-फांद्या,

पानवळ्याचा नुरे दिमाख

जनवन जळते जाळामध्ये

वाऱ्यावरती उडते राख

पाणवठ्याने प्राण सोडला,

विहिरीचा अन लागे ठाव

शुष्ककोरड्या श्वासांवरती

कसा जगावा अपुला गाव

पाण्यावाचुनी जीव तडफडे

उभे जळाले पहा शिवार

थंड चुलीची धग जाणवते,

वरति उन्हाचा भारी कहार

अगा इट्टला, उगा इवळलो,

किती करु म्यां तुझाच धावा

होरपळीच्या पळापळीला,

कारण ठरला हा वणवा

धुगधुगणाऱ्या कुडीतले अन

जगणे जळते बघ सैराट

अल्याड नाही, पल्याड नाही,

जगण्याला ना उरला काठ

गावकुसाला लागुनि तेथे

टेकाडावर फुटते जौळ

भुई फाटली, भेगांमधुनि

उखडुनि गेले कुणी समूळ

गगनामधुनि आग ओकते

जाळ धावतो रानोमाळ

शुष्क पानवळ मुकी बिचारी,

सुन्न पहुडला गाव रहाळ

ऐन दुपारी सडा उन्हाचा

चुलवण फेके उगीच धग

शुष्क कोरड्या काठवटातच

पीठ राहिले उरले जग

चौकामधली थकेल हपशी

गावकीतली वांझ विहीर

तहानलेली पांढर रडते

रहाटणीचा सुटला धीर

कोण ओकते आग छतांवर

कुणी निखारे पाखडते

गोठ्यामधली गाय तांबडी

व्याकुळ होऊन हंबरते

पायठणीच्या तळात केव्हा

पडून आहे एक सुणें

मरतुकड्याचे ओशाळे ते

मोजत बसले फुका जिणे

देह मातिचा मिळतो मातित

आत्मा म्हणतो तो मी नव्हे!

हे परमात्म्या खेळ तुझा हा

खेळ तुझा अन नियम नवे!

हे परमात्म्या, तूच काय तो

देव्हाऱ्यातिल मम ईश्वर?

इन्नोवातुनि येतो जातो

मतांस जागुनि देतो वर?

ताफा येतो धूळ उसळते

इन्नोवातुनी येई ईश्वर

हात दावितो आशीर्वचनीं

वाटे अपुला देहचि नश्चर!

इन्नोवातिल ईश्वर जेव्हा

हात जोडतो हलवित मान

विलायतेतील गॉगलमधले

ऊन निवळते विसरुन भान

इन्नोवातिल ईश्वर जेव्हा

आश्वसितो मज, ‘‘डोण्ट वरी!

येईल पाणी, मिळेल पाणी,

लेकिन थोडा धीर धरी!’’

आश्वसितांची मते घेऊनी

ईश्चर करतो पोबारा!

किती ओतल्या कळशा हंडे

तरिही कोरडा गाभारा!

Web Title: Editorial Article Dhing Tang British Nandi 12th April 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top