ढिंग टांग : कोहिनूर मशहूर है…! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

संपादक, स न. वि. वि. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. बाई पुण्यवान होत्या, पितृपक्षात निर्वाण लाभले. ईश्चरेच्छा बलियसी.

ढिंग टांग : कोहिनूर मशहूर है…!

(एक लखलखीत पत्रव्यवहार…)

संपादक, स न. वि. वि. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. बाई पुण्यवान होत्या, पितृपक्षात निर्वाण लाभले. ईश्चरेच्छा बलियसी. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र प्रिन्स चार्ल्स हे राजे झाले आहेत. त्यांचे अभिनंदन. तथापि, आमचा कोहिनूरनामक एक हिरा काही वर्षांपूर्वी त्यांच्या ताब्यात (चुकून) गेला होता. तो आम्हाला परत मिळावा, अशी महाराजमजकुरांचे चरणी विनंती आहे. बहुधा मृत्यूपत्रात उल्लेख असेलच; परंतु स्मरण करुन देण्यासाठी हा पत्रप्रपंच. कळावे. आपला ना. ना. जोशी (स. पेठ, पुणे).

संपादक, ज्याअर्थी मेहेरबान ब्रिटिश साहेब यांच्या खजिन्यात अनेक अमोलिक रत्ने आहेत व ज्याअर्थी त्यांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केले व ज्याअर्थी, येथील रयतेची लूट केली, त्याअर्थी त्यांच्या खजिन्यातील बव्हंशी रत्ने, खडे, हिरे, जवाहीर, सोने, तथा चांदी शुद्ध भारतीय आहेत, असा दाट वहीम आहे. सबब, सदरील खजिन्यातील हिरा नामे कोहिनूर वय अदमासे वर्षे तीन अब्ज तात्काळ अग्रक्रमाने भारताकडे प्रतिवर्तित करणेत यावा, असे निर्देशित करणेत येत आहे. कार्यवाही व्हावी. आपला साहेबराव कोथळे-पाटील, माजी पीएस टु ए. एस.डी.ओ, जीएडी. मंत्रालय, मुंबई.

संपादकसाहेब, जय महाराष्ट्र, कोहिनूर हिरा जोवर भारतात परत येत नाही, तोवर बासमती राइसची निर्यात रोखावी, अशी कृषिखात्याकडे आमची एकमुखाने मागणी आहे. कळावे. अध्यक्ष, कृ. उ. बा., सांडगेवाडी.

संपादक, कोहिनूर हिऱ्यासंदर्भात पत्रव्यवहार वाचनात आला. या दुर्मिळ रत्नाबद्दल बरेच अज्ञान आहे. ते दूर करावे यासाठी हे पत्र. आमच्या नव्या संशोधनानुसार हा हिरा मुळात १०५ क्यारटचा नाहीच! तो मौल्यवानदेखील नाही. कुठल्याही बस डेपोच्या किंवा रेल्वे स्थानकाच्या समोर ‘कोहिनूर’ आढळतोच!! हा हिरा नसून टेक्निकल इस्टिट्यूट आहे. (प्रस्तुत लेखकाने तेथूनच इलेक्टिकल वायरिंग आणि फिटिंगचा कोर्स पूर्ण केला आहे. ) तेव्हा याबाबत गैरसमजापोटी सुरु झालेला पत्रव्यवहार थांबवावा, ही विनंती. आपला. बबन गेंगाणे (ठुकरटवाडीचा कोहिनूर)

फ्रॉम द रॉयल डेस्क, बकिंगहॅम पॅलेस, लंडन -

डिअर मि. एडिटर, हे राजपत्र तुमच्या आरोग्यपूर्ण हाती सुखरुप पडेल, अशी आशा करु का? आपल्या सुप्रतिष्ठित दैनिकात कोहिनूर हिऱ्यावरुन बराच पत्रव्यवहार चालू आहे, असे रॉयल अटॅचीने कळवले. आपल्या देशात कोहिनूरवरुन काहूर माजले असून तो हिरा ताबडतोब भारताला परत करण्यासाठी राष्ट्रकुलातून दबाव वाढत असल्याचेही समजले. झालेल्या कष्टाबद्दल दिलगीर आहे. तथापि, तुम्हाला हे नक्कीच आवडेल (अप्रिशिएट?) की, मला राज्यारोहण करुन दोन दिवसही झालेले नाहीत. आपल्याकडील पत्रव्यवहार वाचून त्या सिंहासनावर बसू की नको, असा प्रश्न मला पडला !! तसेही हल्ली मला फार वेळ एका जागी बसता येत नाही. सांधेदुखीने कोणाला सोडले आहे? उतारवयात राष्ट्रकुलाची नोकरी करावी लागते आहे, या विचारानेच दम लागतो. आता कोहिनूरबद्दल थोडेसे : खरा कोहिनूर भारतातच आहे, आणि तो २०१४ सालीच भारताला मिळाला आहे, अशी नोंद आमच्या रॉयल अर्काइव्हमध्ये आढळली आहे. हेही तुम्हास मान्य व्हावे की, तुमचे पंतप्रधान नमोजी हेच खरे कोहिनूर, बाकी सगळ्या गारगोट्या!! आणखी काय लिहू? उष्ण शुभेच्छांसह. फॉर द रॉयल कोर्ट. किंग चार्ल्स (तृतीय)

- ब्रिटिश नंदी